Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 21 January, 2009

खारीवाडा जेटी बंदीची 'एमपीटी'तर्फे शिफारस तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): मुंबईवर अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या
पार्श्वभूमीवर भारतीय किनारे असुरक्षित असल्याचे दिसून आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या ("एमपीटी') बर्थ क्रमांक अकरापाशी असलेली खारीवाडा मच्छिमारी जेटी बंद करावी, अशी शिफारस "एमपीटी'ने किनारारक्षक दल व नाविक दलाकडे केली आहे. दरम्यान, या निर्णयाचे तीव्र पडसाद खारीवाडा भागात उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने "एमपीटी'ला घातक ठरलेली ही जेटी बंदर विकास प्राधिकरण व केंद्र सरकारलादेखील सुरक्षेच्या दृष्टीने डोकेदुखी ठरल्याचे "एमपीटी'चे चेअरमन प्रवीण अगरवाल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
बंदरात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय जहाजांनी या जेटीबाबत सातत्याने चिंता व्यक्त केली आहे. तेथे वावरत असलेले मच्छिमारी ट्रॉलर्स, होड्या बंदरात येणाऱ्या जहाजांना धोकादायक ठरत असल्याच्या तक्रारी त्यांच्याकडून येत आहेत. काही वेळा मच्छिमार जवळच जाळे टाकून व्यवसाय करतात. त्यामुळेच त्यावर बंदी घालण्याची शिफारस भारतीय किनारारक्षक दल आणि नाविक दलाकडे करण्यात आल्याचे एमपीटीने म्हटले आहे.
तसेच खारीवाडा झोपडपट्टी ही गेल्या ३० वर्षांपासून बेकायदा कृत्यांचा अड्डाच बनल्याचे एमपीटीने म्हटले आहे. तेथे या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या मच्छिमारी बोटी या गोवा फिशिंग ट्रॉलर्स आणि बोट संघटनेच्या नसतात. इंटरनॅशनल शिप्स ऍन्ड पोर्टस फॅसिलीटी कोड, २००४ मध्ये अस्तित्वात आल्यापासून या जेटीमुळे एमपीटीचा व्यवसाय बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जेथे आंतरराष्ट्रीय जहाजे नांगरली जातात तेथे या नियमाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. तसे होत नसल्याचे निदर्शनास आल्यास ही जहाजे या बंदराचा वापर करणे बंद करतील व त्याचा विपरीत परीणाम एमपीटीबरोबरच राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवरही होईल. सुरक्षेच्या दृष्टीने सरकारच्या विविध समित्यांनी खारीवाड्याचे स्थलांतर करण्याचे आदेश दिले अलीकडेच दिले आहेत. याकामी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून एमपीटीने खारीवाड्याच्या स्थलांतराची जबाबदारी घेण्याची तयारीही दाखविली आहे. मात्र गोवा सरकारच्या असहकार्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्य सरकारने मालीम, बेतूल, कुठ्ठाळी, आणि शापोरा जेटींचा दर्जा उंचाविण्यासाठी पावले उचललेही आहेत. तथापि, खारीवाड्याकडे दुर्लक्ष चालवले आहे. या स्थितीकडे गंभीरतेने पाहिल्यास एमपीटीला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही जेटी सक्तीने बंद करावी लागेल.
---------------------------------------------------
३ फेब्रुवारी रोजी बैठक
'एमपीटी'ने खारीवाडा जेटीविषयी चर्चेसाठी गेल्या १६ रोजी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. मात्र तिला योग्य प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे आता एमपीटीने ३ फेब्रुवारी रोजी पुन्हा उच्चस्तरीय बैठक आयोजिली आहे. या बैठकीला ज्येष्ठ मंत्री व संबंधित संघटना यांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.

No comments: