Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 30 March, 2010

अमिताभला विरोध करणारे तालिबानी - मोदी

अहमदाबाद, दि. २९ - बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन याने मुंबईतील सी- लिंकच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल ज्यांनी ज्यांनी आक्षेप घेतले, त्यांच्यावर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी जोरदार हल्ला चढविला आहे. अमिताभला विरोध करणारे तालिबानी असून जनतेने या तालिबान्यांना ओळखावे, असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे.
मोदी यांनी म्हटले आहे, की अमिताभ बच्चन हे एक महान कलाकार आहेत. त्यांच्यासारखे कलाकार चांगल्या कामासाठी कोणत्याही प्रकारच्या विरोधास सामोरे जाण्यासाठी तयार असतात. ते कधी खोट्या आणि तकलादू प्रतिष्ठेच्या मागे लागत नाहीत. चौफेर टीका होत असतानाही गुजरातची प्रगती जगभर पोचविण्यासाठी ते आमचे ब्रॅंड अँबेसेडर बनले आहेत.
अमिताभ बच्चन हे वांद्रे-वरळी सी-लिंक पुलाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिले. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे देखील आले होते. मात्र बच्चन यांच्या उपस्थितीला सत्तारूढ कॉंग्रेसच्याच एका गटाने नाराजी व्यक्त केली.

चौकट

६४ प्रश्नांनंतरही मोदी
निश्ंिचत आणि दिलखुलास

नवी दिल्ली, दि. २९ः गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी निश्ंिचत आहेत, "दिलखुलास मूड' मध्ये आहेत. गुजरातमधील गुलबर्ग सोसायटीतील हिंसाचाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या विशेष चौकशी पथकासोर मोदी यांना साडेनऊ तास ६४ प्रश्न विचारण्यात आले.
आज प्रस्तुत प्रतिनिधीने मोदी यांच्याशी संवाद साधला असता ते दिलखुलासपणे वेगवेगळ्या विषयांवर बोलू लागले. सर्व विषयांवर बोलताना त्यांच्या बोलण्यात कोणताही तणाव नव्हता.
विषय अमिताभचा :
अमिताभ बच्चन गुजरातचा ब्रॅंड ऍम्बेसेडर झाला आणि त्याच्याविरुद्ध बहिष्काराचे आंदोलन सुरू झाल्यासारखे दिसत आहे. यावर मोदींची प्रतिक्रिया होती. महात्मा गांधींनी अस्पृश्यतेविरुद्ध आंदोलन पुकारले आणि येथे बच्चन कुटुंबाला अस्पृश्यासारखे वागविले जात आहे. यात बच्चन कुटुंबाचा अपमान तर आहेच, शिवाय गुजरातचाही अपमान आहे.
मोदी म्हणाले, अमिताभ बच्चन गुजरातचा ब्रॅंड ऍम्बेसेडर झाल्याने त्याच्यावर बहिष्कार घालण्यात येत आहे. पण गुजरात विरोधक कशा कशावर बहिष्कार घालणार? अमूल दूध, अमूल आइस्क्रीम यांना मोठी मागणी आहे. या पदार्थांवरही बहिष्कार घातला जाणार आहे काय?
जवळपास १५ मिनिटांच्या दूरध्वनी संभाषणात मोदी एकदाही तणावपूर्ण वा चिंतित वाटले नाहीत. एक योगायोग म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष चौकशी पथकासमोर उपस्थित होऊन मोदींना २४ तास होत नाही तोच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. बालकृष्णन् मोदी यांच्यासोबत एका सार्वजनिक सरकारी कार्यक्रमात सहभागी झाले. नरेंद्र मोदी व न्या. बालकृष्णन यांचे आज प्रसिद्ध झालेले छायाचित्र राजधानीत चर्चेचा विषय झाले होते.

No comments: