Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 12 October, 2008

आधी "बेपत्ता' व मग "खून' झालेली मेघना सुभेदार घरी परतली...

पणजी, दि.११ (प्रतिनिधी) -गेल्या एप्रिलमध्ये मुंबई येथील छत्रपती शिवाजी रेल्वेस्थानकावरून (सीएसटी) बेपत्ता झालेली व पोलिस चौकशीअंती ती गोव्यात पोहोचल्याचा पुरावा मिळाल्यानंतर कांदोळी येथे अत्यंत कुजलेल्या अवस्थेत सापडलेला युवतीचा मृतदेह तिचाच असावा, इथपर्यंत चौकशीचे धागेदोरे पोहोचलेल्या प्रकरणातील बंगळूरस्थित सॉफ्टवेअर अभियंता मेघना सुभेदार(२९) ही पुणे येथे आपल्या आजोबांच्या घरी परतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
याप्रकरणी "सीएसटी' पोलिस अधिकारी अनिल माने यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार मेघना पुणे येथे आपल्या आजोबांच्या घरी पोहचल्याचा संदेश त्यांना मिळाला. त्यांनी लगेच तिथे धाव घेतली व चौकशी केली असता तिची मानसिक अवस्था बिघडल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना नीट उत्तरे देणेही तिला जमत नव्हते व ती असंबंद्ध बडबडत असल्याचे पोलिसांनी सांगितले. साहाय्यक पोलिस आयुक्त बापू ठोंबरे यांनी मेघनाची विचारपूस असता एका जमावाने आपल्यावर दगडफेक केल्यामुळे डोक्याला जखम झाल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी डॉक्टरांचे मत जाणून घेतले असता तिच्या डोक्याला लागलेल्या मारामुळेच कदाचित तिला पुणे येथे आपले नातेवाइक असल्याची आठवण झाली असावी, अशी शक्यता डॉक्टरांनी बोलून दाखवली.
दरम्यान,याप्रकरणी पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार मेघनाने कोथरूड येथील आपल्या काकांना शुक्रवारी संध्याकाळी ५.३० वाजता "पीसीओ'वरून फोन केला. मी फार घाबरले असून काही गुंड माझा पाठलाग करीत असल्याची तक्रार केली होती. यावेळी तिच्या काकांनी लगेच सदर "पीसीओ'तून तिला घरी आणल्याचीही माहिती देण्यात आली आहे. त्यावेळी तिच्याकडे अवघे तीन रुपये होते. शिवाय तिच्या शरीरावर अनेक जखमा झाल्याची माहिती तिच्या काकांनी पोलिसांना दिली आहे. तपासअधिकारी माने यांनी तिची चौकशी केली असता तिने आपण कोल्हापूर व दक्षिण भारतातील विविध शहरांत फिरल्याची माहिती दिली. ती हैदराबादहून पुण्याला आल्याचेही तिने सांगितल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
११ एप्रिल ०८ पासून मेघना ही मुंबई येथील सीएसटी रेल्वेस्थानकावरून बेपत्ता झाली होती. त्यानंतर ती गोव्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ च्या दरम्यान तिने मडगावातील "एटीएम' मधून पैसे काढल्याचे "सीसी टीव्हीव्दारे सिद्ध झाले होते. त्यानंतर कळंगुट येथील दोघा युवकांकडे तिचा नोकिया कंपनीचा "एन७४' मोबाईल सापडला होता. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी मौला अल्लाबक्श व मेहबूब मौलासाब याची चौकशी करून त्यांना सोडून दिले होते. या दोघांकडे हा मोबाईल कोठून आला, याचा शोधही पोलिसांनी घेतला नाही. तसेच आपल्या मुलीचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करून गोवा पोलिस व्यवस्थित तपास करीत नाहीत, अशी तक्रार तिचे वडील डॉ. सुभेदार यांनी पोलिस महासंचालक बी. एस. ब्रार व पोलिस महानिरीक्षक किशनकुमार यांच्याकडे केली होती.
याप्रकरणाची चौकशी सुरू असताना एक कुजलेला मृतदेह कांदोळीत पोलिसांच्या हाती लागला असता तिचे वडील डॉ. मोहन सुभेदार यांनी तिची ओळख पटवली होती. या घटनेनंतर त्यांनी आपल्या मुलीच्या खुनाचा संशय व्यक्त करून त्याविषयी तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. तो मृतदेह मेघनाचाच असल्याचे स्पष्ट करण्यासाठी मृतदेहाची "डीएनए' चाचणी करण्याची मागणी तिच्या वडिलांनी केली होती. मेघनाची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी बंगळूर, मुंबई व पुणे येथे गोवा पोलिसांचे एक खास पथकही रवाना करण्यात आले होते.
मेघनाचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. ती बंगळूरला एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होती. १० एप्रिल २००८ रोजी छत्तीसगड येथे आपल्या घरी येण्यासाठी निघाली असता ती बेपत्ता झाली होती. १० एप्रिल रोजी ती मुंबई येथील सीएसटी रेल्वे स्थानकावरून घरी निघण्यासाठी बाहेर पडलेल्या मेघना हिने आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, "सीएसटी' रेल्वेस्थानकावरून तिने घरी दूरध्वनी करून आपण रेल्वेतून घरी येत असल्याचे सांगितले होते व ती घरी पोहोचली नसल्याने वडिलांनी तिचा सर्वत्र शोधाशोध सुरू केली. शेवटी दि. १४ एप्रिल रोजी "सीएसटी' रेल्वे पोलिस स्थानकात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली.
बंगळूर येथून घरी जाण्यासाठी आलेली मेघना मुंबईत पोहोचल्यावर गोव्यात कशी पोहोचली, हा प्रश्न तिच्या कुटुंबीयांना सतावत होता. पेशाने डॉक्टर असलेले सुभेदार यांचे छत्तीसगड येथे स्वतःचे इस्पितळ आहे. तथापि ते मुलीला न्याय देण्यासाठी आपली पत्नी व एका मुलीसह गोव्यात तळ ठोकून होते. मेघना सुभेदार हिची माहिती पुरवणाऱ्याला पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही तिच्या वडिलांनी केली होती. याच दरम्यान कळंगुट पोलिसांना एक निनावी पत्र मिळाले होते. मेघनाच्या खुनामागे रायपूर येथील एक तरुण असल्याचे या पत्रात म्हटले होते. मात्र, पोलिसांनी या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता असा कोणताही तरुण दिलेल्या ठिकाणी आढळला नाही.

No comments: