Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 18 October, 2008

घुमटी तोडफोड अखेर उलगडा झाल्याचा दावा

मडगाव, दि.१७ (प्रतिनिधी): उसकीणीबांध-कुंकळ्ळी येथील श्रीदेव आजोबा घुमटीच्या तोडफोड प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा यासंदर्भातील तपासासाठी नियुक्त केलेले गुन्हा अन्वेषण विभागाच्या खास पथकाचे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी संशयावरून अटक केलेल्या बागलकोटच्या इसमानेच मानसिक संतुलन ढळलेल्या अवस्थेत हा प्रकार केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलिस आले आहेत.
गेल्या ९ रोजी हा प्रकार घडला होता व लोकांनी त्या घटनेच्या निषेधार्थ स्वयंस्फूर्तीने लोकांनी बाजार बंद ठेवल्यानंतर हे प्रकरण तपासासाठी सरकारने गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविले होते.
या प्रकरणी दुसऱ्याच दिवशी या पथकाने कर्नाटकमधील बागलकोट येथील लिंगराज सिध्द लिंगायत याला ताब्यात घेतले होते तोडफोडीसाठी वापरलेल्या वस्तूही जप्त केल्या होत्या. तथापि, जनक्षोभ शांत करण्यासाठी पोलिस कोणाला तरी बळीचा बकरा बनवीत आहेत असा समज बळावत चालला होता.
साळगावकर म्हणाले, सिद्धव्वा हा काही दिवसांपूर्वी बाळ्ळी येथे कामाला असलेल्या नातेवाइकांकडे आला होता. तेथून तो दसऱ्याची पार्टी करण्यासाठी म्हणून कृष्णमंदिराजवळ राहणाऱ्या एका मित्राकडे गेला. तो मित्र तेथील एका ठेकेदाराकडे कामाला होता. रात्री त्यांनी पार्टी केली व भल्या सकाळी सिध्दराज तेथून निघाला. येताना त्याने लोखंडी सळी कुंकळ्ळी बाजारातून विकत घेतली. रात्रीच्या दारूचा अंमल असतानाच त्याने सकाळी पुन्हा दारू घेतली होती. त्याच नशेत येताना त्याने राखणदेव घुमटीची मोडतोड केली. तो मानसिकदृष्ट्या ठीक नसल्याचे तपासणीत आढळून आले असून बागलकोट येथील त्याच्या घरच्या मंडळीनीही त्याला दुजोरा दिला आहे.
त्याने पोलिसांकडे दिलेल्या कबुलीनुसार तोडफोड केल्यावर तो बाजारापर्यंत गेला व परत घटनास्थळी आला. त्यानेच लोकांना कोणी ते काम केले ते आपण पाहिल्याचे सांगितले होते. एक परप्रांतिय इसम इतक्या सकाळी तेथे कशासाठी गेला होता या संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्यातूनच या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

No comments: