Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 13 May, 2008

चीनमध्ये मृतकांची संख्या 12 हजारांवर

पावसामुळे मदतकार्यात अडथळे
बीजिंग, दि. १३ : चीनच्या दक्षिण पश्चिम सिचुआन प्रांतात सोमवारी आलेल्या जबरदस्त भूकंपामुळे दगावणाऱ्यांची संख्या १२ हजारांवर पोहोचली आहे. भूकंपग्रस्तांच्या मदत कार्यात पावसामुळे बाधा निर्माण झाली असून असंख्य लोक अजूनही भूकंपाच्या दहशतीतून सावरलेले नाहीत.
चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सिचुआन प्रांताच्या मियांजू शहरातच कमीत-कमी दहा हजार लोक मलब्याखाली दबले आहेत. गेल्या तीन दशकातील हा चीनमधील सर्वात भीषण भूकंप असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी रात्रीपासूनच येथे मुसळधार पाऊस सुरू झाल्याने विविध रस्त्यांचा संपर्क तुटला आहे आणि त्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत. प्रशासनाला भूकंपग्रस्तांपर्यंत पोहोचणे कठीण होऊन बसले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चीन सरकारने मोठ्या प्रमाणावर मदत कार्य हाती घेतले आहे. भूकंपप्रभावित क्षेत्रात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. पंतप्रधान जिआबाओ यांनी या घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले असून नागरिकांनी शांतता, संयम आणि आत्मविश्वासाने या संकटाचा सामना करावा, असे आवाहन केले आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी ठिकठिकाणी पडलेला मलबा हटविण्याचे आदेश जारी करणयत आले आहे. आज सकाळी पंतप्रधानांनी भूकंपाच्या अनुषंगाने एक तातडीची बैठक बोलाविली आणि येणारा प्रत्येक क्षण मदतकार्याच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान असल्याचे सांगून परस्पर सहकार्याने काम करण्याचे मंत्रिमंडळ तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
भूकंपामुळे असंख्य शाळा, कारखाने, घरे आणि रुग्णालयांच्या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. भूकंपाचे सर्वात भीषण दृश्य दुजियांगयान शहरात पाहायला मिळाले. येथे एका शाळेची तीन मजली इमारत कोसळून मलब्याखाली ९०० मुले दबली आहेत. स्थानिक नागरिकांनी बहुतांश मुलांना वाचविले. पण, अजूनही नेमकी किती बालके दगावली, याची आकडेवारी समजू शकलेली नाही. बेइचुआन या गावातील तर ८० टक्क्यांहून अधिक घरे ध्वस्त झाली आहेत. एकट्या या प्रांतात सात हजार लोक दगावल्याचे वृत्त आहे. प्रशासनाने भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने चिकित्सा पथक रवाना केले आहे.
१५ ब्रिटिश पर्यटक बेपत्ता
सोमवारी चीनमध्ये आलेल्या भूकंपात १५ ब्रिटिश पर्यटक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. हे पर्यटक सिचुआन प्रांतातील वोलोंग येथे वास्तव्यास होते. दरम्यान, या भूकंपाच्या घटनेमुळे येथील ऑलिम्पिक आयोजनाबाबतची चिंता वाढली आहे. पण, चिनी प्रशासनाने ऑलिम्पिक स्थळ पूर्णत: सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. ऑलिम्पिकची सर्व ३१ आयोजनस्थळे सुरक्षित आहेत. कारण ते भूकंपनिरोधक तंत्राने तयार करण्यात आले आहेत. असे असले तरी भूकंपामुळे एका स्टेडियमचे नुकसान झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
भूकंपामुळे चीनमध्ये असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत. भूकंपप्रभावित क्षेत्रातच नव्हे, तर आसपासही वीजव्यवस्था कोलमडली असून दूरसंचार केंद्रेही ठप्प झाली आहेत. या भूकंपाची तीव्रता इतकी भयंकर होती की, त्याचे धक्के पाकिस्तान, इंडोनेशिया, थायलण्ड आणि व्हिएतनामपर्यंत जाणविले. यापूर्वी चीनमध्ये १९७६ साली तंग्शान प्रांतात प्रचंड विनाशकारी भूकंप आला होता. त्यावेळी अडीच लाख लोक दगावले होते.
दलाई लामा यांना दु:ख
चीनमधील विनाशकारी भूकंपात दगावलेल्या नागरिकांबाबत तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, चीनमधील या दु:खद आपत्तीने मला धक्काच बसला. या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या सर्व कुटुंबांविषयी माझ्या संवेदना हळव्या झाल्या आहेत. या भूकंपाच्या धक्क्यात सर्वस्व गमावून बसलेल्यांसाठी मी प्रार्थना करीत असल्याचेही ते म्हणाले.

No comments: