Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 15 October, 2008

कुंकळ्ळीत कडकडीत 'बंद', अनुचित प्रकार नाही : चारकलमी कार्यक्रम जाहीर

मडगाव, दि. १४ (प्रतिनिधी): देवआजोबा राखणदेवाच्या घुमटीच्या गेल्या गुरुवारी झालेल्या तोडफोडप्रकरणी गुन्हेगारांना अटक करण्यात पोलिसांना आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ कुंकळ्ळीवासीयांनी पुकारलेल्या आजच्या १२ तासांच्या "कुंकळ्ळी बंद'ला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. कर्नाटक परिवहनच्या एका बसवर झालेली किरकोळ दगडफेक वगळता बंद शांततेत पार पडला.
लोकांनी 'कुंकळ्ळी बंद' ची हाक दिली होती तरी प्रत्यक्षात बाळ्ळी, काणकोण व केपे भागातूनही बंद पाळण्याचे संकेत मिळाल्याने प्रशासनाने कोणतीही जोखीम न बाळगता संपूर्ण कुंकळ्ळी परिसरात काल मध्यरात्रीपासून कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे संपूर्ण कुंकळ्ळी परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. कुंकळ्ळीबरोबरच दक्षिण गोव्यातील पोलिस यंत्रणेला अतिसावध राहाण्याचा इशारा देण्यात आला होता. संवेदनक्षम भागांत काल रात्रीच केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात केले होते. ते रात्री उशिरापर्यंत तेथेच होते.
आज सकाळी ६ वाजता "बंद'ला प्रारंभ झाला. कुंकळ्ळीबरोबर बाळ्ळीतील दुकानदारांनीही बंद पाळल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. कुंकळ्ळीबरोबरच मडगाव -कारवार मार्गावरील खाजगी बसेस तसेच रेती वाहतूक करणारे ट्रक रस्त्यावर आलेच नाहीत. त्यांनी "बंद'ला पाठिंबा दिला. बाळ्ळी येथे अडविलेला रस्ता पोलिसांनी अडथळे बाजूला करून तो वाहतुकीस मोकळा केला; पण कदंब व कर्नाटक परिवहनाच्या बसेस सोडल्यास अन्य वाहने तेथून गेली नाहीत.कर्नाटक परिवहनाच्या अशाच एका बसवर जुन्या पोलिस स्टेशनपाशी दगडफेक झाली. बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर टायर पेटवून टाकण्याचे प्रकारही घडले.
पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर,उपजिल्हाधिकारी दीपक देसाई , मामलेदार परेश फळ देसाई, पोलिस निरिक्षक सिध्दांत शिरोडकर दिवसभर तेथे ठाण मांडून होते. केपे व काणकोणचे पोलिस निरीक्षकही दुपारपर्यंत तेथे होते. ते नंतर परत फिरले.
सर्वत्र खाकी गणवेशधारी होते व ते बंद समर्थकांपाठोपाठ फिरताना दिसत होते. बाजार उत्स्फूर्तपणे बंद होता. त्यामुळे कोणावर बंदची सक्तीच करण्याचा प्रश्र्न उद्भवला नाही असे बंद समर्थकांकडून सांगण्यात आले. सकाळी ११ च्या सुमारास त्यांनी कुंकळ्ळी ते बाळ्ळी अशी पदयात्रा काढली व ती परत फिरली.
कुंकळ्ळीतील सर्व शैक्षणिक व वित्तीय संस्थाही आज बंद राहिल्या.तेथे परीक्षा सुरू होती त्या संस्थांनी "बंद'च्या अनुषंगाने मुलांची वेगळी सोय केली होती.
स्थानिक आमदार तथा नगरविकास मंत्री ज्योकिम आलेमाव दुपारी १२ च्या सुमारास फेरफटका मारून गेले. त्यांनी गुन्हेगारांस पकडले गेले नाही तर आपण जनतेबरोबर असेन अशी घोषणा केली होती, प्रत्यक्षात ते या आंदोलनात दूरच राहिले.
सायंकाळी ६ वाजता "बंद' मागे घेतल्याची घोषणा एका जाहीर सभेत करण्यात आली. तेथे विशाल शाबू देसाई, ताराचंद देसाई, मारुती देसाई, प्रसाद देसाई, विष्णु देसाई, संतोष देसाई व कमलाक्ष प्रभुगावकर यांनी मार्गदर्शन केले. "बंद'साठी सहकार्य देणारे दुकानदार, बाजारवाले, काणकोण , केपे व बाळ्ळीचे दुकानदार, खासगी बसवाले व रेती ट्रकवाले यांचे आभार मानण्यात आले.तसेच पोलिसांनी दिलेल्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख करण्यात आला.पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर यांनीही बंद शांततेत पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
चारकलमी कार्यक्रम
आंदोलनाचा यापुढचा चारकलमी कार्यक्रमही यावेळी जाहीर करण्यात आला. कुंकळ्ळी पोलिस स्टेशनवर मोर्चा, टॅक्सी स्टॅंडवर धरणे, साखळी उपोषण व बेमुदत उपोषण असे त्याचे स्वरूप असेल.

No comments: