Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 21 January, 2009

पक्ष कार्यालयात बोलावून अधिकाऱ्यांचा अपमान नको भाजपकडून तीव्र निषेध

पणजी, दि.२०(प्रतिनिधी): सरकारी अधिकारी हे जनतेचे सेवक असले तरी त्यांना पक्ष कार्यालयात बोलावून कार्यकर्त्यांसमोर अपमानीत करणे किंवा आदेश देणे ही गोष्ट पूर्णपणे आक्षेपार्ह आहे. सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीची वागणूक देणे हे बेकायदा असून भाजप याचा तीव्र निषेध करीत असल्याचे सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत स्वतःच्या सरकारच्या यशाबद्दल कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मोठ्या घोषणा करत असले तरी त्यांच्या सरकारची लक्तरे न्यायालयाकडून वारंवार वेशीवर टांगली आहेत. न्यायालयाच्या ताशेऱ्यांबद्दल कामत यांनी जनतेला उत्तर द्यावे,असे आवाहनही श्री.पर्वतकर यांनी केले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी आपल्या पक्ष कार्यालयात मंत्र्यांना बोलावणे ठीक आहे. तथापि, मंत्र्यांनी स्वतःबरोबर सरकारी अधिकाऱ्यांना पक्ष कार्यालयात नेणे सपशेल चुकीचे व आक्षेपार्ह आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी काल आपल्या खात्याच्या अधिकाऱ्यांना कॉंग्रेस पक्ष कार्यालयात नेऊन सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट त्वरित बंद करावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली. दक्षता खात्याने कॉंग्रेस कार्यालयात गेलेल्या अधिकाऱ्यांना समज द्यावी व यापुढे हे प्रकार टाळावेत. याची पुनरावृत्ती झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी प्रा. पर्वतकर यांनी केली आहे.

No comments: