Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 1 November, 2009

सांकवाळला सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण

'सनातन'शी संबंधित दोघांना अटक
पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पूर्वसंध्येला सांकवाळ येथे सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात हात असल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष पोलिस पथकाने आज दोघा तरुणांना अटक केली. हे दोघेही तरुण फोंड्याचे रहिवासी आहेत. विनय तळेकर (२७) व विनायक पाटील (३०) अशी त्यांची नावे असून ते दोघेही सनातन संस्थेशी संबंधित असल्याचा दावा पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी केला. मडगाव येथे झालेला स्फोट व सांकवाळ येथे सापडलेली स्फोटके यात सकृतदर्शनी तथ्य दिसत असून याप्रकरणात या दोघा तरुणांचाही सहभाग असल्याचे धागेदोरे पोलिसांना सापडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
आज पोलिस मुख्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत श्री. देशपांडे बोलत होते. या दोघा तरुणांना वास्को येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांना १३ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. या दोघांच्या अटकेमुळे या प्रकरणाच्या चौकशीला वेग येऊ शकेल. तसेच आणखी काही धागेदोरे मिळू शकतील, असेही देशपांडे यांनी सांगितले.
या कटात आणखी काही जणांचा सहभाग असू शकतो. त्यामुळे आगामी काळात अन्य काहींना ताब्यात घेण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून या दोघा तरुणांची पोलिस चौकशी करीत होते. या चौकशीत सांकवाळ येथे सापडलेली स्फोटके पेरण्यात त्यांचा हात असल्याची खात्री पोलिसांना पटली. त्यानंतर आज सकाळी मडगाव येथे पहाटे त्यांना अटक करण्यात आली.
मडगाव स्फोटात ठार झालेल्या मालगोंडा पाटील व योगेश नाईक यांच्याशी या दोघांचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. विनायक पाटील हा मूळ बेळगावचा. तो फोंडा येथे राहात होता व व्यवसायाने चालक आहे. विनय तळेकर हा "एमबीए' असून सुरुवातीला तो एका पंचतारांकित हॉटेलात नोकरीवर होता. ती सोडून नंतर तो वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करू लागला होता. तोदेखील फोंडा येथेच राहायचा. या दोघांचा सनातन संस्थेशी संबंध होता व सनातनच्या आश्रमातही त्यांचे जाणेयेणे होते,अशी माहितीही पुढे आली आहे. विनय तळेकर व मालगोंडा पाटील हे मित्र होते. आता या स्फोटाशी संबंधित चारही व्यक्ती सनातन संस्थेशी संबंधित असल्याने सनातन संस्थेवर संशयाचे बोट दर्शवले जाणे स्वाभाविक असल्याचे श्री. देशपांडे म्हणाले.
मडगाव व सांकवाळ येथील प्रकरणांचा नेमका सूत्रधार कोण या दिशेने आता तपास सुरू झाला आहे. तथापि, पूर्ण चौकशी न करता एवढ्यातच यासंदर्भात अनुमान काढणे घाईचे ठरेल, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले.
'सनातन'तर्फे निषेध
सांकवाळ स्फोटकांच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या विनायक पाटील व विनय तळेकर या दोघांच्या अपराधी कृत्यांविषयी वर्तवलेल्या प्राथमिक निष्कर्षांवर विश्वास ठेऊन या दोघांनी केलेल्या या समाजविघातक कृत्यांचा सनातन संस्थेतर्फे निषेध करण्यात येत असल्याचे संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त वीरेंद्र मराठे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. हे दोघेही सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होते आणि प्रासंगिक सेवाही करत होते. सामाजिक सुधारणा केवळ समाजप्रबोधनाच्या मार्गानेच होऊ शकतात. स्फोटकांसारख्या रक्तरंजित माध्यमातून समाजातील अपप्रवृत्ती नष्ट होऊ शकणार नाही, त्यामुळे स्फोटकांसारख्या विकृतींना सनातन संस्थेच्या कार्यशैलीत स्थान नाही. अशा कोणत्याही समाजविघातक प्रवृत्ती सनातनमध्ये आढळल्यास त्यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही, असे स्पष्टीकरणही यावेळी श्री.मराठे यांनी केले.

No comments: