Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 17 May, 2008

'आता सरकारने हस्तक्षेप करावा'

मराठी अकादमीच्या कारभारावर शशिकलाताई कडाडल्या
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): गोमंतक मराठी अकादमीत सध्या मनमानी व भोंगळ कारभार सुरू असून मराठी भाषेच्या उद्धारासाठी ही धोक्याची सूचना आहे. केवळ ६० सदस्यांपुरती मर्यादित असलेल्या मराठी भाषेच्या या शिखर संस्थेला व्यापक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी अकादमीच्या घटनेत आवश्यक दुरुस्ती करून सदस्यता खुली करावी, अशी जोरदार मागणी माजी मुख्यमंत्री तथा मराठी भवन निर्माण समितीच्या कार्याध्यक्ष शशिकला काकोडकर यांनी केली आहे.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती काकोडकर यांनी पहिल्यांदाच अकादमीतील कारभाराबाबत उघडपणे मतप्रदर्शन केले. यावेळी ऍड. गोपाळ तांबा,ज्येष्ठ पत्रकार सीताराम टेंगसे व गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष सुरेश नाईक हजर होते. गेल्या ३० मार्च २००८ रोजी मराठीप्रेमींनी घेतलेल्या बैठकीत घटना दुरुस्ती करून सदस्यता खुली करण्याबाबत घेतलेला ठराव अकादमीला पाठवण्यात आला असला तरी त्यावर अकादमीचे पदाधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसल्याचा ठपका श्रीमती काकोडकर यांनी ठेवला. यासंदर्भात सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात येणार असून कायदामंत्री व मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेतली जाणार आहे. प्रसंगी कायदेशीर मार्गाचाही अवलंब केला जाईल असेही श्रीमती काकोडकर म्हणाल्या.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून अकादमीचा कारभार पूर्णपणे ढासळत चालला असून राज्यातील मराठीप्रेमींत कमालीची अनास्था व उदासीनता पसरल्याची टीका त्यांनी केली. खऱ्या अर्थाने मराठीसाठी झटणाऱ्या लोकांना बाजूला सारून आपल्या गोतावळ्यातील लोकांची वर्णी लावण्याचे नवे राजकारण या संस्थेत सुरू आहे. अकादमीच्या विविध गटवार पदांवर निवडून आलेल्या लोकांची नामावली पाहिल्यास ही गोष्ट लगेच लक्षात येईल, असेही शशिकलाताई म्हणाल्या. मराठी अकादमीच्या गचाळ कारभाराबाबत नुकतेच कुठे वातावरण तयार होते आहे. या परिस्थितीत गेले काही दिवस ठरावीक वृत्तपत्रांतून दिशाभूल करणारी वक्तव्ये तसेच जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारे वृत्त प्रसिद्ध होत असल्याने आता याबाबत तोंड उघडणे व सत्य परिस्थितीची माहिती देणे भाग पडल्याचे त्या म्हणाल्या. मराठी अकादमीचे विद्यमान अध्यक्ष नरेंद्र आजगावकर यांनी अकादमीवर सध्या आपल्या सग्यासोयऱ्यांची फौज जमवल्याचा आरोप श्रीमती काकोडकर यांनी केला. इथे त्यांची मर्जी असलेले लोकच निवडून येऊ शकतात अशी तजवीज त्यांनी केल्याने इच्छा व पात्रता असूनही अन्य मराठीप्रेमी कार्यकारिणीवर निवडून येऊ शकत नाही, अशी माहिती त्यांनी दिली. मराठी अकादमी स्थापन करण्यासाठी किंवा मराठीसाठी प्राणपणाने झटलेले लोक आपोआपच या गटबाजीच्या राजकारणामुळे बाहेर पडले आहेत. अकादमीतर्फे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांना आमसभेचे सदस्यच भाग घेतात व विविध स्पर्धांसाठी अकादमीचे सदस्यच परीक्षक म्हणून काम पाहतात अशी टीका करून मराठीच्या नावाने सरळ मस्करीच सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. मराठी अकादमीचा संपूर्ण कारभार हा केवळ ६० सदस्यांपुरता मर्यादित ठेवण्यात आला आहे. मराठी अकादमीला व्यापक स्वरूप व मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने विकास व उद्धार व्हायचा असेल तर हरएक इच्छुक मराठीप्रेमीला कायदेशीरपणे अकादमीचा सदस्य होण्याचा हक्क मिळायलाच हवा,असे ताई म्हणाल्या. अकादमीची नोंदणी सोसायटी नोंदणी कायद्यानुसार केली असली तरी सदस्यता नोंदणी संदर्भात मात्र २००० साली ही अट लादण्यात आल्याचे यावेळी उघड करण्यात आले.
मराठी भवन निर्माण समितीचा विसर
मराठी भवन निर्माण समितीने सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून ही वास्तू उभारली असली तरी ती अद्याप अपूर्ण आहे. अकादमीचे कार्यालय या ठिकाणी खुले केल्यानंतर जी काही कामे हाती घेण्यात आली त्याबाबत भवन निर्माण समितीला अजिबात विश्वासात घेतले नसल्याचे श्रीमती काकोडकर यांनी सांगितले. मराठी भवनाचा मागील भाग भाडेपट्टीवर देण्याबाबत सुरुवातीस मान्य करण्यात आले असले तरी सध्या विद्यमान वास्तूतील एक भाग सरकारी संस्थेला भाड्यासाठी देण्याचे प्रयत्न सुरू असून हे योग्य नसल्याचे ताई म्हणाल्या. खासदार श्रीपाद नाईक यांनी खासदार निधीमार्फत बांधण्यात आलेल्या कुंपणाच्या उद्घाटन सोहळ्याला भवन निर्माण समितीला आमंत्रण देण्यात आले नाही. भवन समिती व कार्यकारिणीची संयुक्त बैठक बोलावण्याची अनेकवेळा विनंती करूनही त्याबाबत कानाडोळा केला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मराठी भवनाचे अर्धवट असलेले काम पूर्ण करण्यासाठी अकादमीकडून कोणतीही ठोस पावले किंवा भवन निर्माण समितीला विश्वासात घेऊन कार्यक्रम आखण्यासाठी कोणतेच प्रयत्न होत नसल्याची टीका श्रीमती काकोडकर यांनी केली.
उपाध्यक्षांनी मिळवले सर्व हक्क
माजी अध्यक्ष गुरूदास सावळ यांच्या कार्यकाळावेळी उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर यांनी अध्यक्षांसाठी असलेले बहुतेक हक्क उपाध्यक्षांना मिळवून घेतले. आता गुरूदास सावळ यांनी श्री.आजगावकर यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे राजीनामा दिल्याने उपाध्यक्षांकडे अध्यक्षपदाचा ताबा आला. गेल्यावेळी निवडणुकीचा फार्स करून उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर अध्यक्ष बनले. आता अकादमीला उपाध्यक्ष नाही,अशी माहिती यावेळी देण्यात आली. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत अकादमीचा कार्यभार कोण संभाळतो,असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. अकादमीला सरकारकडून आर्थिक साहाय्य देण्यात येते त्यामुळे अकादमीच्या कारभारावर सरकारचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. सरकारने अकादमीच्या कारभाराकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असून अकादमीच्या सदस्यपदाचा हक्क प्रत्येक मराठीप्रेमीला मिळवून देण्याची सोय करावी,असेही ताई यांनी यावेळी सांगितले.

No comments: