Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 31 March, 2010

सगोत्र विवाह हत्याप्रकरणी पाच पंच सदस्यांना फाशी

कर्नाल, दि. ३० : पे्रमविवाहाचे बळी ठरलेल्या मनोज-बबली हत्याकांडप्रकरणी हरयाणातील कर्नालच्या न्यायालयाने पंचायतीच्या पाच सदस्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.
कर्नालच्या एका पंचायतीने सगोत्र (समान गोत्र असलेल्या) विवाह प्रकरणी मनोज व बबली नामक युवक-युवतीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणी न्यायालयाने पंचायतीच्या पाच सदस्यांना दोषी धरत त्यांना मृत्युदंडाची, तर पंचायतचे प्रमुख व वाहनचालकाला अनुक्रमे जन्मठेप व सात वर्षांची शिक्षा सुनावली.
याआधी या सातही आरोपींना अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची बाजू ऐकून घेण्यात आली. आम्हाला किमान शिक्षा द्या, अशी विनंती या सातही जणांनी न्यायालयाला केली. तथापि, दुसऱ्या बाजूला सरकारी पक्षाने आपली बाजू मांडताना स्पष्ट केले की, अशा घटना अतिशय दुर्मीळ श्रेणीत मोडतात. त्यामुळे प्राप्त माहिती व पुरावे पाहता आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात यावी.
या प्रकरणात कोणीही थेट साक्षीदार नसला तरी घटनास्थळावरून प्राप्त झालेल्या काही पुराव्यांवरून हेच सिद्ध होते की, याच लोकांनी मनोज व बबली यांचे अपहरण करून नंतर त्यांची हत्या केली.
मनोज व बबली यांनी सात एप्रिल २००७ ला पंचकुलातील एका मंदिरात लग्न केले. या दोघांचे नंतर १५ जून २००७ रोजी कर्नाल जिल्ह्यातील अरजाहेडी गावातून अपहरण करून हत्या करण्यात आली होती.

No comments: