Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 31 March, 2010

नेतृत्व आणि खातेबदलासाठी 'जी-७' गट दिल्लीत दाखल

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेखा अनुदानाला मान्यता मिळवण्यापुरता श्रेष्ठींच्या खास विनंतीवरून आपला लढा स्थगित ठेवलेल्या "जी - ७' गटाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या विरोधात बंडाची निशाणी फडकावली आहे. नेतृत्वबदलाचा विषय निकालात निघाल्याचा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांचा दावा राष्ट्रवादीचे आमदार तथा महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी फेटाळून लावताना हा विषय अजूनही कायम असल्याचे ठासून सांगत आपली आक्रमकता आज पुन्हा स्पष्ट केली. "जी - ७' गट आज दिल्लीत डेरेदाखल झाला आहे. नेतृत्वबदलाबरोबरच खातेबदलाचाही विषय उद्याच्या बैठकीत चर्चेला येणार आहे, असेही या नेत्यांनी स्पष्ट केले.
या बंडावर तोडगा काढण्यासाठी उद्या ३१ रोजी दिल्लीत आघाडीच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक होईल. या बैठकीत नेतृत्वबदलापासून ते थेट खातेबदलापर्यंत सगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत हे मात्र उद्या सकाळी दिल्लीकडे रवाना होतील. "जी - ७' गटातील एकाही मंत्र्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडण्याचेही या गटाने यापूर्वीच जाहीर केले आहे. नेतृत्वबदलाच्या मागणीवर जोर देताना श्रेष्ठींना ही गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न हा गट करणार असून त्यांना कितपत यश मिळते ते उद्याच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.
गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी नेतृत्व बदलाच्या मागणीवरून आक्रमक झालेल्या "जी - ७' गटाला श्रेष्ठींनी काही काळ शांत केले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला धोका उद्भवू नये यासाठी अधिवेशनानंतर या विषयावर तोडगा काढण्याचे वचन श्रेष्ठींनी या नेत्यांना दिले होते. त्यानुसार आता हा गट नव्याने सक्रिय झाला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री दिगंबर कामत मात्र अद्याप दिल्लीला रवाना झालेले नाहीत. त्यांनी आज संध्याकाळी आपल्या आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे मात्र कळू शकले नाही. ते उद्या सकाळी दिल्लीला रवाना होतील, अशीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या विरोधातील यापूर्वीची सरकाराअंतर्गत सर्व बंडे थंडावली असली तरी यावेळी मात्र सरकारातील सर्व कॉंग्रेसेतर नेते "जी - ७' च्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. आपल्या मागण्या कोणत्याही परिस्थितीत धसास लावण्याचे या नेत्यांनी निश्चित केले आहे. यावेळी श्रेष्ठींकडून समजूत काढण्याचा प्रयत्न झाल्यास प्रसंगी श्रेष्ठींच्या विरोधातही जावे लागले तरी बेहत्तर अशा निर्णयाप्रत हे नेते पोहोचले आहेत, अशीही माहिती प्राप्त झाली आहे. यावेळचे बंड हे डोंगर पोखरून उंदीर काढणारे अजिबात ठरणार नाही; यावेळी काहीतरी फलनिष्पत्ती जरूर होईल, असा विश्वास या गटातील नेत्यांनी व्यक्त केला.
"जी - ७' गटात राष्ट्रवादीचे तीन नेते महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा, पर्यटनमंत्री मिकी पाशेको व आमदार नीळकंठ हळर्णकर, मगोचे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर व आमदार दीपक ढवळीकर, तसेच ताळगावचे आमदार तथा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा समावेश आहे. समन्वय समितीच्या बैठकीत "जी - ७' गटाचे श्रेष्ठी या नात्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल, कॉंग्रेसचे निरीक्षक बी. के. हरिप्रसाद आदी नेते हजर राहणार आहेत. कॉंग्रेस नेत्यांकडून या गटातील नेत्यांच्या मतदारसंघांत होणारा हस्तक्षेप कदापि सहन करून न घेण्याचा पवित्रा या नेत्यांनी घेतला आहे.

No comments: