Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 31 March, 2010

वास्कोत भरदिवसा महिलेवर गोळीबार

दहा दिवसांतील दुसरी घटना
वास्को, दि. ३० (प्रतिनिधी): याच महिन्याच्या २२ तारखेला वास्को येथे एका मजुरावर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच आज (दि. ३०) पॅट्रॉंग - बायणा वास्को येथील दिवाकर रेसिडन्सीमधील एका फ्लॅटमध्ये भरदिवसा घुसून अज्ञात इसमाने अनिता पी. अनंत या महिलेवर गोळीबार केल्याची घटना घडल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यात सदर महिला गंभीर जखमी झाली असून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी ७.३०च्या सुमारास घडली. अनिता पी. अनंत या मूळ तामिळनाडूच्या व अनेक वर्षे गोव्यात वास्तव्य करून असलेली महिला पॅट्रॉंग - बायणा येथे आपले पती व दोन मुलांसमवेत राहते. आज सकाळी तिचे पती कामानिमित्त बाहेर पडले. सकाळी ६.४५ वा. इमारतीचा वॉचमनही नेहमीप्रमाणे घरी गेला. त्यानंतर ७.३०च्या सुमारास दिवाकर रेसिडन्सीमधील पहिल्या मजल्यावर फ्लॅट क्र. १०३ मध्ये राहत असलेल्या सदर महिलेच्या फ्लॅटचा दरवाजा एका अज्ञात इसमाने ठोठावला व आपण तुमच्या पतीचे सहकारी असून त्यांनी आपल्याला काही कागदपत्रे आणण्यासाठी पाठवले असल्याची बतावणी केली. सदर महिलेने त्या कागदपत्रांची नावे एका वहीवर लिहून द्या असे त्यांना सांगितले व ती स्वयंपाकघरात गेली. तिच्या पाठोपाठ तो इसमही आत शिरला. यावेळी हॉलमध्ये त्या महिलेची निन्सी ही दुसरीत शिकणारी व बालाजी हा चौथीच शिकणारा मुलगा होता. सदर अज्ञात इसमाने त्यांना दुसऱ्या खोलीत जायला सांगितले व आपण स्वयंपाकघरात शिरला. त्यानंतर आधी स्वयंपाकघरातून झटापटीचा आवाज व नंतर गोळी झाडल्याचा आवाज आला. गोळी झाडल्यानंतर सदर इसम फरार झाला. गोळीचा आवाज ऐकून शेजारी आत आले असता त्यांना सदर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. अज्ञाताने तिच्या मानेवर मागून गोळी झाडली होती. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याची साखळीही नाहीशी झाल्याचे यावेळी दिसून आले.
त्यानंतर साधारण अर्ध्या तासाने सदर महिलेला चिखली येथील कुटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर गोळी झाडली गेल्याचे डॉक्टरांनी निश्चित केले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हालवण्यास सांगितले गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिथे सदर महिलेवर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता तिची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सांगितले व अन्य कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. त्यांनी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध भा. दं. सं. ३०४, ३९७ आणि ३आर। २५, २७ सशस्त्र कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच दक्षिण गोवा अधीक्षक ऍलन डीसा, आमदार मिलिंद नाईक, महसूलमंत्री जुझे फिलिप, भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मिळालेल्या माहितीनुसार आज रात्री उशिरापर्यंत सदर हल्लेखोराचा काहीही मागमूस पोलिसांना लागू शकला नव्हता.
दरम्यान, सदर महिलेची मुलगी निन्सी हिने दिलेल्या माहितीनुसार, सदर अज्ञात हल्लेखोर हा तरुण होता. तो गोरा होता व त्याने दाढीमिशा राखलेल्या नव्हत्या. त्याची उंची साधारण पाच फुटाच्या आसपास होती व डोळे पिंगट रंगाचे होते.
वास्कोत गेल्या दहा दिवसांत घडलेले गोळीबाराचे हे दुसरे प्रकरण असून या प्रकरणांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, पोलिसांच्या नाकर्तेपणामुळेच आज शांत गोव्यातही भरदिवसा गोळीबार करण्यापर्यंतची मजल गुन्हेगारांनी मारली असल्याच्या प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

No comments: