Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 14 October, 2008

आज 'कुंकळ्ळी बंद' संपूर्ण दक्षिण गोव्यात 'हाय ऍलर्ट'

मडगाव, दि. १३ (प्रतिनिधी) : देवआजोबा राखणदेवाच्या घुमटीच्या गेल्या दसऱ्या दिवशी झालेल्या तोडफोडीच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे व तेथील नागरिकांनी यासंदर्भात उद्या (मंगळवारी) "कुंकळ्ळी बंद' ची हाक दिली आहे.
याच मुद्यावरून बाळ्ळी, काणकोण व केपे भागातूनही उद्या बंद पाळला जाईल असे चित्र आज रात्री स्पष्ट झाले. त्यानंतर संपूर्ण दक्षिण गोव्यातील पोलिस यंत्रणेला "हाय ऍलर्ट'चा आदेश दिला गेला. संवेदनक्षम भागात आज (सोमवारी) रात्रीच केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात केले गेले. तसेच केपे, कणकोण, रुमडामळसारख्या भागात अधिक सावधगिरी बाळगण्यास सुरक्षा दलांना सांगण्यात आले.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या "बंद'च्या अनुषंगाने कोणताच धोका पत्करला जाणार नाही. कुठेही काही घडले तरी त्याचे पडसाद उमटणे शक्य असलेल्या भागात खास काळजी घेण्यात आलेली आहे. वरिष्ठ मुलकी व पोलिस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, वाटाघाटीद्वारे मार्ग काढण्यासाठी दिलेले आवाहन फेटाळून नागरिक समिती आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने शासकीय यंत्रणेने उद्याच्या बंदचा मुकाबला करण्यासाठी सारी तयारी केल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी कुंकळ्ळी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस कुमक आणण्यात आली असून त्यांच्या जोडीला केंद्रीय राखीव दलाची तुकडी व गोवा सशस्त्र पोलिस दल तैनात केले गेल्याचे सूत्रांनी सांगितले.
आज दिवसभर नगरविकासमंत्री तथा स्थानिक आमदार ज्योकिम आलेमाव दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक, उपजिल्हाधिकारी दीपक देसाई , मामलेदार परेश फळ देसाई, गुन्हा अन्वेषण विभागाचे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर कुंकळ्ळीत ठाण मांडून होते. नागरिकांशी वाटाघाटी करून चिघळलेल्या प्रश्र्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मंत्री ज्योकिम यांनी त्यासाठी स्वतः प्रयत्न केले, पण लोकांनी त्यांना प्रतिसाद न दिल्याने तोडगा निघाला नाही, असे सरकारूी सूत्रांनी सांगितले.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार पोलिसांना दिलेली मुदत सकाळी १० वाजता संपली व त्यामुळे वाटाघाटींचा प्रश्र्नच शिल्लक रहात नाही. सकाळी पोलिसांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर दोन तास प्रतीक्षा केली गेली. तथापि, तरीही काहीच उत्तर न मिळाल्याने नागरिकांनी उद्याच्या बंदची तयारी सुरू केल्यावर सायंकाळी ५-३० वा. मंत्री आलेमाव यांनी काहींशी व्यक्तिशः संपर्क साधून चर्चेसाठी पोलिस स्टेशनवर येण्यास सांगितले. मात्र त्यांना कोणीच प्रतिसाद दिला नाही. उलट आपण उद्याच्या तयारीत व्यस्त असल्याने तुम्हीच येथे या, असा उलट निरोप दिला. मात्र ते काही आले नाहीत.
उद्याच्या बंदला काणकोण, बाळ्ळी व केपे येथून मोठा पाठिंबा मिळाला आहे.तेथील बाजार उद्या बंद राहतील. राष्ट्रीय महामार्ग काणकोण तसेच बाळ्ळी येथे अडविला जाणार असल्याने वाहतूक ठप्प होणार आहे. कार्यकर्त्यांनी आज सकाळी कुंकळ्ळीतील शाळांमध्ये जाऊन बंदची कल्पना दिली असता व्यवस्थापनांनी शाळा बंद ठेवण्याचे आश्र्वासन त्यांना दिले. कुंकळ्ळी व बाळ्ळी येथील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे.शिवसेना, पद्मनाभ संप्रदाय या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
पोलिस यंत्रणा या बंद हाकेमुळे कमालीच्या तणावाखाली आली असून त्यातून परवा ताब्यात घेतलेल्या संशयिताला पुन्हा आरोपी म्हणून पुढे आणून लोकांना शांत केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, कुंकळ्ळी बंद राहिली तरी हरकत नाही, पण राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वाहतुकीस खुला ठेवण्याची जय्यत तयारी सरकारने चालविल्याचे रात्री दिसून आले.

No comments: