Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 13 May, 2008

सार्दिन खोटारडे : डॉ. विली

'सरकार कधीही कोसळू शकते'
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांचे खाते काढून घेण्याची मागणीच झाली नाही असे सांगणारे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष फ्रान्सिस सार्दिन खोटे बोलत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी आज येथे केला. सध्याचे सरकार अद्याप स्थिर नसून कर्नाटकात निवडणुका होताच कधीही ते गडगडू शकते असे राजकीय भाकीतही त्यांनी वर्तवले.
मडगाव येथील "हयात' हॉटेलमध्ये दोन्ही पक्षाच्या समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पक्षाने ऍड. नार्वेकर यांचे वित्तखाते काढून घेण्याची मागणी केली होती. आणि त्यावेळी फ्रान्सिको सार्दीन त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
काल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सार्दीन यांनी ऍड. दयानंद नार्वेकर आणि रवी नाईक यांचे खाते काढून घेण्यासाठी कोणीच मागणी केली नव्हती आणि तशी कोणती चर्चाही समन्वय समिती बैठकीत झाली नव्हती, असा दावा केला होता. मात्र, दोन्ही मंत्र्यांची खाती काढून घेण्याची मागणी झाल्याचे पुरावा म्हणून डॉ. डिसोझा यांनी समन्वय बैठकीनंतर काही वृत्तपत्रांवर तशा बातम्या प्रसिद्ध झालेल्याचे कात्रण सादर केले आणि श्री. सार्दीन हे खोटे बोलत असल्याचा आरोप केला.
गेल्या १५ फेब्रुवारी महिन्यात केलेल्या या मागणीचा ऐवढ्यात कॉंग्रेस पक्षाला विसर पडला का, अशा प्रश्न त्यांनी करून ती मागणी राष्ट्रवादीचे अद्याप कायम असल्याचा दावा केला. डॉ. डिसोझा आज पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर सुरेंद्र फुर्तादो उपस्थित होते.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे सरकार अद्याप स्थिर नसून समन्वय समितीच्या बैठकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. राष्ट्रवादी बरोबर मगोचेही आमदार दीपक ढवळीकर यांना दिलेल्या आश्वासनाचे अजुनी पूर्तता करण्यात आली नसल्याचे ते यावेळी म्हणाले.
जानेवारी महिन्यात मालपे पेडणे येथे भीषण अपघात झाला नसता तर, त्याचवेळी विधानसभा अधिवेशनात सरकार पडले असते. त्यावेळी अनेकांनी तशी तयारी ठेवली होती आणि अजुनीही ती आहे, असा गौप्यस्फोट डॉ. डिसोझा यांनी केला. वित्तमंत्र्यांनी अधिवेशनात अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्याचे खाते काढून घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री कामत यांनी आपल्याला त्यावेळी दिले होते, असे डॉ. डिसोझा यांनी यावेळी बोलताना पत्रकार परिषदेत सांगितले.

No comments: