Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 1 April, 2010

बेदरकार खनिज वाहतुकीने शेल्डेत घेतला एकाचा बळी

केपेत वातावरण तंग
आजपासून ४ एप्रिलपर्यंत खनिज वाहतूक बंद
कुडचडे, दि. ३१ (प्रतिनिधी): शिवनगर - शेल्डे येथे आज एका खनिजवाहू ट्रकाने ठोकरल्याने दुचाकीवरून जात असलेल्या सतीश रिवणकर (४२) या इसमाचा दुसऱ्या एका ट्रकखाली चिरडून जागीच अंत झाला. तथापि, बेदरकार खनिज वाहतुकीतून उद्भवलेल्या अपघातामुळे येथील वातावरण कमालीचे तापले आणि कुडचडे व तिळामळ भागातील संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन छेडले. या भागातून बेदरकारपणे होणारी खनिज वाहतूक कायमची बंद करण्यात यावी अशी आग्रही मागणी संतप्त नागरिकांनी यावेळी केली.
यावेळी खवळलेल्या जनतेचा रागरंग पाहून त्यांना तात्पुरते शांत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केपे ते कुडचडेपर्यंतची खनिज वाहतूक उद्या दि. १ ते ४ एप्रिलपर्यंत बंद करण्याची अधिसूचना जारी केली आहे. मात्र उपजिल्हाधिकाऱ्यांच्या या तात्पुरत्या तोडग्याने समाधान न पावलेल्या नागरिकांनी सदर वाहतूक कायमची बंद करावी या आपल्या मागणीसाठी आज रात्री उशिरापर्यंत अपघातस्थळी ठाण मांडले होते. यात महिलांचा समावेश लक्षवेधक होता.
दुपारी १२.३०च्या सुमारास हा अपघात झाला. मयत सतीश आपल्या दुचाकीवरून तिळामळहून कुडचडेच्या दिशेने येत होते. सोनफातर येथे ते पोहोचले असता समोरून भरवेगाने येणाऱ्या खनिजवाहू ट्रकची त्यांना धडक बसली. त्या धडकेने ते रस्त्यावर फेकले गेले असता मागून येणाऱ्या दुसऱ्या एका ट्रकाखाली ते चिरडले गेले. त्यात त्यांच्या देहाचा चेंदामेंदा झाला. सदर ट्रकाने त्यांना सुमारे १० मीटर फरफटत नेल्याने त्यांचा देह छिन्नविच्छिन्न झाला होता. त्यामुळे अपघातस्थळी मोठे विदारक निर्माण झाले होते.
अपघाताची माहिती मिळताच केपे पोलिस घटनास्थळी दाखल झाले खरे पण तेथे जमलेल्या संतप्त जमावाने त्यांना सतीश यांचा मृतदेह हालवू दिला नाही. जोपर्यंत जिल्हाधिकारी अथवा मुख्यमंत्री घटनास्थळी येऊन या मार्गावरील खनिज वाहतूक कायमची बंद करण्याचे आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत मृतदेहाला हात लावू दिला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले व त्यामुळे येथे मोठ्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमुळे सुमारे साडे चार तास मृतदेह ट्रकखाली पडून राहिला होता. दुसऱ्या बाजूने जमावाने अडवून धरलेली रस्त्यावरील वाहतूक संध्याकाळपर्यंत ठप्प होती.
दरम्यान, त्यापूर्वी दुपारी येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने या ठिकाणी पोलिस उपअधीक्षक रोहिदास पत्रे दाखल झाले. संतप्त जमावाने त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करून कोणत्याही परिस्थितीत आपल्याला खनिज वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आश्वासन हवे, अशी आक्रमक भूमिका घेतली. तथापि, आपल्याकडे असे कोणतेच अधिकार नसल्याचे यावेळी पत्रे यांनी सांगितले. त्यानंतर जमावाने जिल्हाधिकाऱ्यांना पाचारण करण्याची मागणी केली.
त्यानंतर संध्याकाळी ४.३० वाजता म्हणजेच तब्बल चार तासांनी जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक घटनास्थळी दाखल झाले. संतप्त जमावाने त्यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला व खनिज वाहतूक कायमची बंद करण्याची मागणी लावून धरली. वातावरणातील तणाव पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जास्त वेळ न थांबता लगेच काढता पाय घेतला. नंतर केपे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी लोकांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी उद्यापासून ४ एप्रिलपर्यंत केपे ते कुडचडे मार्गावरील खनिज माल वाहतूक बंद करण्याचे आदेश जारी केले. तसेच हा विषय सरकारसमोर मांडून त्यावर योग्य तोडगा काढण्याचेही त्यात नमूद केले.
दरम्यान, सतीशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव येथे पाठवण्यात आला आहे. सतीश रिवणकर एक मनमिळाऊ तसेच समाजसेवी वृत्तीचे व्यक्तिमत्त्व होते. तसेच कुडचडेतील गार्डियन एंजल हायस्कूलच्या पालक शिक्षक संघाचे ते अध्यक्ष होते. राष्ट्रीय युवा प्रकल्पाच्या गोवा विभागाचे ते पदाधिकारी होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी रेश्मा व १२ वर्षीय मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे खनिज वाहतूक विरोधी चळवळ चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मनोहर नाईक, रुझार फर्नांडिस, प्रकाश वेळीप, मारुती नाईक, प्रदीप काकोडकर, देऊ सोनू नाईक, प्रदीप नाईक, संजय देसाई, डॉम्निक फर्नांडिस, नीलेश काब्राल, नामदेव नाईक, अमोल काणेकर घटनास्थळी उपस्थित होते.

No comments: