Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 7 August, 2010

विधानसभेत विरोधकांचा गदारोळ

निवेदन करण्यापासून रवींना रोखले
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): ड्रग माफियांकडून हप्ते मिळत नाहीत म्हणून काही राजकीय नेते ड्रग व्यवहार प्रकरणी आपले व आपल्या पुत्राचे नाव घेतात, या गृहमंत्री रवी नाईक यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध करून भाजपने आज सभागृहात गदारोळ माजवला. प्रत्यक्ष सभागृहात चर्चेला उपस्थित न राहता सभागृहातील सदस्यांच्या हेतूवरच संशय घेण्याचा हा प्रकार असून हा सभागृहाचा अवमान तर आहेच पण प्रत्येक आमदारांचा हक्कभंगही ठरतो. काल विनियोग विधेयकाच्या मतदानासाठी हजर राहूनही गप्प बसलेले गृहमंत्री खासगी कामकाजाच्या दिवशी निवेदन करतात याला काहीच अर्थ राहत नाही, असा आरोप करून या निवेदनाला विरोध दर्शवत विरोधी भाजप आमदारांनी सभापतींच्या आसनासमोर धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. ड्रग व्यवहार प्रकरणाची "सीबीआय' चौकशी व्हायलाच हवी, अशा घोषणा करून संपूर्ण सभागृहच दणाणून सोडल्याने सभापती प्रतापसिंह राणे यांना प्रश्नोत्तराच्या तासाचे कामकाज तहकूब करावे लागले.
आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ड्रग माफिया, पोलिस व राजकारणी साटेलोटे प्रकरण पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले. प्रश्नोत्तराला सुरुवात होणार तोच भाजपचे उपनेते आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी सभापतींची संमती घेऊन हा विषय उपस्थित केला. गृहमंत्री रवी नाईक यांनी काल पत्रकारांशी बोलताना राजकीय नेत्यांचे हप्ते बंद झाल्यानेच ते आपल्यावर आरोप करतात, असे वक्तव्य केल्याचे त्यांनी सभापतींना सांगितले. गृहमंत्र्यांचे हे वक्तव्य आक्षेपार्ह आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने सभागृहात विविध विषय मांडण्याच्या अधिकारावरच संशय घेण्याचा हा प्रकार ठरतो, असेही आमदार डिसोझा म्हणाले. सभागृहात हा विषय चर्चेला आला तेव्हा गृहखात्याचा ताबा घेतलेल्या मुख्यमंत्र्यांकडून कोणताही खुलासा करण्यात आला नाही. तिकडे पत्रकारांशी बोलताना गृहमंत्र्यांकडून सभागृहातील आमदारांवर अशा पद्धतीचे भाष्य केले जाणे, हा प्रकार निंदनीय असल्याची टीका त्यांनी केली.
दरम्यान, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनीही हा अत्यंत गंभीर आरोप असल्याचे सांगितले. या वक्तव्यामुळे संपूर्ण सभागृहाच्या विश्वासार्हतेवरच संशय व्यक्त करण्यात आल्याचे ते म्हणाले. सभापतींवरील अविश्वास ठरावावरील चर्चेत सभापती हे देखील शेवटी राजकारणीच आहेत, असे म्हटले गेले. गृहमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सभापतीपदही संशयाच्या घेऱ्यात आले आहे. आमदार दामू नाईक यांनी हा प्रकार म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रकार असल्याचा टोला हाणला. राजकीय नेते हप्ते घेतात, याचाच अर्थ इथे हप्ते दिले जातात व ड्रग व्यवहार चालतो, याला गृहमंत्रीच पुष्टी देत आहेत. तसे असेल तर मग त्यांनी कारवाई का केली नाही, असेही ते म्हणाले. आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर, दयानंद मांद्रेकर, विजय पै खोत, महादेव नाईक आदींनी ड्रग व्यवहार प्रकरणाची "सीबीआय' चौकशीची मागणी करताना हप्तेखोर राजकीय नेत्यांचीही चौकशी करण्याची जोरदार मागणी केली. गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे किनारी भागांतील आमदारांवरही लोक संशयाच्या नजरेने पाहतील व त्यामुळे हे कोण हप्तेखोर हे उघड व्हायला हवे. याबाबतीत कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची भाजप आमदारांची तयारी आहे, असे आमदार दयानंद मांद्रेकर व विजय पै खोत यांनी सांगितले.

No comments: