Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 24 January, 2009

सचिनची सही त्यांना अखेर मिळालीच नाही

वास्को, दि.२३ (प्रतिनिधी): 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर यांचे आज संध्याकाळी गोव्यात आगमन झाले तेव्हा कडक सुरक्षेमुळे त्याच्या चाहत्यांना सचिनचे दूरुनच "दर्शन' घेण्यावर समाधान मानावे लागले. त्यातील अनेकांना सचिनची स्वाक्षरी हवी होती तर काहींना त्याच्याशी संवाद साधायचा होता, मात्र अखेर त्यांच्या पदरी निराशाच पडली.
संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सचिनचे आगमन किंगफीशरच्या विमानातून दाबोळी विमानतळावर झाले. तो गोव्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या चाहत्यांना मिळाली होती. त्यामुळे सुमारे दोन तास त्यांनी विमानतळावरच ठिय्या दिला होता. नंतर ही गर्दी वाढतच गेली. अर्थात, सचिन विमानतळावर दाखल झाला तेव्हा त्याचा ताबा सुरक्षा रक्षकांनी घेतला.
विमानतळावर उतरल्यानंतर सुरक्षा जवानांनी त्याला जणू गराडाच घातला होता. त्यामुळे त्याचे छायाचित्र टिपतानाही माध्यमांच्या छायाचित्रकारांना कसरत करावी लागली. नंतर खास गाडीत बसून तो भुर्रकन निघून गेलासुद्धा आणि त्याला पाहण्यासाठी आलेली मंडळी वाऱ्याच्या वेगाने निघालेल्या मोटारीकडे पाहातच राहिली...
मिळालेल्या माहितीनुसार सचिनचे वास्तव्य पार्क हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये असेल. तेथेच आयोजित करण्यात आलेल्या एका आस्थापनाच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी तो आला आहे. या परिषदेला उपस्थिती लावून नंतर उद्या तो गोव्यातून रवाना होणार आहे. विशेष म्हणजे दाबोळी विमानतळावरून कडक सुरक्षेत बाहेर काढलेल्या सचिनला आपल्या हॉटेलात जात असताना त्याच्यासोबत सुरक्षा जवान दिसून आला नसल्याने उपस्थित चाहत्यांकडून आर्श्चय व्यक्त करण्यात आले.

No comments: