Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 19 January, 2009

कोलवा किनारी व्यवस्थापन
प्रकल्पावर वादळी चर्चा
स्थानिकांकडून जोरदार आक्षेप
मडगाव,दि. १८ (प्रतिनिधी) - कोलवा किनारा व्यवस्थापन प्रकल्पासंदर्भात बोलावलेल्या बैठकीत आज स्थानिक रहिवाशांनी विविध प्रश्र्न उपस्थित करून संबंधितांना निरुत्तर केले व येथील टेकड्या उध्वस्त करण्याच्या सर्रास चालू असलेल्या प्रकारांना सरकार जी मूक संमती देते त्याचे काय, असा सवाल केला. त्यामुळे आज या योजनेवर कोणताच निर्णय न होता पुन्हा एक बैठक घेण्याचे ठरले.
कोलवा किनाऱ्याची जी प्रचंड झीज चालू आहे ती रोखण्याच्या प्रयत्नात हा कोलवा किनारा व्यवस्थापन प्रकल्प तयार केला गेला असून तो एका बैठकीत आज सादर केला गेला. आशियाई विकास बॅंकेकडून या योजनेला मदत मिळणार आहे. या योजनेनुसार काही ठिकाणी वाळूच्या नवीन टेकड्या तयार करणे,तर काही टेकड्या समपातळीत आणणे, काही जागी पाण्याने नाले बांधणे, वृक्षारोपण करणे, निसर्ग पर्यटनाला उत्तेजन देणे असे प्रस्ताव आहेत. त्यांचे सादरीकरण लोकांच्या हरकतीमुळे आज झाले नाही.
एकंदर या प्रस्तावांकडेच स्थानिकांची संशयाची नजर दिसून आली. गेली कित्येक वर्षें पंचतारांकित हॉटेलांची बांधकामे अशा वाळू टेकड्या नाहीशा करून त्या जागीच होऊ दिले अन् आता सरकारला या टेकड्यांचा पुळका कां आला असा सवाल केला गेला . अगदी हल्लीपर्यंत अशा टेकड्या नाहीशा केल्या गेल्या काही वेळा तर ते काम करणाऱ्यांना पोलिस संरक्षणही दिले गेले असा आरोप करून सरकारला खरोखरच किनारा रक्षण हवे आहे की या कार्यक्रमाखाली येथे आणखी कसला प्रकल्प आणण्याचा हा डाव आहे असा सवाल केला गेला.
शेवटी आणखी एक बैठक घेण्याचा निर्णय घेऊन आजची बैठक आटोपती घेतली गेली मात्र नव्या बैठकीची तारीख निश्र्चित केली गेली नाही. कोलवा -सेर्नाभाटी , उतोर्डा व माजोर्डा पर्यंतच्या किनारी रक्षण व संवर्धनासाठीची ही योजना आहे.

No comments: