Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 3 April, 2010

बाकीबाबांच्या कविता या 'कृष्णकविता'च : डॉ. ढेरे

'जिणे गंगौघाचे पाणी' ने रसिक तृप्त
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): 'बा भ. बोरकर यांच्या कवितेत "निळा रंग' आणि "पाऊस' यांची मुक्त उधळण आहे. परमेश्र्वराने "कन्हैयालाल'ला निळा रंग भरल्यावर राहिलेली निळी शाई ही "एक हिवटीचा निळा, एक धुवटीचा निळा' असे म्हणणाऱ्या बाकीबाबांना दिली असावी. त्यांच्या कविता म्हणजे "कृष्णकविता'च आहेत,असे आपले वैयक्तिक मत असल्याचे प्रतिपादन कवयित्री व समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांनी आज केले. कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या "जिणे गंगौघाचे पाणी' या कार्यक्रमात बोरकरांच्या कवितांचे रसग्रहण करताना त्या कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात बोलत होत्या.
"आमी गोयकांर', विवेक व्यासपीठ व भारत विकास परिषद तसेच कला व सांस्कृतिक खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक रामदास कामत, गायक सुरेश बापट, नव्या दमाचे संगीतकार आणि गायक डॉ. सलील कुलकर्णी तसेच निशा पारसनीस यांनी बाकीबाबांची गाजलेली गीते सादर करून रसिकांची मने जिंकली. यावेळी गोव्यातील बाकीबाबांचे चाहते व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"उघड तुजी नयनदला श्यामसुंदरा' हे आकाशवाणीवर गाजलेले कोकणी गीत, तसेच "सुकांत चंद्रानना' व "हात हो हातांत धरला शुभांगी' ही कोकणी गीते रामदास कामत यांनी "आश्विनशेट'च्या भूमिकेत सादर करून रसिकांवर मोहिनी घातली. तर, सुरेश बापट यांनी "अनंता तुला कोण पाहू शके', "कशी तूज समजावू सांग', "नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी' ही बोरकरांची अजरामर गीते सादर केली. "गोंयचे नाव व्हड करून ल्हान झाले महान', "म्हज्या घराची तू रोसणाय', "थांबय दुखाची माळा' ही गीते निशा पारसनीस यांनी पेश केली. तर, बाकीबाबांच्या "सपन वासवदत्ता' या कवितेवर बेतलेले वासवदत्तेचे चित्र प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर यांनी प्रत्यक्ष रंगमंचावर रेखाटले. या चित्राचा त्याचवेळी लिलावही करण्यात आला.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. सलील कुलकर्णी यांनी, "जीवन त्यांना कळले हो, मीपण ज्यांचे पक्क फळापरी सहजपणाने गळले हो', हे बोरकरांचे गीत सादर केले. या कवितेविषयीची आठवण सांगता निवेदिका सौ. उत्तरा मोने म्हणाल्या, "१९४६ साली गोवा मुक्ती संग्रामात बाकीबाबांनी भाग घेतल्यानंतर ते बेळगाव येथे भूमिगत झाले. एके दिवशी रवींद्र केळेकर यांच्यासह गावदेवीला फिरायला गेले असता संपूर्ण वेळ बा. भ. बोरकर गप्पच होते. त्यामुळे कंटाळलेले केळेकर त्यांना घेऊन परत आल्यावर बोरकरांनी वरील कविता लिहून काढली होती. "कवितेतून बोरकर मला नेहमी भेटत असतात. मी त्यांची अनेक गाणी स्वरबद्ध केली आहेत. त्यांच्या कवितेत गोव्यातला निसर्ग ओतप्रोत भरलेला आहे', असे यावेळी डॉ. सलील कुलकर्णी यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी "तव नयनांचे दल हलले ग' आणि "डाळिंबाच्या डहाळीशी, नको वाऱ्यासवे झुलू, सदाफुलीच्या थाटात, नको सांजवेळी फुलू' ही गीते सादर केली.
बोरकरांच्या कवितेचे रसग्रहण करताना डॉ. ढेरे पुढे म्हणाल्या की, कवी हा आभाळातून पडत नसतो. त्याच्या जडणघडणीत त्याच्या परिसरातील निसर्गाचा, तेथील माणसांचा हातभार लागलेला असतो. बोरकरांच्या कवितेत प्रेम, भक्ती ही वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहेत. पाच भाषांमधून स्वतःला व्यक्त करण्याची ऊर्मी ही बाकीबाबांकडे होती.
"आमी गोयकांर' या संस्थेचे अध्यक्ष संजय हेगडे यांनी या कार्यक्रमामागील हेतू स्पष्ट केला. डॉ. घनश्याम बोरकर व सौ. उत्तरा मोने यांनी सूत्रसंचालन केले.
"नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी' या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
-----------------------------------------------------------------
पर्रीकरांची व्यथा
"बा भ. बोरकरांनी बोरी गावातील ज्या निसर्गरम्य डोंगरावर कविता केली ते डोंगर आज फोडले जाताहेत. रेड्डी नामक व्यक्ती हे डोंगर फोडण्यासाठी सरसावलेला असून गोव्यातील बाकीबाबांसारखे लोक कुठे गेले', असा सवाल उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले मनोहर पर्रीकर यांनी आपल्या छोट्याशा भाषणात विचारला. "बाकीबाब जन्माला आले त्यावेळी गोव्याची लोकसंख्या मोजकीच होती, मुक्तीवेळी ती केवळ ४ लाख होती. त्यात जी रत्ने निर्माण झाली, त्यांची आम्ही केवळ शंभरीच साजरी करणार आहोत का? गेली पन्नास वर्षे केवळ डोंगरच कापले गेले. आज बोरकरांचा तो गोवा हरवलेला आहे. तो कुठे हरवला आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे श्री. पर्रीकर पुढे म्हणाले.

No comments: