Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 21 January, 2009

'रिव्हर प्रिन्सेस' हटवा; अन्यथा तीव्र आंदोलन

पणजी, दि. २०(प्रतिनिधी): कांदोळी किनाऱ्यावर ६ जून २००० रोजी रुतलेले "रिव्हर प्रिन्सेस' हे तेलवाहू जहाज तेथून तातडीने न हटवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिव्हर प्रिन्सेस हटाव मंचने सरकारला दिला आहे.
याप्रश्नी तोडगा काढण्यात राज्य सरकारला पूर्ण अपयश आले आहे.या जहाजामुळे पर्यावरणाला धोका उत्पन्न झाला आहे. ही स्थिती अशीच राहिली तर तेथील रहिवाशांवर गंडांतर येण्याचा धोका संभवतो, असे मंचने म्हटले आहे. आज पणजीत झालेल्या पत्रपरिषदेत मंचचे निमंत्रक फेर्मिनो फर्नांडिस यांनी ही माहिती दिली.यावेळी सचिव व्हर्नर कॉस्टा फ्राइस व खजिनदार ब्लेझ फर्नांडिस उपस्थित होते.
कांदोळी किनाऱ्यावर "रिव्हर प्रिन्सेस' रुतली त्याला आता आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीदेखील हे जहाज हटवणे सरकारला शक्य झालेले नाही हे दुर्दैव असल्याची टीका यावेळी करण्यात आली. याबाबत अलीकडेच राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार हे जहाज कांदोळी किनाऱ्यावर असेच राहिल्यास किनाऱ्याची धूप होऊन मनुष्य व संपत्तीची हानी होण्याचा धोका संभवतो.
याप्रकरणी सरकारकडे सर्व प्रकारचा पत्र व्यवहार करूनही केवळ आश्वासनांव्यतिरिक्त काहीही कृती होत नसल्याने आता येथील लोकांनाच रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.हे जहाज म्हणजे राज्यस्तरीय आपत्ती घोषित करावे आणि ते हटवण्याकामी केंद्राची मदत घ्यावी, अशी मागणी मंचने केली आहे.
१७ डिसेंबर २००८ रोजी रास्ता रोको केल्यानंतर मुख्यमंत्री कामत यांनी याबाबत तात्काळ निर्णय घेण्याची घोषणा केली; परंतु अद्याप कोणतीही ठोस कृती न झाल्याचे फेर्मिनो यांनी निदर्शनाला आणून दिले. सरकारने याप्रकरणी आश्वासक कृती केली नाही तर हे आंदोलन तीव्र करण्याखेरीज पर्याय नसल्याचे त्यांनी जोर देऊन सांगितले,
पर्यटन खात्याने दखल घेण्याची गरज
राज्याचे विज्ञान व पर्यावरण मंत्री या नात्याने आपण या जहाजाबाबत वेळोवेळी पर्यटन खात्याला सूचना केल्या आहेत. त्यामुळे पर्यटन खात्याने आता याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे आलेक्स सिकेरा म्हणाले. हे जहाज पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक बनल्याचे अनेक अहवालांद्वारे सिद्ध झाले आहे व याची जाणीव वेळोवेळी पर्यटन खात्याला करून दिल्याचे ते म्हणाले.

No comments: