Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 31 March, 2010

१२० भारतीय खलाशांचे चाच्यांनी केले अपहरण

एडन, दि. ३० : सोमालियाच्या चाच्यांनी आठ अत्याधुनिक बोटींचे अपहरण करून सुमारे १२० भारतीयांना ओलीस ठेवले आहे. अपहरणाची ही आजपर्यंतची सर्वांत मोठी घटना आहे. दरम्यान, या बोटीचा शोध लागला असून त्यांना सिचेल्स या बेटाजवळ ठेवण्यात आले आहे.
सोमालियाकडून दुबईकडे जाणाऱ्या बोटींचे अपहरण करण्यात आले असून त्यातील नाविक हे बहुतांशी सौराष्ट्र आणि कच्छचे रहिवासी आहेत. या नाविकांच्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत,अशी विनंती अपहृत नाविकांच्या नातेवाइकांनी केली आहे.
भारतीय नाविकांनी सोमालियातील किस्मायो बंदरावरून माल भरून घेतला. त्यानंतर बंदर सोडल्यानंतर काही वेळानंतर सोमालियन चाच्यांनी बोटींवर हल्ला चढवला आणि बोटींचे अपहरण केले. दरम्यान आत्तापर्यंत चाच्यांनी कोणत्याही खंडणीची मागणी केली नसल्याचे सूत्रांकडून समजते.
यापूर्वी अशा प्रकारच्या अपहरणाचे प्रकार सोमालियात घडले आहेत. खंडणी घेतल्यानंतर बोटींची सुटका करण्यात येते. परंतु, हा आत्ता पर्यंतचा सर्वांत मोठा अपहरणाचा प्रकार आहे.

No comments: