Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 3 November, 2009

अधिकृत घोषणेपूर्वीच प्रिमियर चित्रपट जाहीर!

वाद इफ्फीचा
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): गोवा मनोरंजन संस्थेने अद्याप इफ्फीतील इंडियन प्रिमियर विभागासाठीच्या चित्रपटांची निवड जाहीर केलेली नसतानाच एका खाजगी इ मेलवरून संबंधित निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटांच्या निवडीची माहिती देण्यात आली आहे. अधिकृतरीत्या निवड जाहीर होण्याआधीच निकाल गुप्तपणे उघड करण्यात आल्याने या विभागाला अपशकून करण्याचा विघ्नसंतोषी गटाचा कुटील डाव उघडकीस आला आहे.
वरील विभागासाठी आलेल्या पंचवीस चित्रपटांमधून सात चित्रपटांची निवड निश्चित झाली आहे. मात्र या निवडीला अद्याप संस्थेच्या कार्यकारी समितीची मान्यता मिळालेली नाही. समितीची यासंबंधीची बैठक उद्या होणार आहे. तथापि त्याआधीच एका खाजगी इ मेलवरून चित्रपटांची निवड संबंधित निर्मात्यांना त्यांच्या इ मेलवर कळविण्यात आली आहे. संबंधित निर्मात्यांनीही या गोष्टीला दुजोरा देताना तसा इ मेल आपल्याला मिळाल्याचे मान्य केले आहे.
महत्त्वाचे म्हणजे इफ्फी ऐन तोंडावर आलेला असतानाच इफ्फीला गालबोट लावण्यासाठीच हे कट कारस्थान आखले गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही संबंधित विभागाच्या चित्रपटांची निवड अद्यापही घोषित करण्यात आलेली नाही, अशी माहिती दिली. उद्या कार्यकारी समितीची बैठक होत असून त्यानंतरच ती यादी जाहीर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ज्या खाजगी इ मेलवरून संबंधित निर्मात्यांना निवड कळविण्यात आली आहे तो इ मेल मोनिका भसीन यांचा आहे. भसीन यांची इंडियन प्रिमियर विभागाच्या समन्वयक म्हणून सुरुवातीस नेमणूक करण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीवास्तव यांनीच त्यांची नेमणूक केली होती. तथापि, नंतर संस्था व भसीन यांच्यातील मतभेदांची दरी रुंदावत गेल्याने त्यांनी पदत्याग केला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून त्या कामावर गैरहजर असून त्यामुळे या विभागाची निवड प्रक्रियाही रखडली गेली आहे.
चित्रपटांची निवड ज्या मेल पत्त्यावरून खासगीत कळविण्यात आली आहे तो पत्ता monicabhasin@yahoo.com असा असून या मेलद्वारे निवड झालेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांना चित्रपटांतील दृश्यांची तीन छायाचित्रे, दिग्दर्शकाचे छायाचित्र व माहिती आपल्याला पाठविण्याची सूचना त्यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर त्याची प्रत fiona@iffigoa.org या पत्त्यावरही पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चित्रपट निर्मात्यांचे चित्रपटांच्या निवडीबद्दलही त्यात अभिनंदनही करण्यात आले आहे.
यासंदर्भात भसीन यांच्याशी संपर्क साधला असता अत्यंत चिडलेल्या स्वरात, मी त्याबाबत आपल्याला का म्हणून माहिती देऊ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. आपल्याला जे काही विचारायचे आहे ते संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांनाच विचारा असेही त्या म्हणाल्या.

No comments: