Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 13 October, 2008

...तर ओसामा बिन लादेनने आश्रम सुरु केले असते - तोगाडिया

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - हिंदू धर्म हा मानव जीवनात येणाऱ्या दुःखाचे सुखात परिवर्तन करण्याचे साधन आहे. ओसामा बिन लादेन याला हिंदू धर्माचे संस्कार मिळाले असते तर, त्यांनी दऱ्याखोऱ्यांत मानवतेचे शिक्षण देणारे आश्रम सुरू केले असते, असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी आज कांपाल येथे भरलेल्या मातृमेळाव्यात व्यक्त केले. प्राथमिक वर्गात शिक्षण न घेतलेलीही आई छत्रपती शिवाजी महाराज घडवू शकते, त्यामुळे आपल्या कुटुंबातील मुलामुलींना हिंदू संस्कारांचे शिक्षण द्या, असे आवाहन डॉ. तोगाडिया यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष अशोकराव चौगुले, केंद्रीय सहमंत्री मधुकर दीक्षित, क्षेत्रसंघटक प्रशांत हरताळकर, दक्षिण गोवा प्रमुख सरिता बखले, उत्तर गोवा प्रमुख निता कळंगुटकर व उत्तर गोवा जिल्हा मंत्री मुकुंद कवठणकर उपस्थित होते. हिंदू धर्म मृत्युंजय आहे. तो लुटण्याचा कोणी प्रयत्न केल्यास गप्प बसणार नसून त्याला तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले. यावेळी समाजासाठी मौलिक योगदान दिल्यामुळे तीन महिलांचा यावेळी डॉ. तोगाडिया यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सौ. रूपाली सुहास बखले(शिक्षण एम.ए.) या वास्को येथे महिलांचे ५० बचत गट चालवत असल्याने त्यांना यावेळी गौरविण्यात आले. सौ. मिना प्रभाकर आमशेकर (शिक्षण एम.एसस्सी.) या साकोर्डा येथे दूध सोसायटी चालवत असून पन्नास कुटुंबे त्यावर अवलंबून आहेत, तर श्रीमती साकरी हिने आपल्या गाई एका खाटिकाने चोरून कत्तलखान्यात नेल्याने त्याच्या विरोधात जोरदार आंदोलन केल्याने त्यांनाही यावेळी डॉ. तोगाडिया यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
भारतात ८५ कोटी तर विदेशात ४ कोटी हिंदू आहेत. जगात असलेल्या सर्व धर्मांमध्ये हिंदू धर्म हा विचाराने, आदर्शाने, संस्काराने तसेच समाज व्यवस्थेने भिन्न आहे. हिंदू धर्मात शरीरापेक्षा आत्म्याला अधिक महत्त्व आहे, तर अन्य धर्मात शरीराला महत्त्व आहे. या धर्मात स्त्री आणि पुरुषाला तेवढेच महत्त्व दिले जाते. त्यामुळे भारतात नारीमुक्तीची आंदोलने सुरू झाली नाहीत. देवीची पुजा ही अन्य कोणत्याच धर्मात नाही. अमेरिकेत आई, वडिलापासून वंचित राहणारी अनेक मुले आहेत. कारण तो मुलगा मोठा होईपर्यंत आई १५ व्या पतीबरोबर तर वडील २० व्या पत्नी बरोबर असतात. परंतु भारतातील ८० वर्षाची वृद्ध बाई आपल्या एकाच पतीबरोबर राहते,असे ते म्हणाले.
गोव्यात वास्को द गामा आले त्यावेळी त्यांच्याबरोबर काही पाद्रीही धर्मांतर करण्यासाठी आले. त्यावेळी याठिकाणी धर्मांतरण करण्यासाठी अनेक हिंदूंवर अत्याचार केले, तरीही ते पूर्ण गोव्याला ख्रिस्ती करून शकले नाहीत. भारतात औरंगजेबाने तलवारीच्या ताकदीवर तर, खिश्चनिटीने "डॉलर'च्या बळावर हिंदूचे धर्मांतरण करण्याचे प्रयत्न केले. मात्र ते यशस्वी ठरले नाहीत, कारण आमची संस्कार देण्याची परंपरा आहे. भारतातील प्रत्येक कुटुंब हे कॅम्ब्रिज विद्यापीठ आहे आणि घरातील आई ही त्याची कुलगुरू असल्याचे डॉ. तोगाडिया म्हणाले.
मुलामुलींना संस्कार दिले नाहीत, तर गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. कारण विद्यालयात तसेच शिक्षणात हे संस्कार मुलांना मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांना संस्कार दिलेच पाहिजे. त्यासाठी गावागावांत महिलांनी संस्कार केंद्र सुरू करावे. गावातील मंदिरात मुलामुलींनी तसेच महिलांनी ठरवून एक दिवस एकत्र येऊन आरत्या कराव्या. धर्मावर येणाऱ्या संकटावर चर्चा करावी, असे आवाहन डॉ. तोगाडिया यांनी यावेळी केले.
या मेळाव्याला संपूर्ण गोव्यातील मातृशक्तीने मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. मेळ्याचे सूत्रसंचालन डॉ. अनिता तिळवे व सौ. प्रभात वेर्णेकर यांनी केले.

No comments: