Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 14 May, 2008

चीनमधील बळींची संख्या २० हजारांवर

बीजिंग, दि.१४ : चीनच्या दक्षिणपश्चिमेकडे असलेल्या सिचुआन प्रांतात आलेल्या भीषण भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून त्या क्षेत्रात सुरू असलेल्या मदत कार्यात वाढ करण्यात आली आहे. मदत पथके वाढविण्यात आली असून खाद्यान्नाचा पुरवठा करण्याची क्षमताही वाढविली आहे. मदत कार्याप्रमाणेच बेपत्ता लोकांचा व मृतकांचा शोध घेण्याचे कामही वेगाने सुरू असून आजपर्यंत मृतकांचा आकडा २० हजारापर्यंत गेला असल्याचे वृत्त आहे. अजूनही हजारो लोक गाडले गेले, फसले किंवा बेपत्ता असल्याची माहिती आहे.
मियानयांग शहरात मदत पथक पोहोचले असून त्यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार मृतकांचा आकडा ३६२९ वरून वाढून ५५४० एवढा झाला आहे. याशिवाय १८,४८६ पेक्षा जास्त लोक गाडले गेले आहेत, तर १३९६ बेपत्ता आहेत.
झिन्हुआ या सरकारी वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार वेचुआन प्रदेशातील यिंग्रझियू गावातील लोकवस्ती दहा हजाराच्या जवळपास होती. त्यापैकी फक्त २३०० लोक मदत शिबिरात पोहोचले आहेत.
आधीच्या वृत्तानुसार या भूकंपातील मृतकांचा आकडा १२ हजार जाहीर करण्यात आला होता. मदत कार्यात जसजसा वेग येत आहे, तसतशी मृतकांची संख्या वाढत आहे. वेनचुआन प्रदेशात तर मृतकांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या परिसरात सध्या २० हजार सैनिक मदत कार्यात गुंतले असून आणखी ३० हजार सैनिक विविध मार्गांनी पाठविण्यात आले आहेत. याशिवाय पीपल्स लिबरेशन आर्मीनेही आपल्या ३० हजार पेक्षा जास्त गटांना मदत कार्याचे आदेश दिले आहेत.

No comments: