Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 18 October, 2008

श्रेष्ठी रवींच्या पाठीशी बाबूश समर्थकांना हादरा

पणजी, दि.१७ (प्रतिनिधी): शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा मुलगा रोहित याच्यावर जर्मन अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी कोणतीही कारवाई करू नये यासाठी सरकारमधील एका गटाने सुरू केल्या दबावतंत्रास बळी न पडण्याची भूमिका शासकीय पातळीवर घेण्यात आल्याने या गटाची सध्या जोरदार पीछेहाट झाली असल्याचे कळते. मोन्सेरात यांना लक्ष्य केल्यास सरकारला धडा शिकवण्याची धमकी देऊन गेल्या दोन दिवसांपासून गटबाजी केलेल्या काहींना आज खुद्द कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक बी. के. हरिप्रसाद यांनी फटकारले असून पोलिसांच्या कामात कोणताही हस्तक्षेप केल्यास ते सहन केले जाणार नाही, असे त्यांनी या गटाला बजावल्याचे समजते. दरम्यान, आज दुपारी पत्रकारांशी बोलताना, मोन्सेरात प्रकरणी सर्वकाही कायद्यानुसारच होईल आणि त्यात कोणाचाही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही असे श्री. हरिप्रसाद यांनी सांगितले. त्यांची ही निग्रही भूमिका म्हणजे मोन्सेरात गटाला जोरदार चपराक असून पोलिस कारवाईला हिरवा कंदील असल्याचे समजले जाते. दरम्यान, मोन्सेरात समर्थक दबाव गटाच्या कोणत्याही दडपणाला बळी न पडण्याचा निर्णय पक्षपातळीवर झाला असून मोन्सेरात व रवी नाईक यांच्यातील संघर्षात पक्ष व मुख्यमंत्री यांनी रवींना झुकते माप दिल्याचे चित्र सध्या दिसते.
विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारात निर्माण झालेल्या नव्या राजकीय वादावर तोडगा काढण्यासाठी गोव्यात दाखल झालेल्या बी.के.हरिप्रसाद यांनी आज मुख्यमंत्री कामत यांच्या आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी बाबूश व गृहमंत्री रवी नाईक यांची भेट घेतली. विद्यमान सरकारातील शिक्षणमंत्र्यांच्या मुलाविरोधात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण सध्या सर्वत्र बरेच गाजत असल्याने त्यामुळे कॉंग्रेसच्या प्रतिमेला जबर हादरा बसला आहे. या प्रकरणामुळे गोव्याचीही बदनामी सुरू झाल्याने दिल्लीत श्रेष्ठींनी याची गंभीर दखल घेतल्याचे ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी,या मताशी पक्ष ठाम असल्याचे हरिप्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले. या प्रकरणी जर कोणी निर्दोष असेल तर त्याने घाबरण्याचे कारणच नाही; परंतु गुन्हेगार निर्दोष सुटता कामा नये,असेही ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणात कॉंग्रेसचा अजिबात सहभाग नाही,असे स्पष्ट करत आघाडीतील एका नेत्याबाबत हा विषय असून त्याबाबत कायद्यानुसार सर्वकाही होईल,असा निःसंदिग्ध निर्वाळा त्यांनी दिला. बाबूश यांच्याबरोबर असलेल्या सत्ताधारी आघाडीतील काही नेत्यांनी रवींकडून गृहखाते काढून घ्या किंवा नेतृत्वबदलाची मागणी केलेली नाही,असा गौप्यस्फोटही हरिप्रसाद यांनी केला. या नेत्यांनी विविध वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिन्यांकडे अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या असतील तर त्याचा येथे काहीही संबंध नसून निदान आपल्याकडे तरी असा कोणताही प्रस्ताव आला नाही,असे म्हणून त्यांनी बाबूश समर्थक आमदारांची दांडीच गूल केली. चर्चिल आलेमाव यांनी काल रात्री झालेल्या बैठकीवेळी बाबूशचा मुद्दा उपस्थित करून श्रेष्ठींवर काही दबाव आणण्याचा प्रयत्न चालवला असता त्यांनी निर्वाणीची तंबी दिल्याची खात्रीलायक माहिती कॉंग्रेसमधील सूत्रांकडून मिळाली आहे. चर्चिल यांनी पुन्हा एकदा पक्षाला "ब्लॅकमेल'करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्याविरोधात सध्या सभापतीसमोर अपात्रता याचिका दाखल झाली आहेच; शिवाय त्यांचीही अनेक प्रकरण गृहखात्याकडे प्रलंबित असल्याने त्यांनी या प्रकरणावरून सरकारला कोंडीत पकडण्याच्या फंदात न पडण्याचा सल्लाच त्यांना देण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री कामत हे सक्षम असून काही अपवाद वगळता सरकार योग्य पद्धतीने चालवत असल्याचे प्रशस्तीपत्रही त्यांनी दिले.
बाबूश खवळले
मुख्यमंत्री कामत यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सुरुवातीस गृहमंत्री रवी नाईक व नंतर बाबूश मोन्सेरात यांना बोलावण्यात आले होते. यावेळी रवी नाईक बाहेर पडल्यानंतर काही काळाने बाबूश बाहेर आले व त्यांनी आपण शिक्षण खात्याशी संबंधित चर्चा करण्यासाठी आत गेलो होतो,असे सांगून पत्रकारांना बगल देण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांनी खोचक प्रश्न केले असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून आपल्याला काहीही बोलायचे नसून कृपया आपल्या तोंडून काहीही वदवून घेऊ नका,असे आर्जव त्यांनी पत्रकारांना केले. गृहमंत्र्यांबद्दल आपल्याला काहीही बोलायचे नाही,असेही ते म्हणाले.
सारेकाही कायद्यानुसारच: रवी नाईक
पोलिस खाते या संपूर्ण प्रकरणाची चौकशी कायद्याच्या चौकटीत राहून करीत आहे. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याची कोणतीच गरज नाही,असे स्पष्टीकरण गृहमंत्री रवी नाईक यांनी केले.आपल्या मुलाविरोधात दाखल झालेल्या तक्रारीबाबत सदर संबंधित बिगर सरकारी संस्थेवर बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान,रवी नाईक अजिबात चिंतामग्न दिसत नव्हते. सुरुवातीस हरिप्रसाद यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत त्यांना विचारले असता या प्रकरणी कोणतेही राजकारण किंवा हेवेदावे नसून पोलिस कायद्यानुसार चौकशी करीत असल्याचे ते म्हणाले. जर कोणी निर्दोष असेल तर त्यांनी घाबरण्याचे कारणच नाही,असा टोलाही त्यांनी हाणला.
--------------------------------------------------------------
भाजपचा कानाला खडा!
विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारातील काही नेत्यांच्या वर्तनाचा कटू अनुभव प्राप्त झालेल्या भाजपने विद्यमान परिस्थितीत शांत राहण्याची ठाम भूमिका घेतली आहे. हा आघाडी सरकारचा अंतर्गत मामला असल्याने त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे भाजपने म्हटले आहे. दरम्यान,आघाडीतील बंडखोर नेत्यांशी पुन्हा एकदा संधान बांधण्याच्या मनस्थीतीत भाजप नाही. गेल्या दोन वेळच्या राजकीय नाट्यांत या नेत्यांचा चांगलाच अनुभव भाजपला आल्याने यावेळी कानाला खडा,अशीच भूमिका भाजपने घेतली आहे. भाजपच्या या भूनिकेमुळे बाबूश समर्थक गटाचे अवसान गळाले आहे. केवळ बाबूश यांना सहानुभूती दाखवण्यासाठी कालपर्यंत त्यांची तळी उचलून धरणारे नेते आता आपली कातडी वाचवण्याच्या प्रयत्नात असल्याचीही कुरबूर सत्ताधारी पक्षात सुरू आहे.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys