Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 12 May, 2008

दहशतवादी आणि सैन्यांमध्ये चकमकीत पाच जण ठार

जम्मू, दि. 11 : जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यामध्ये काली मंडी क्षेत्रात आज सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत आतापर्यंत एक छायाचित्रण करणारा पत्रकार तसेच सैन्याच्या एका जवानासह पाच लोक मारले गेले आणि इतर चार जण जखमी झाले आहेत.
या चकमकीने सीमा सुरक्षा दलाच्या (बी.एस.एफ.) त्या दाव्यांवर प्रश्न निर्माण केले आहे, ज्यामध्ये त्यांनी गेल्या गुरुवारी रात्री आंतरराष्ट्रीय सीमेजवळ घुसखोरी करण्याच्या एका मोठया प्रयत्नाला अयशस्वी केल्याचे सांगितले होते. सूत्रांनी सांगितले की कालीमंडीजवळ राख अंब ताली गावात इंडियन डेमोक्रेटिक पार्टीचे नेते होशियार सिंह यांच्या घरी सकाळी दोन-तीन अतिरेकी घुसलेे आणि त्यांनी कुटुंबातील लोकांवर गोळीबार करण्यात सुरू केले होते. या घटनेमध्ये होशियार सिंह आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून अन्य दोन कुटुंबियांना गंभीर परिस्थितीत सरकारी मेडिकल कॉलेज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावातील लोकांचे म्हणणे आहे की हे अतिरेकी सैनिकांच्या गणवेशात होते आणि त्यांच्या जवळ अत्याधुनिक शस्त्रेही होेती आणि मोठ-मोठ्या पिशव्याही होत्या. अतिरेक्यांच्या या गोळीबारामुळे या भागात हिंसाचार पसरला आणि ग्रामीणांनी त्याला उत्तर देण्यासाठी आपले लायसन्स असलेली शस्त्रे बाहेर काढली. याच दरम्यान अतिरेकी जवळील दुसऱ्या घरात शिरले. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाने लगेच संपूर्ण क्षेत्राला घेरून शोध मोहिम सुरु केली आणि नंतर त्या घराला चारही बाजूने घेरले.
या दरम्यान या चकमकीत अतिरेक्यांनी ओलीस धरलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या वृत्तास दुजोरा देण्यात आला आहे. या क्षेत्रात घुसखोरी केलेल्या तीन अतिरेक्यांनी दोन महिलांना एका घरामध्ये बंदी बनवले होते. त्यामधील एका महिलेचा मृत्यू झाल्याचे सुरक्षा दलाने पुष्टि केली आहे. सेनेकडून येणाऱ्या वृत्तांमध्ये सांगितले जात आहे की शुक्रवारी सीमेवरील घुसखोरी थांबवण्यासाठी केलेल्या गोळीबारानंतर जवळजवळ 10 अतिरेक्यांनी पाकिस्तानातून भारतात घुसखोरी केली आहे. अतिरेक्यांबरोबर सैन्याची चकमक अजून सुरु असून शेवटचे वृत्त समजेपर्यंत अतिरेक्यांनी ओलीस धरलेल्या पाच लोकांची सुरक्षा दलाने सुटका केली आहे. सुरक्षा दल अतिरेक्यांविरोधात शेवटच्या हल्ल्याची तयारी करत आहेत. हा निवासी भाग असल्यामुळे आणि अतिरेक्यांकडे अधिक प्रमाणात दारू-गोळा असल्यामुळे आतापर्यंत ते संयमित कारवाई करीत आहेत.

No comments: