Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 17 October, 2008

बाबूशना लक्ष्य केल्यास गंभीर परिणाम - चर्चिल

रवींकडून गृहमंत्रिपद काढा; किंवा नेतृत्वबदल करा
पणजी, दि.१७ (प्रतिनिधी) -शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा पुत्र रोहित मोन्सेरात याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या बलात्कारप्रकरणी कारवाई करण्यावरून सध्या सरकार डळमळीत बनले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था रवी नाईक यांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने एकतर त्यांचे गृहमंत्रिपद काढा; अन्यथा नेतृत्व बदला, असे स्पष्ट संकेत बाबूश यांच्या पाठीशी उभ्या ठाकलेल्या असलेल्या गटाने श्रेष्ठींना दिल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. तसेच बाबूश यांची सतावणूक अशीच सुरू राहिली तर त्याचे गंभीर परिणाम सध्याचे सरकार व पोलिसांना भोगावे लागतील, असा निर्वाणीचा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी दिला आहे.
दरम्यान,याप्रकरणी बाबुश मोन्सेरात यांनी गृहमंत्री रवी नाईक यांच्यावर ठपका ठेवला असता आज संध्याकाळी पणजी पोलिस स्थानकावर रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक याच्याविरोधात एका विदेशी अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खून केल्याप्रकरणी पणजी पोलिस स्थानकांत एका संघटनेतर्फे तक्रार दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आहे. या विषयावरून सध्या आघाडीअंतर्गतच परस्परांवर शिंतोडे उडवण्याचे प्रकार सुरू झाल्याने या वादावर तोडगा निघणे कठीण बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एका जर्मन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप ठेवून पोलिसांनी रोहित मोन्सेरात याच्याविरोधात नोंद केलेली तक्रार ही पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने हाताळली जात असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी केला. सदर मुलीची आरोग्य तपासणी न करताच रोहित याच्यावर बलात्काराचा आरोप दाखल करून पोलिस बाबूश यांना राजकीय लक्ष्य बनवण्याचे प्रयत्न करीत असून हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला. गेले तीन दिवस बाबूश मोन्सेरात यांच्या ताळगाव येथील निवासस्थानी ठाण मांडून बसलेल्या चर्चिल यांनी आज पत्रकारांशी बोलताना हे विधान केले. केवळ राजकीय बळी म्हणून बाबूश यांची सतावणूक होत आहे व त्याचे गंभीर परिणाम सरकार व पोलिस खात्याला भोगावे लागणार असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान,याप्रकरणी गृहमंत्री रवी नाईक यांचा हात असून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना माहीत असूनही ते केवळ मौन बाळगून असल्याची टीका होत आहे. दरम्यान, काल रात्री उशिरा झालेल्या या गटाच्या बैठकीत श्रेष्ठींकडे नेतृत्व बदलाची मागणी करण्याचे ठरवण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. या बैठकीला चर्चिल आलेमाव,आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा, आमदार चंद्रकांत कवळेकर,आमदार आग्नेल फर्नांडिस व बाबू आजगावकर आदी उपस्थित होते,अशी माहिती मिळाली आहे. गेले तीन दिवस चर्चिल,जुझे फिलिप,रेजिनाल्ड आदी बाबूश यांच्याबरोबरच आहेत. त्यात ऍड.राधाराव ग्रासियसही त्यांच्या निवासस्थानी असल्याचेही कळते. पक्षाचे केंद्रीय निरीक्षक बी. के. हरिप्रसाद यांना तात्काळ गोव्यात पाठवण्यात आले असून त्यांनी या नेत्यांशी चर्चा करून या विषयावर तोडगा काढण्यासाठी निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत. रवी नाईक यांच्याकडून गृहखाते काढून घेण्याच्या मागणीला प्राधान्य देण्यात आले असून अन्यथा नेतृत्व बदल करा,अशी मागणी करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. तसेच सभापती प्रतापसिंग राणे यांनी नेतृत्व स्वीकारण्यास नकार दिल्याने दिगंबराकडील नेतृत्व देण्यासारखी एकही व्यक्ती दृष्टिपथात नसल्याने श्रेष्ठींसमोरही पेच निर्माण झाला आहे.
चर्चिल यांना यासंबंधी विचारले असता त्यांनी दिगंबर कामत यांना पाठिंबा देणारा सुमारे १३ आमदारांचा गट बाबूश यांच्या पाठींशी असल्याचेही ते म्हणाले. एकीकडे सदर मुलगी वैद्यकीय चाचणीस राजी नसताना पोलिसांकडून तिची समजूत काढण्याचा होत असलेल्या प्रयत्नाचा अर्थ काय,असे चर्चिल म्हणाले. रोहित खरोखरच दोषी असल्यास त्याच्यावर कारवाई जरूर करावी; परंतु बनावट पद्धतीने तक्रार नोंद करून त्याला फसवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्यावरून बाबूश यांना राजकीय लक्ष्य बनवले जात असल्याचे स्पष्ट होते,असेही चर्चिल यांनी सांगितले.
कायद्यापुढे सगळे समानः रवी नाईक
कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नसून सगळ्यांना समान न्याय मिळेल,असे सांगून पोलिस करीत असलेली कारवाई कायद्यानुरुपच असल्याची ठाम भूमिका गृहमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केली. आपण पोलिसांना कोणतेही आदेश दिले नसून ते आपल्या कायद्याप्रमाणे काम करीत असल्याचे ते म्हणाले. बाबुश यांच्यावर आपण वैयक्तिक सूड घेत असल्याचा आरोप निराधार असल्याचेही ते म्हणाले. जर खरोखरच एखाद्याने गुन्हा केला असेल तर त्याला सजा होणे गरजेचे आहे; परंतु त्याचबरोबर निर्दोष व्यक्तीवर अन्याय होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल,असे सांगून या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांना पूर्णपणे मोकळीक दिल्याचेही ते म्हणाले.
...आणि चर्चिल यांना पोलिसांनीच खडसावले!
रोहित मोन्सेरात प्रकरणी जेव्हा तक्रार नोंद झाली तेव्हा गृहमंत्री रवी नाईक यांना विचारले असता त्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्याला या प्रकरणी काहीही माहित नसल्याची भूमिका घेतल्याचे चर्चिल म्हणाले. यावेळी त्यांनी उत्तर गोव्याचे अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांना पाचारण केले. रोहितविरोधात तक्रार नोंद कशी काय केली, असे विचारले असता त्यांनीही कानावर हात ठेवले. नंतर पोलिस महानिरीक्षक व महासंचालक यांच्याकडे विचारले असता व त्यांना कोणत्या कायद्याने तक्रार नोंद केल्याचे विचारताच त्यांनी चक्क आपल्याला खडसावले,असे चर्चिल म्हणाले.पोलिसांना आदेश देणारे तुम्ही मुख्यमंत्री की गृहमंत्री आहात असाही जाब विचारल्याचे ते म्हणाले. या प्रकारानंतर आपण मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे त्यांचे पोलिसांवर कोणतेही नियंत्रण नसल्याची तक्रार केल्याचे ते म्हणाले.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys