Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 22 January, 2009

राज्य सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळात दुफळी

अध्यक्ष रामचंद्र मुळे यांच्याविरोधात अविश्वास
पणजी,दि.२१(प्रतिनिधी) : गोवा राज्य सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळात सरळ फूट पडली असून विद्यमान अध्यक्ष रामचंद्र मुळे हे अल्पमतात आल्याचा दावा विरोधी गटाने केला आहे.संचालक मंडळावर आपले वर्चस्व ठेवण्यासाठी श्री.मुळे यांनी उदय प्रभू यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदावर आपल्याच नात्यातील राजू नाईक यांची संचालकपदी केलेली निवड बेकायदा असून या निवडीस आव्हान दिल्याची माहिती राजकुमार देसाई यांनी दिली. दरम्यान,श्री.मुळे यांनी आपण अजूनही बहुमतात असून विरोधकांनी केलेले सर्व दावे फेटाळले आहेत.
सहकार सेवा संघटनेतर्फे करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून या गटाकडून बॅंकेची बदनामी सुरू असल्याचा आरोप रामचंद्र मुळे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. आपणाला एकूण दहा संचालकांचा पाठिंबा असल्याचा दावा करून दमण व दीव विभागाचे दोन संचालक आपल्याबरोबर असल्याचे श्री.मुळे म्हणाले. ५५ कोटी रुपयांच्या बॉंड प्रकरणी तत्कालीन प्रकाश वेळीप गट जबाबदार असून संबंधितांविरोधात पोलिस तक्रार दाखल केल्याचे ते म्हणाले.
मुळातच या बॉंडचे भाव घसरल्याने ते सुपूर्द करण्याची शिफारस "नाबार्ड'ने आपल्या ऑडिट अहवालात केली असली तरी त्यामुळे कोट्यवधींचा फटका बसणार असून त्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होणार असल्याचा दावाही श्री.मुळे यांनी केला.या बॉंडची अंतिम मुदत २०२८ असून त्यामुळे या नुकसानीबाबतची २० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगून भविष्यात आणखी तरतूद केली जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.
उदय प्रभू यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर राजू नाईक यांची केलेली निवड कायदेशीर असल्याचा दावाही त्यांनी केला.मध्यप्रदेश वित्त महामंडळात गुंतवणूक केलेले ५० लाख रुपयांचे बॉंड पूर्ण सुरक्षित आहेत.मध्यप्रदेशची विभागणी झाल्याने छत्तीसगड राज्याची निर्मिती झाल्याने हे बॉंडही विभागले गेले.दरम्यान,मध्यप्रदेशकडे असलेले पैसे व्याजासह मिळाले असून छत्तीसगढकडून केवळ मुद्दल देण्याचा प्रस्ताव बॅंकेने फेटाळला असून ही रक्कमही व्याजासह वसूल केली जाईल,असेही ते म्हणाले.
मुळातच विद्यमान संचालक मंडळावर आरोप करणाऱ्या या लोकांची पार्श्वभूमी पाहिल्यास त्यांना आरोप करण्याचा कोणताच नैतिक अधिकार नसल्याचा दावा सहकार मंचचे ऍड.विनायक नार्वेकर यांनी केला आहे.प्रदीप नाईक,प्रेमानंद चावडीकर व सदानंद वायंगणकर यांची सहकार क्षेत्रातील पार्श्वभूमी पाहिल्यास त्यांची ही चिखलफेक केवळ स्वार्थी हेतूने प्रेरित असल्याची टीकाही यावेळी केली.
------------------------------------------------------------------
मुळे अल्पमतात आल्याचा दावा
विद्यमान अध्यक्ष रामचंद्र मुळे हे अल्पमतात असल्याचा दावा विरोधी गटाने केला आहे.या गटाच्या एकूण आठ संचालकांनी बॅंकेच्या मुख्यालयासमोर हजर राहून शक्तीप्रदर्शन केले. मुळातच दमण व दीव विभागाच्या दोन्ही संचालकांनी आपला पाठिंबा या गटाला दिला असून मुळे यांच्या विरोधात दाखल करण्यात येणाऱ्या अविश्वास ठरावावर त्यांनी सह्या केल्याचे खुद्द आपल्या तोंडून सांगितले. दरम्यान,मुळे यांच्या विरोधात गेलेल्या गटांत विद्यमान उपाध्यक्ष अवेलिनो मार्को डिसील्वा,राजकुमार देसाई,विठ्ठल वेर्णेकर,वनिता खेडेकर,श्रीकांत नाईक,नारायण मांद्रेकर,मोहनभाई तांडेल व रमेशभाई बामानिया यांचा समावेश होता. श्री.मुळे यांच्याविरोधात सहकार निबंधकांकडे अविश्वास दाखल करण्यात येणार असल्याचे सांगून आपल्या पदाला चिकटून राहण्याची त्यांची जुनी सवय जात नसेल तर प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचे राजकुमार देसाई यांनी सांगितले आहे.श्री.मुळे यांनी चालवलेल्या या एकाधिकारशाहीला संचालक मंडळावर असलेल्या सरकारी प्रतिनिधींकडूनही आश्रय मिळत असल्याने बॅंकेची आर्थिक स्थिती बिघडत चालल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

No comments: