Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 28 March, 2010

हे सरकार आपल्या कर्मानेच कोसळेलः लक्ष्मीकांत पार्सेकर

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): अधिवेशनात सरकार पाडणे, सरकार अस्थिर करणे, पाडापाडीला प्रोत्साहन देणे हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा मुळीच नव्हता, त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वित्त विधेयक सुखनैव संमत झाले यात भाजपला विशेष काहीच वाटत नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया पक्षाचे आमदार तथा प्रदेशाध्यक्ष प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज व्यक्त केली. कालावधी अत्यंत कमी असूनही आम्ही अधिवेशनात सरकारचे पुरेसे वस्त्रहरण केले, त्याची कुलंगडी बाहेर काढली, त्यामुळे राज्यातील कामत सरकार किती दिशाहीन आणि सामान्यांप्रती असंवेदनशील आहे हेच आम्ही जनतेसमोर आणले,असेही ते पुढे म्हणाले.
हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सरकारातील एका गटाने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या कार्यपद्धतीवर आणि अकार्यक्षमतेवर तीव्र आक्षेप घेऊन त्यांच्याविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. असंतुष्ठ गटाच्या मागण्या मान्य न झाल्यास अधिवेशनात वित्त विधेयकाच्या वेळी सरकार पाडण्याची या गटाकडून उघड धमकीही देण्यात आली होती. प्रा. पार्सेकर यांना त्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, तो त्यांचा अंतर्गत विषय होता. पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या घटनांना "नवरा - बायको'मधला संघर्ष असे नाव देत त्यात आम्ही नाक खुपसणार नाही, असे आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे भाजपला त्यांच्या या भांडणात कसलेच स्वारस्य नव्हते. अशा वेळी सरकार का पडले नाही, त्याचे उत्तर देण्याचे दायित्व त्या बंडखोर गटाकडे आहे. भाजपला त्याच्याशी देणेघेणे नसल्याचे त्यांनी पुन्हा एकवार स्पष्ट केले.
मुळात अधिवेशनाचा कालावधी केवळ पाचच दिवस ठेवून विविध प्रश्नांमुळे अडचणीत आलेल्या कामत सरकारने अधिवेशनात विरोधकांपासून आपले तोंड लपवले आहे. जे सरकार अधिवेशनाला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवत नाही त्या सरकारात लोकांसमोर जाण्याचेही धैर्य नाही हे पुन्हा एकवार सिद्ध झाले. तथापि मिळालेल्या या छोट्याशा कालावधीचाही पुरेपूरे उपयोग करताना भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी कामत सरकारचे भ्रष्टाचाराने बरबटलेले अंतरंगच राज्यातील जनतेसमोर उघडे पाडले. खाणीसारख्या विषयावरून आज राज्याची झालेली दयनीय अवस्था विरोधकांनी उदाहरणांसह सभागृहापुढे आणली. खाणी बंद आहेत; परंतु माल काढणे मात्र सुरूच आहे. खाणीच्या लीजला परवानगी नाही; मात्र दिवसाढवळ्या तेथून हजारो टन मालाची वाहतूक सुरू आहे, या बेकायदा कृत्यांत केवळ राजकारणीच नव्हे तर पोलिस अधिकारी, खाण अधिकारी, वन अधिकारी अशा सगळ्यांचीच साखळी कशी गुंतली आहे हे विरोधकांनी उदाहरणांसह दाखवून दिले. अशावेळी विकास, प्रामाणिकपणा, गरीबांबद्दलची कणव याची टिमकी वाजवणाऱ्या सरकारचे खरे पितळे उघडे पडले. सरकारचे खरे रूप जनतेसमोर आणणे हीच अधिवेशनातील आमची रणनीती होती. त्यामुळे कामत सरकार पडले की पडले नाही याच्याशी आम्हाला काडीचेही कर्तव्य नसल्याचे पार्सेकर म्हणाले.
राज्यात सत्तेवर येऊन चांगले सरकार देणे हे भारतीय जनता पक्षाचेही ध्येय आणि लक्ष्य आहे. मात्र, विद्यमान सरकार पाडून मागील दाराने सत्ता हस्तगत करण्यापेक्षा विविध क्षेत्रांत सध्या माजलेली बेदिली, अनियंत्रित भ्रष्टाचार, पराकोटीचे खाण व इतर प्रदूषण, जमिनींचे रूपांतर, प्रादेशिक आराखड्यातील असंख्य भानगडी, कोलमडलेली कायदा आणि सुव्यवस्था व यावर कळस म्हणजे या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात सामान्य माणसाची होणारी कुचंबणा लोकांसमोर आणणे हाच आमचा मुख्य हेतू आहे. असंंतुष्टांच्या नादी लागून सरकार पाडून सत्ता संपादन करण्यापेक्षा लोकांच्या दरबारातच ते पडावे, या भ्रष्ट राजकर्त्यांना लोकांनीच निवडणूक रिंगणातून बाहेर फेकून द्यावे आणि त्याही पलीकडे निवडणुकीपूर्वी जर ते पडणारच असेल तर स्वतःच्या भ्रष्ट कर्तृत्वामुळे स्वतच्याच वजनाने कोसळावे ही भाजपची भूमिका असल्याचे यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर ते उत्तरले.
विधानसभा अधिवेशन आटोपले तरी पक्षाचे महागाईविरोधी अभियान गावागावांत जोरात सुरू असून केंद्र सरकारच्या भ्रष्ट नीतीविरुद्ध केवळ गोव्यातूनच चार ते पाच लाख सह्या गोळा केल्या जाणार आहेत. या मोहिमेद्वारे केंद्र सरकार पुरस्कृत महागाईला कडाडून विरोध केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ही मोहीम गाव ते शहर आणि शहर ते देश अशा पातळ्यांवर सुरूच राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

No comments: