Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 30 March, 2010

संचालकांचे राजीनामे हा निव्वळ पळपुटेपणा

गोवा अर्बन बॅंक कर्मचाऱ्यांचे मुख्यालयासमोर धरणे

बेमुदत संप ३ मे रोजी



पणजी, दि. २९ (प्रतिनिधी)- गेली सात वर्षे गोवा अर्बन बॅंकेच्या कर्मचारी व अधिकारिवर्गाच्या वेतन कराराचे नूतनीकरण झाले नाही. दोन्ही संघटनांनी वेळोवेळी लोकशाही मार्गाने हा विषय बॅंक व्यवस्थापनाकडे नेला पण त्यांना साधे चर्चेसाठीही पाचारण करण्याचे औदार्य दाखवण्यात आले नाही. आता जेव्हा सर्व कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला व बेमुदत संपाची नोटीस जारी करण्यात आली तेव्हा मात्र सामंजस्याने हा विषय सोडवण्याचे सोडून संचालक मंडळाने राजीनामा देणेच पसंत केले. संचालक मंडळाची ही कृती केवळ निषेधार्हच नव्हे तर पळपुटेपणाचीही असल्याचा ठपका आज कर्मचारी संघटनेने ठेवला आहे.
गोवा अर्बन सहकारी बॅंक कर्मचारी व अधिकारी संघटनेतर्फे आज आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाला सुरुवात केली. बॅंकेच्या राज्यभरातील चौदाही शाखा बंद ठेवून संघटनेच्या सदस्यांनी मुख्यालयासमोर धरणे धरले. दरम्यान, बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर बॅंकेचे अध्यक्ष विष्णू नायक व इतर सहा संचालकांनी राजीनामे सादर केल्याने पेचप्रसंग निर्माण झाला आहे व त्यामुळे हा बेमुदत संप ३ मे रोजी पुढे ढकलण्यात यावा, असा ठराव यावेळी संमत करण्यात आला.
दरम्यान, आजच्या आंदोलनामुळे बॅंकेचा संपूर्ण व्यवहारच ठप्प झाल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. यावेळी मुख्यालयासमोर आपले विचार मांडताना कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीस अर्चना कारे व अधिकारी संघटनेचे सरचिटणीस शिवाजी भांगी यांनी बॅंकेचे ग्राहक, ठेवीदार, भागधारक यांच्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला. केवळ बॅंक व्यवस्थापनाच्या आडमुठेपणामुळे आंदोलनाचा पवित्रा घेणे भाग पडत असल्याचे सांगून ग्राहक, ठेवीदार व भागधारकांचाही या आंदोलनात पाठिंबा हवा असल्याचे त्यांनी सांगितले. बॅंकेच्या काही संचालकांनी राजीनामा प्रदान करून कर्मचारी संघटनेच्या संपाला अपशकून करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ही मनमानी यापुढे अजिबात सहन केली जाणार नाही, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
गोवा अर्बन बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी बॅंकेची बदनामी किंवा बॅंकेच्या ग्राहकांना त्रास देणारी कृती कधीही केली नाही. कर्मचाऱ्यांच्या सतावणुकीमुळे संचालक मंडळ राजीनामा देण्याची ही कृती इतिहासातील पहिलीच ठरावी, असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. याप्रसंगी कर्मचारी संघटनेचे नेते सुभाष नाईक जॉर्ज, अधिकारी संघटनेचे नेते प्रसन्न उट्टगी, गोवा बॅंक कर्मचारी संघटनेचे सचिव फ्रान्सिस सुवारीस व बॅंकेच्या सर्व शाखांतील बहुसंख्य कर्मचारी व अधिकारी हजर होते.

No comments: