Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 1 October, 2008

जोधपूरजवळ मंदिरात चेंगराचेंगरीत १८६ ठार, २५० जखमी


राजस्थानातील मेहरानगढ किल्ल्यातील भीषण घटना
जोधपूर, दि. ३० : राजस्थानातील जोधपूरजवळ असलेल्या चामुंडा देवीमंदिरात नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आज सकाळी झालेल्या चेगराचेंगरीत १८६ भाविक ठार, तर अडीचशेहून अधिक भाविक जखमी झाल्याची भीषण घटना घडली. मृतांमध्ये बहुतेक भाविक हे पुरुष व युवक आहेत. जखमींना महात्मा गांधी इस्पितळ, मथुरादास इस्पितळ आणि सन सिटी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी अनेकांची स्थिती अतिशय चिंताजनक असल्याचे जोधपूरचे विभागीय आयुक्त किरण सोनी गुप्ता यांनी सांगितले.
मेहरानगढ किल्ल्यात १५ व्या शतकात ४०० फूट उंचीवर हे मंदिर बांधण्यात आले होते. आजपासून नवरात्री उत्सवाचा प्रारंभ होणार असल्याने देवीच्या दर्शनासाठी पहाटे ३ वाजेपासूनच सुमारे २५ हजार भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरात जाण्यासाठी किल्ल्यातील पायऱ्यांचा मार्ग चिंचोळा असल्यामुळे महिला आणि पुरुष असे दोन वेगवेगळे मार्ग तयार करण्यात आले होते व मध्ये दुभाजक होते. गर्दी नियंत्रित करण्यासाठी काही ठिकाणी कठडे लावण्यात आले होते.
मंदिरापर्यंत जाणारा हा मार्ग दोन किलोमीटर लांबीचा होता. हे कठडे बाजूला करून ५० भाविकांचा एक जत्था याप्रमाणे त्यांना सोडण्याचे ठरले होते. मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्याने सांगितले की, सकाळी ५.३० च्या सुमारास मंदिराचे दरवाजे उघडताच काही अतिउत्साही युवकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी तेथे पोलिस नसल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. या गोंधळामुळे काही कठडे खाली पडले आणि लोक खाली येण्यासाठी धडपडू लागले. या धुमश्चक्रीतच मार्गातील एक भिंतही कोसळली. त्यामुळे आणखीच हाहाकार उडाला. मार्ग फारच चिंचोळा असल्यामुळे आणि पायऱ्यांच्या उतारामुळे लोकांचे लोंढे एकमेकांच्या अंगावर आदळले व हे लोंढे एकमेकांना रेटत पायऱ्यांवरून खाली-खाली येत गेले. त्यात अनेक लोक चिरडले गेले आणि गुदमरून मरण पावले. यात ज्या युवकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता, ते बहुतेक सर्वच जण यात मरण पावले. घटना घडली त्या वेळी किल्ल्याच्या खाली फारच कमी संख्येत पोलिस होते. त्यामुळे भाविकांनीच जखमींना खाली आणले. वरच्या भागात काय घडले याची कल्पना आधी कुणालाच आली नाही. वरून मोठ्या संख्येत मृतदेह आणि जखमींना भाविकांनी खाली आणले तेव्हाच घटनेची भीषणता सर्वांच्या लक्षात आली आणि नंतरच मदतकार्य हाती घेण्यात आले. तातडीने नऊ रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या, पण त्यासुद्धा कमी पडल्या. सुमारे ५०० जखमींना जोधपूरमधील विविध इस्पितळांमध्ये दाखल करण्यात आले. सर्वच जण गुदमरल्याने जखमी झाले होते आणि त्यांना प्राणवायूची मोठ्या प्रमाणावर गरज होती. पण, इस्पितळांमध्ये प्राणवायूचा पुरेसा साठाच नसल्याने अनेकांचे प्राण वाचविता आले नाही. परिणामी, मृतकांचा आकडा वाढतच गेला. महात्मा गांधी इस्पितळ आणि मथुरादास इस्पितळातील सर्व जागा मृतक आणि जखमींमुळे भरून गेल्या होत्या. आपल्या आप्तांना शोधण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली.
मंदिरात जाण्यासाठी सुमारे ७५ मीटर अंतराच्या उतारावर पायऱ्या बनविण्यात आल्या होत्या. चेंगराचेंगरी होताच अनेक जण या उतारावरून खाली घसरत आले आणि एकमेकावर आदळले. १५ ते २० भाविक जागीच मरण पावले; तर अन्य महात्मा गांधी इस्पितळ, मथुरादास इस्पितळ आणि सन सिटी इस्पितळात दगावल्याची माहिती, राज्याचे प्रधान गृहसचिव एस. एन. थानवी यांनी दिली. जखमींमध्ये मोठ्या संख्येने तरुणांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला आणि मुले यांना दर्शन घेता यावे म्हणून मध्ये दुभाजक लावण्यात आले होते. त्यामुळेच महिला आणि मुलांना तातडीने सुरक्षितरीत्या बाहेर काढणे शक्य झाले. पण, तीन महिला आणि चार मुले या घटनेत दुर्दैवाने मरण पावली.
जागृत देवस्थान
चामुंडा देवी मंदिर हे जागृत देवस्थान असल्याची लोकांची मान्यता आहे. हे मंदिर गज सिंग यांच्या राजघराण्याचे कुलदैवत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जो भक्त देवीला साकडे घालतो, त्याची इच्छा पूर्ण होते, अशी या देवीची ख्याती आहे. त्यामुळेच पहिल्या दिवशी दर्शन घेेण्यासाठी मंदिरात एकच गर्दी उसळते. ही गर्दी लक्षात घेता आणि गेल्याच वर्षी हिमाचलमधील नैना देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंंगरीमुळे झालेली भीषण घटना ध्यानात घेऊन जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी योग्य ती व्यवस्था केली होती. पण, पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होणार हे माहीत असूनही पोलिस व्यवस्था मात्र नगण्य होती. प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत ठिकठिकाणी पोलिस असते तर ही घटना घडली नसती, असे मंदिर व्यवस्थापकांनी सांगितले. घटना घडल्यानंतर पोलिस उीशराने पोचले, असाही आरोप भाविकांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली तसेच जखमींना योग्य उपचार मिळण्यासाठी आवश्यक निर्देश दिले. मृतकांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत त्यांनी घोषित केली. घटना घडली तेव्हा त्या बांसवाडा जिल्ह्यातील त्रिपुरा सुंदरी मंदिरात नवरात्रीची पूजा करीत होत्या. घटनेचे वृत्त कळताच त्या तडक जोधपूरला पोचल्या.
उच्चस्तरीय बैठक
घटनेनंतर राज्याचे मुख्य सचिव डी. सी. सामंत यांनी मदतकार्याच्या दृष्टीने एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि आवश्यक त्या सूचना केल्या. जखमींना देण्यात येणाऱ्या उपचाराचाही त्यांनी आढावा घेतला.
भाजपाध्यक्षांकडून दु:ख व्यक्त
चामुंडा देवीमंदिरात घडलेल्या घटनेबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांनी अतीव दु:ख व्यक्त केले आहे. घटनेचे वृत्त ऐकून मला धक्काच बसला, असे त्यांनी म्हटले आहे. या घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना तसेच जखमींना सर्वतोपरी मदत देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आमच्या सणावारांच्या दिवशी आणि पवित्र स्थळी अशी घटना घडणे, हे अधिकच क्लेषदायक असल्याचे राजनाथसिंग यांनी म्हटले आहे.
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही घटनास्थळाला भेट दिली आणि या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली.

No comments: