Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 13 May, 2008

'मेगा' प्रकल्पांविरुद्ध खास संघटना स्थापन

मडगाव,दि. १२ (प्रतिनिधी) : गोव्याच्या किनारपट्टीभागावर बिल्डरांचे होऊ घातलेले आक्रमण हाणून पाडण्याच्या प्रयत्नात आज विविध किनारी भागातून बाणावली येथे एकत्र आलेल्या प्रतिनिधींनी "गाव घर राखण मंच'ची स्थापना करतानाच ग्रामीण भागात येऊ घातलेल्या सर्व महाकाय गृह प्रकल्पाची छाननी ग्रामसभेनेच करण्याची सक्ती करावी, अशी मागणी येथे आयोजित विराट सभेत संमत ठरावाव्दारे करण्यात आली.
या सभेत गोव्याच्या कानाकोपऱ्यातून विविध बिगर सरकारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच केळशी.करमणे, ओडली, वार्का, बाणावली, कोलवा,बेताळभाटी, माजोर्डा व अन्य भागातील लोक मोठ्या संख्येने हजर होते.
या सभेत एकूण ६ महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले. गोव्याचे स्वत्व व वेगळेपण टिकवून ठेवण्याची गरज त्यातून प्रतिबिंबित होताना दिसली. सर्व मेगा प्रकल्पांची छाननी व अभ्यास करण्याची मोकळीक ग्रामसभांना द्यावी,ग्राम पंचायती व सर्व सरकारी संस्थांनी गरजेनुरुप ग्रामविकास आराखडा तयार करावा व तो करताना गावकऱ्यांना त्यात सामावून घ्यावे, पाणी, वीज व अन्य आवश्यक गरजा प्राधान्य तत्त्वावर प्रथम पूर्ण कराव्यात, सर्व नव्या इमारत प्रकल्पांना पावसाचे पाणी जतन करून ठेवण्याची , कचऱ्याची विल्हेवाट , सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व वृक्षलागवड यांची सक्ती करावी, असे ठराव संमत करण्यात आले.
सर्व ग्रामीण चळवळींना एका छताखाली आणून घटनेच्या ७३ व्या दुरुस्तीतील अधिकारांचा वापर करण्याचा निर्धारही यावेळी केला गेला.तसेच क्षेत्रीय आराखडा हा ग्रामविकास आराखड्यावर आधारून तयार केला जावा व तोपर्यंत कोणत्याही मेगा प्रकल्पाला परवाना देऊं नये असा ठरावही सभेने संमत केला.
या सभेत आवडा, एल्वीश गोम्स, जासिंत फुर्ताद. आर्नाल्ड रॉड्रीगीस, आल्वितो, जेराल्दीन फर्नांडिस, सेराफिन कॉता या स्थानिकाशिवाय रमेश गावस, सबिना मार्टिन, रामा वेळीप, मिंगेल ब्रागांज, फादर मेवरीक फर्नांडिस, प्रवीण सबनीस यांची भाषणे झाली.
स्थानिक प्रतिनिधींनी आपल्या भाषणात मेगा प्रकल्पामुळे स्थानिक लोकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल याची माहिती दिली व हे सर्व प्रकल्प पंचायतीने रद्द करावेत अशी मागणी केली.
रमेश गावस यांनी आपले विचार मांडताना किनारपट्टी भागात मेगा प्रकल्प व दुसऱ्या बाजूने खाणींमुळे गोवेकरासमेार भयानक संकट उभे ठाकल्याचा इशारा दिला व संघटीतपणे त्यविरुध्द लढा देण्याची गरज प्रतिपादली.गावच्या लोकांनी ग्रामसभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून अशा प्रकल्पांना विरोध करावा. मेगा प्रकल्पाव्दारे मुंबई, दिल्ली व हैद्राबाद येथील मोठाले बिल्डर येथील जमीन गिळंकृत करीत आहेत असा आरोप करून जनमत कौलाप्रंाणे गोव्याच्या रक्षणासाठी लढा देण्याचीन हांक त्यांनी दिली.
सबिना यांनी सरकारने लोकांना हवे तेच दिले पाहिजे असे ठासून सांगताना ग्रामीण भागांचा विकास कसा करावा ते गावचे लोक ठरवतील, बिल्डर नाहीत असे बजावले. पर्यटनाच्या नावाने जुगार,अंमली पदार्थ व वेश्या व्यवसाय फोफावल्याचा आरोप करताना नेमके कोणते पर्यटन आम्हांला हवे ते आम्ही ठरविले पाहिजे असे सांगितले.
फादर मेवरीक यांनी गोवा गोवेकरांचाच राहील हे दाखवून देण्यासाठी हा प्रचंड जनसमुदाय येथे जमल्याचे सांगताना प्रत्येकाला घर असावे व माणसा प्रमाणे रहायला मिळावे असे वाटते ४०ते ५० लाखांची घरे आम्हांला नकेात, मेगा प्रकल्प व सेज या नावाने गोवा विकल्यास भावी पिढी आम हांला कदापि माफ करणार नाही असे बजावले.
प्रवीण सबनीस यांनी संपूर्ण ताकदीने मेगा प्रकल्प रद्द करून घेऊया असे आवाहन केले. मागच्या दरवाजाने गोव्याच्या हिताविरुध्द जमिनी विकू पहाणारे वा त्यांना पाठिंबा देणारे राजकारणीच खरे गोव्याचे खरे शत्रू आहेत असा आरोप त्यांनी केला. सरकारी प्रकल्पासाठी जमीन संपादन करणे सोपे व्हावे म्हणून सरकारने नगर विकास व नियोजन कायद्यात बदल केला आहे व त्याला प्रादेशिक आराखड्यातून वगळले आहे, ते रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.

No comments: