Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 2 November, 2009

पाश्चात्त्य संगीत वाद्यवृंदांना प्राधान्य

"इफ्फी'त स्थानिकांना दुय्यम स्थान?
पणजी, दि. १ (प्रतिनिधी)- "इफ्फी'मध्ये स्थानिक कलाकारांना वाव न देता पाश्चात्त्य संगीत वाद्यवृंदाचे कार्यक्रम आयोजित करण्याचा गोवा मनोरंजन संस्थेचा इरादा असून त्यामुळे आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आता आणखी एका नव्या वादाची ठिणगी उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ना त्या कारणाने वेगवेगळ्या वादात गुरफटलेल्या इफ्फीभोवती आता सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाच्या मुद्यावरूनही वाद उद्भवण्याचे संकेत संस्थेच्या या इराद्यामुळे समोर आले आहेत.
२००७ व २००८ च्या इफ्फीवेळी गोवा मनोरंजन संस्थेने नेमलेल्या कार्यक्रम समितीच्या आधिपत्याखाली आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमावर जोरदार टीका झाली होती. सदर समितीवर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या निकटवर्तीयांचीच वर्णी लावण्यात आली होती. या समितीच्या सदस्यांनीच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाची कंत्राटे मिळविल्याचे आरोप त्यावेळी होत होते.
गोवा विधानसभेतही राज्य सरकारवर विरोधी सदस्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाची कंत्राटे आपल्याच मर्जीतील लोकांना वाटल्याचा आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या इफ्फीत संस्थेने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत करू नयेत असे ठरले होते. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाची जबाबदारी सरकारच्या कला व संस्कृती खात्याकडे सोपविण्याचा निर्णय संस्थेने घेतला होता.
तथापि, संस्थेने यासंदर्भात कला व संस्कृती खात्याला कोणतीही कल्पना दिली नसल्याने कला व संस्कृती खात्याने कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत पावलेच उचललेली नाहीत. त्यामुळे इफ्फी अवघ्याच दिवसांवर येऊन ठेपला असताना इफ्फीतील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. त्यामुळेच संस्थेने पाश्चात्त्य वाद्यवृंद गटांचे कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी विधानसभेत राज्याच्या सर्व अकरा तालुक्यांत इफ्फीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले होते. पण सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाबाबतचा संस्थेची संथ कार्यपध्दती पाहता मुख्यमंत्री सदरहू आश्वासन पाळू शकतील का, याबाबत तशी शंकाच आहे.
संस्थेने सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत घेतलेल्या संथ भूमिकेमुळे आता ऐनवेळी कार्यक्रमांचे आयोजन करणेही मुश्कील होऊन बसले आहे. त्यामुळेच आता आपलाच आधीचा निर्णय फिरविण्याचा प्रयत्न संस्थेने चालविला आहे. त्यासाठी कार्यक्रम समितीच्या एक सदस्यामार्फत काही पाश्चात्त्य वाद्यवृंदाचे कार्यक्रम नवीन पाटो पूल ते कला अकादमीपर्यंतच्या पदपथांवर करण्याचा प्रस्तावही संस्थेच्या विचाराधीन आहे. या कार्यक्रमांसाठी पदपथांवर रंगमंचही उभारण्याचा प्रस्ताव आहे.
दरम्यान, संस्थेच्या या प्रस्ताव वजा प्रयत्नाला स्थानिक कलाकारांकडून प्रखर विरोध दर्शविला असून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे त्याविषयी आवाज उठविण्याचा आपला इशारेवजा इरादाही या कलाकारांनी दै. "गोवादूत'च्या या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केला आहे. स्थानिक कलाकारांची भूमिका लक्षात घेता आता सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावरून इफ्फीत आणखी एका वादाची भर पडेल हे अगदीच स्पष्ट आहे.

No comments: