Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 19 January, 2009

बायंंगिणीत कचरा प्रकल्पाच्या
विरोधात तीव्र आंदोलन छेडणार
पणजी-फोंडा मार्ग रोखणार
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) ः पणजी महापालिकेचा कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यासाठी सरकारने पालिकेला बायंगिणी येथे दिलेली जमीन येत्या सात दिवसांत मागे न घेतल्यास पणजी फोंडा मार्ग पूर्णपणे बंद करण्याचा इशारा आज जुने गोवे येथे झालेल्या जाहीर सभेत देण्यात आला. पणजी शहरातील कचरा बायंगिणी येथे टाकण्यास आज पुन्हा एकदा जुने गोवे येथील पंचायत सभागृहात झालेल्या जाहीर सभेत तीव्र विरोध करण्यात आला. तसेच सरकारने पणजी महापालिकेला कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यासाठी देण्यात आलेली जागा मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असून कचऱ्याची एक टोपलीही याठिकाणी टाकण्यास दिला जाणार नसल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. सरकारला यावर निर्णय घेण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली असून मुदत संपताच मोठ्या संख्येने सरकारविरुद्ध मोर्चा काढला जाणार असल्याचा इशारा यावेळी माजी आमदार कृष्णा कुट्टीकर यांनी दिला.
यावेळी जुने गोवे पंचायतीच्या सरपंच जेनीता मडकईकर, जुने गोवे नाणीज संप्रदायाचे अध्यक्ष मारुती नास्नोडकर, फा. मावरिन फर्नांडिस तसेच अन्य पंच सदस्यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बायंगिणी येथे कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यास एकमताने विरोधा करण्यात आला. गेल्या आठवड्यात बायंगिणी येथील ही प्रस्तावित जागा सरकारने महापालिकेच्या ताब्यात दिल्याने ती त्वरित मागे घेण्याची सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. समितीने आपला अहवाल देण्यापूर्वीच सरकारने ही जागा पालिकेच्या ताब्यात कशी दिली, अशा प्रश्न यावेळी कारिदास संस्थेचे फा. वालेरियन यांनी केला. यावेळी प्रखर शब्दात टीका करीत ते म्हणाले, ""अशा राजकारण्यांना ओळखून येत्या निवडणुकीत जनतेने त्यांना घरची वाट दाखवावी''
गेल्या एका वर्षापासून हा कचऱ्याचा प्रश्न धगधगत असून कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारावा तर तो कुठे उभारावा, असा प्रश्न पालिकेसमोर उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पणजी महापालिकेला बायंगिणी येथे कचरा टाकण्यासाठी कायम जागा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दोन दिवसापूर्वीच दिले होते. त्यानंतर जागा ताब्यात देण्याच्या प्रक्रियाही पूर्ण झाल्यात. याची माहिती मिळताच येथील माजी आमदार कुट्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली काही सदस्यांनी मुख्य सचिव जे पी. सिंग यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. आज सायंकाळी जुने गोवे येथे झालेल्या जाहीर सभेत सरकारच्या या कृतीचा जाहीर निषेध करण्यात आला.
जुने गोवे परिसरात सर्व धर्मांची श्रद्धा स्थाने असून याठिकाणी कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारल्यास येथे लोकांना येणेही कठीण होऊ जाणार. तसेच ज्या ठिकाणी हा प्रकल्प उभारल्या जात असून त्याच्या नजीकच जलस्रोत असून तेही दूषित व नष्ट होण्याची भिती यावेळी वक्त्यांनी व्यक्त केली.

No comments: