Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 3 November, 2009

यंदा आगाऊ निधी दिला तरच कामे हाती घेणार

'इफ्फी'च्या कंत्राटदारांकडून निर्वाणीचा इशारा

२००८ मधील दीड कोटींची थकबाकी
"मनोरंजन'ची बैठक आज वादळी ठरणार

पणजी, दि. २ (प्रतिनिधी) : "इफ्फी २००८'च्या विविध कंत्राटांची सुमारे दीड कोटी रुपयांची थकबाकी अद्याप देण्यात आलेली नसल्याने यंदा आगाऊ निधी दिला तरच "इफ्फी'ची कामे हाती घेऊ, असा निर्वाणीचा इशारा कंत्राटदारांनी गोवा मनोरंजन संस्थेला दिला आहे. कंत्राटदारांच्या या इशारेवजा धमकीमुळे मनोरंजन संस्थेचे धाबे दणाणले असून या पार्श्वभूमीवर उद्या (मंगळवारी) संस्थेच्या कार्यकारी समितीची होणार असलेली बैठक वादळी ठरण्याचे स्पष्ट संकेत मिळले आहेत.
गतवर्षी संस्थेने "इफ्फी'ची कामे हाताळण्यासाठी "टाइम्स ३६०' या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची नेमणूक केली होती. तथापि, या कंपनीची काही बिले विविध कारणास्तव अडवून ठेवण्यात आली असल्याने त्या कंपनीने कामाच्या विकेंद्रीकरणाखाली नियुक्त केलेल्या व्यावसायिक कंत्राटदारांना त्यांच्या सेवेचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही. यात सिद्धिविनायक एंटरटेनमेंट, साळगावकर संचार, इको क्लीन, मंगला इलेक्ट्रीकल्स, रचना ग्राफिक्स, ओंकार मेलोडीज, सिद्धी क्रिएशन, ऑल्टरनेट ब्रॅंड सोल्युशन लिमिटेड इत्यादी आस्थापनांचा समावेश आहे.
गोमंतकीय हौशी छायाचित्रकार व व्हिडाओग्राफरचीही सेवा गत इफ्फीच्या काळात मनोरंजन संस्थेने घेतली होती. सुमारे दहा ते बारा स्थानिक व्हिडीओग्राफर व छायाचित्रकारांचा त्यात समावेश असून त्यांनाही त्यांच्या सेवेचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे आधीचीच थकबाकी असताना यंदाच्या इफ्फी काळातील बिले कशी फेडली जातील, ही शंका त्यांना आहे. यामुळेच स्थानिक व्यावसायिक कंत्राटदारांनी संस्थेकडे आगाऊ रक्कम वितरित करण्याची मागणी केली आहे. आगाऊ निधी पुरविला नाही तर काम हाती घेण्यास नकार दिल्याने मनोरंजन संस्था गोत्यात आली असून उद्याच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
जाहिरात देऊन निविदा जारी करण्याच्या प्रक्रियेला फाटा देणे, मर्जीतील व्यावसायिकांकडून निविदा स्वीकारणे, इफ्फीच्या इंडियन प्रिमियर तसेच लघू चित्रपट विभागाला देण्यात आलेली कायदेशीर नोटीस, ध्वनी यंत्रणा, वारसा इमारतींची रोशणाई, दारूकामाची आतषबाजी, ग्राफिक डिझाईन्स, जनसंपर्क कंपन्यांच्या नेमणुकीबाबत निर्माण झालेले वाद इत्यादी विषयही उद्याच्या बैठकीत चर्चेसाठी पुढे येणार असल्याची माहिती मिळाली असून त्यामुळे ही बैठक अत्यंत वादळी ठरेल असा अंदाज आहे.
या एकंदर प्रकरणी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांना बैठकीत सदस्यांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागण्याची शक्यता असून त्यांनी इंडियन प्रिमियर विभागासाठी समन्वयक म्हणून नेमलेल्या दिल्लीस्थित लघू चित्रपट निर्माती मोनिका भसीन यांच्या नेमणुकीचा मुद्दाही या बैठकीत उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. एकीकडे इंडियन प्रिमियर विभागातील चित्रपटांची निवड वादाचा मुद्दा ठरलेला असतानाच त्या बाजूने इंडियन पॅनोरमा विभाग न्यायालयाच्या कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे स्पर्धा विभागासाठीही चित्रपटांची निवड करण्याचे कामही रखडले आहे. परिणामी इफ्फीच्या नियोजित कार्यक्रमांचा ताळमेळ घालणे संस्थेला सध्या अवघड बनले आहे.
अशा कठीण प्रसंगी नवनवे वाद उद्भवत असल्याने संस्थेपुढे इफ्फीच्या आयोजनाचे मोठे आव्हान आ वासून उभे ठाकले आहे. नियोजित कार्यक्रमानुसार जर कामे पुढे गेली नाहीत तर इफ्फीचे आयोजनापूर्वीच सूप वाजणार असल्याचे सुस्पष्ट चित्र सध्या दिसू लागले आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी संस्थेचे अधिकारी श्रीवास्तव यांना विविध कामाच्या सद्यःस्थितीचा अहवाल देण्याचे आदेश नुकतेच दिले होते. उद्याच्या बैठकीत हा अहवाल संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री कामत यांना सादर करतील असा अंदाज आहे.
गेल्या वर्षी इफ्फीच्या कार्यक्रमांची कंत्राटे समितीवरील सदस्यांनाच लाटण्यात आली होती. त्यामुळे त्यावरून मोठे वादंग निर्माण झाले होते. तथापि असे असतानाही संस्थेने त्यातून काहीच बोध घेतला नसल्याचे जाणवत आहे. कारण यंदाही क्रिएटीव्ह कमिटीवरील सदस्यांनाच विविध कंत्राटे देण्याचा संस्थेचा सपाटा सुरूच आहे. निवास व्यवस्थेसाठी हॉटेल तसेच इफ्फीच्या बाहेरील कार्यक्रमांची कंत्राटे ही समितीवरील सदस्यांनाच देण्यात आली आहेत. संस्थेच्या या निर्णयाला काही सदस्यांचा विरोध आहे. ही एकंदर परिस्थिती पाहता विविध वादग्रस्त विषयांवरून उद्या होणारी संस्थेच्या कार्यकारी समितीची बैठक अत्यंत वादळी ठरेल असा अंदाज आहे. या बैठकीवरच यंदाच्या इफ्फीचे भवितव्य अवलंबून असेल.

No comments: