Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 18 October, 2008

सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव बोनस जाहीर

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची बक्षिसी जाहीर झाल्यानंतर आता दिवाळीच्या बोनसची घोषणा करून सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा आनंद व्दिगुणीत केला आहे.
राज्य सरकारच्या वित्त खात्याने परवा जारी केलेल्या परिपत्रकानुसार यंदाच्या वर्षी प्रत्येक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा राजपत्रित अधिकारी वगळता सर्व कर्मचाऱ्यांना ४४४१ रुपये बोनस मिळणार आहे. ही माहिती वित्त खात्याच्या सूत्रांनी दिली.
या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारने बोनसच्या रकमेत वाढ केल्याने प्रत्येकाच्या बोनसात सुमारे एक हजार रुपयाची वृद्धी होणार आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांना अडीच हजाराच्या आसपास ही रक्कम मिळत होती परंतु या वर्षी त्यात २००६-०७ ची थकबाकी मिळून व वाढीव बोनसचा लाभ मिळून ही रक्कम ४४४१ एवढी होणार आहे. दरम्यान,बोनसप्रकरणी केंद्र सरकारच्या नियमानुसारच राज्य सरकार निर्णय घेत असल्याने केंद्राने ही रक्कम वाढवल्याने त्यात वाढ करणे राज्य सरकारला क्रमप्राप्त ठरले आहे. या संदर्भात सर्व खाते प्रमुखांना आदेश देण्यात आले असून या बोनसमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे ६ कोटी रुपयांचा भार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. एरवी दिवाळीला सरकारी कर्मचाऱ्यांना केवळ बोनस देण्यात येत होता; परंतु यावेळी दिवाळी २८ ऑक्टोबर रोजी आल्याने बोनससोबत पगारही देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

No comments: