Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 18 October, 2008

पाच हल्लेखोरांना महाबळेश्वरात अटक, गोवा पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई, दोघे बिगर गोमंतकीय

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): ऍड. आयरिश रॉड्रिगीस व प्रा. प्रजल साखरदांडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी गोवा पोलिसांच्या एका विशेष पथकाने महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे ६.३० वाजता "हॉटेल नेल्स'वर छापा टाकून पाच हल्लेखोरांना अटक केली. जेनिटो व्हिन्सेन कुतिन्हो (१८), संदेश चक्रवर्ती शिंदे (१८), मायकेल जॉन्सन चकल (२३), संदीप कृष्णा पुजारी (१८) एनिसन व्हिक्टर नुनीस (२३) अशी अटक कलेल्यांची नावे आहे. म्हाबळेश्वर येथील पोलिस स्थानकाचे निरीक्षक सचिन सावंत यांच्या मदतीने पणजी पोलिसांन ही कारवाई करून या टोळीला अटक केली. या टोळीला सुपारी देण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. परंतु, ती कोणी दिली होती, त्याचे नाव अद्याप पोलिसांनी उघड केलेले नाही. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघे बिगर गोमंतकीय असल्याचे समजते.
हल्ल्यात वापरण्यात आलेल्या हत्यारांसह एक वाहनही पोलिसांनी जप्त केल्याने आता या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. दरम्यान, अटक केलेल्या संशयितांबद्दल पोलिसांनी अत्यंत गुप्तता बाळगली असून हे संशयित कुठले आहेत व त्यांना कुठे ठेवण्यात आले आहे, याबाबत माहिती देण्यास पोलिसांनी स्पष्ट नकार दिला. आज पहाटे महाबळेश्वर येथे हा छापा टाकण्यात आला.
या टोळीला पकडल्यानंतर पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती. कोणताही सुगावा पत्रकारांना लागू न देता, गोव्यात घेऊन आल्यावर या पाचही संशयितांना एका अज्ञात स्थळी चौकशीला घेऊन जाण्यात आले. यावेळी या टोळीला अटक करण्यासाठी गेलेल्या प्रत्येक पोलिस अधिकाऱ्यांचे तसेच पोलिस शिपायांचे मोबाईल बंद ठेवण्यात आले होते.
१३ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता अशोक बार अँड रेस्टॉरंटमधे बुरखाधारी सहा व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी ऍड. रॉड्रिगीस व श्री. साखरदांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यानंतर एका वाहनातून हे हल्लेखोर गोव्याबाहेर पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. त्यानंतर पोलिसांनी पहाटे छापे टाकून तिघा संशयितांना अटक केली होती. या तिघांनी या टोळीला मदत केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
दरम्यान,आयरिशवरील हल्ला कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला होता याची पोलिस कसून चौकशी करीत असून, या प्रकरणी अन्य काहींनाही अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान हल्लेखोरांना सुपारी नेमकी कोणी दिली यावरून आज राजधानी पणजीत उलटसुलट चर्चा सुरू होती.
-------------------------------------------------
संशयिक हल्लेखोर वऱ्हाडात सामील
महाबळेश्वर येथे छापा टाकण्यात आलेले हॉटेल म्हापसा येथील मारीया डिसोझा यांच्या मालकीचे आहे असे समजते. १५ ऑक्टोबर रोजी ही पाच जणांची टोळी या हॉटेलात आली होती. त्यातील एकाचा मोबाईल क्रमांक पणजी पोलिसांच्या हाती लागला होता. त्यानंतर सदर मोबाईलधारक या हॉटेलात उतरल्याची खात्री झाल्यानंतर महाबळेश्वर पोलिसांच्या मदतीने पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक फ्रान्सिस कॉर्त व त्यांच्या पथकाने हा छापा टाकला. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेले पाचही तरुण हल्ला केल्यानंतर लग्नाच्या एका वऱ्हाडाबरोबर महाबळेश्वरला गेले होते. वऱ्हाडी मंडळी तीन वाहनांतून म्हणजेच एक स्विफ्ट, एक आयनोव्हा व टाटा इंडिगो या गाड्यांतून महाबळेश्वरला गेले होते. १४ पुरूष, तीन महिला व एक लहान मूल अशी त्यांची संख्या होती. लग्न समारंभ १६ रोजी महाबळेश्वर येथील होली क्रॉस चर्चमध्ये सकाळी १० वाजता होता. ही मंडळी १५ रोजी तेथे पोचली. पणजी पोलिसांना त्यांच्या महाबळेश्वरच्या वास्तव्याची माहिती मिळताच निरीक्षक कॉर्त व दोन अन्य अधिकारी आपल्या पथकासह तेथे दाखल झाले आणि पहाटेच त्यांनी छापा टाकून ही कारवाई केली. लग्न झालेल्या जोडपे सांताक्रूझ व मेरशी येथील राहणारे असून हॉटेल बुकिंग केलेली व्यक्ती सांताक्रूझची आहे.

No comments: