Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 24 January, 2009

पंतप्रधानांवर आज 'बायपास' शस्त्रक्रिया

नवी दिल्ली, दि. २३ : पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या ह्दयाची "ऍन्जिओग्राफी' आणि इतर चाचण्या नुकत्याच करण्यात आल्या होत्या. रक्ताभिसरणात काही अडथळे निर्माण झाल्याचे आढळून आल्यामुळे शनिवारी त्यांच्या ह्दयावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात बायपास शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पंतप्रधान आज एम्समध्ये दाखल झाले आहेत.
पंतप्रधान कार्यालयाचे प्रवक्ते दीपक संधू यांनी, २४ जानेवारीला एम्स रुग्णालयात पंतप्रधानांवर "कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट सर्जरी' केली जाणार असल्याचे सांगितले. एम्स आणि एशिया हार्ट इन्स्टिट्यूट, मुंबई, येथील चिकित्सकांचा एक गट ७६ वर्षीय डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शस्त्रक्रिया करणार आहे. शस्त्रक्रिया करणार असलेल्या चिकित्सकांच्या या गटाला एम्सच्या विविध विभागांचे चिकित्सक आणि तांत्रिक कर्मचारी सहकार्य करणार आहेत.
याआधी त्यांच्यावर झालेल्या ऍन्जिओग्राफी आणि इतर चाचण्यांनंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. पंतप्रधान कार्यालयातून गुरुवारी रात्री जारी झालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांची देखभाल करणाऱ्या चिकित्सकांच्या गटाकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठीची तयारी करण्यात येत आहे. चिकित्सकांच्या निरनिराळ्या गटांचे नेतृत्व पंतप्रधानांचे वैयक्तिक चिकित्सक डॉ. के. एस. रेड्डी करीत आहेत. पंतप्रधानांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर चाचणीचा निर्णय घेण्यात आला होता. या अगोदर १९९० मध्ये ब्रिटनमध्ये पंतप्रधानांची "कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी' करण्यात आली होती. काही वर्षानंतर त्यांची "ऍन्जिओप्लास्टी' झाली होती.
पंतप्रधान तपासणीसाठी मंगळवारी इस्पितळात गेले होते. मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात त्यांची "कोरोनरी ऍन्जिओग्राफी' झाली. त्यांना बुधवारी संध्याकाळी रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. त्यानंतर ते आपल्या सरकारी निवासस्थानातूनच कार्यालयीन कामे करीत होते. गणतंत्र दिनानिमित्त होणाऱ्या समारंभातही पंतप्रधान सहभागी होतील की नाही, याचा निर्णय अजून झालेला नसल्याचे सूत्रांकडून कळते.
शस्त्रक्रिया एम्समध्येच
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरील शस्त्रक्रिया अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) येथेच होणार असल्याची पुष्टी केंद्रीय आरोग्य मंत्री अंबुमणी रामदास यांनी केली. रामदास आज एम्समध्ये पंतप्रधानांना भेटायला गेले होते.

No comments: