Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 30 September, 2008

पणजी, मडगाव बसस्थानके उडवून देण्याची धमकी सुरक्षा यंत्रणेची उडाली प्रचंड तारांबळ


पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) : वेळ दुपारी ३.१०ची. तेवढ्यात पोलिस नियंत्रण कक्षातील दूरध्वनी खणाणतो. पलीकडून बोलणारी व्यक्ती अनोळखी. सायंकाळी बरोबर ६ वाजून १० मिनिटांनी पणजी किंवा मडगावचे बसस्थानक बॉंबस्फोटाव्दारे उडवून देऊ! "बचाना है तो बचावो' हिंदीतून बोलणाऱ्या अनोळखी व्यक्तीने धमकी दिली! झाले.. त्यापाठोपाठ नियंत्रण कक्षातून सर्व नियंत्रण कक्षांना ताबडतोब संदेश धाडण्यात आले. वरिष्ठांनाही कळविण्यात आले. पणजी व मडगावातील पोलिसांची वाहने सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी बसस्थानकावर धावली. लोकांना काही कळण्याआधीच पोलिस यंत्रणेने या दोन्ही स्थानकांचा पूर्ण ताबा घेतला व तपासास सुरूवात झाली. ही तपासणी ६.१० ची वेळ टळेपर्यंत सुरूच होती. अखेर ती वेळ टळली आणि तो दूरध्वनी कोणीतरी घबराट निर्माण करण्याच्या उद्देशानेच केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा निःश्वास घेत बसस्थानकांचा ताबा सोडला.
ज्या क्रमांकावरून सदर व्यक्तीने दूरध्वनी केला होता तो होता २४३८०५९. पोलिस तपासात हा क्रमांक पणजी बसस्थानकावरील एका "पीसीओ'चा असल्याचे निष्पन्न झाले. अँथनी फ्लोरिस नामक व्यक्तीच्या दुकान क्रमांक ३१ वरील "पीसीओ'वरून केलेल्या या दूरध्वनीमुळे सुरक्षा यंत्रणांची प्रचंड धावपळ उडाली. ही बसस्थानके पोलिस यंत्रणेच्या गराड्यात येताच तेथील लोकांतही भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपुरे पोलिस कर्मचारी व केवळ एकमेव बॉंब निकामी करणाऱ्या पोलिस पथकामुळे सुरक्षा यंत्रणेवरील ताणही प्रचंड वाढलेला होता. दिल्लीत पकडलेल्या अतिरेक्यांनी त्यांच्या पुढील कटात गोवा हे लक्ष्य असेल असे उघड केल्याने गेल्या काही दिवसांपासून येथील सुरक्षा यंत्रणा तणावाच्या छायेखाली वावरत होती. त्यातच धारवाड व कर्नाटकातील अन्य काही ठिकाणी पोलिसांना जिवंत बॉंब सापडल्याने सुरक्षा यंत्रणेवरील ताण अधिकच वाढला होता. त्यातच आजच्या या धमकीच्या दूरध्वनीमुळे पोलिस यंत्रणेची एक प्रकारे रंगीत तालिमच झाली.
बसस्थानकांचा ताबा घेताच सुरक्षा रक्षकांनी सर्वप्रथम लोकांना गर्दीच्या ठिकाणांहून बाजूला काढले व स्थानकांवरील दुकानांमध्ये शोधमोहिम हाती घेतली. श्वानपथक व बॉंब निकामी करणाऱ्या पथकाने स्थानकांचा कानोनकोपरा तपासला. तपास सुरू असतानाच पोलिसांनी स्थानकांवर येणाऱ्याजाणाऱ्यांवर करडी नजर ठेवली होती. प्रवाशांना मात्र हे नेमके काय चाललेया याचा थांगपत्ता नव्हता. शेवटी तब्बल तीन तासानंतर दिलेली वेळ टळून गेल्यानंतर पोलिसांना ही शोध मोहीम मागे घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून मिळाले.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोव्यात यापूर्वीही स्फोटाच्या धमक्या मिळाल्या होत्या. पोलिसांनीही सावधगिरीचा उपाय म्हणून शोधमोहिमही हाती घेतली होती. तथापि, आजच्याप्रमाणे अतिसावधगिरीच्या वातावरणात झालेली शोधमोहिम ही कदाचित गोव्यातील अशा प्रकारची पहिलीच असावी. या मोहिमेत पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कसूर ठेवली नव्हती.
दिल्लीतील साखळी बॉंबस्फोट मालिकेचा थरकाप अद्याप पुरता शांतही झाला नसताना तसेच तेथे पकडलेल्या अतिरेक्यांनी स्फोटांसंदर्भात गोव्याच्या केलेल्या नामोल्लेखानंतर निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी आलेल्या या दूरध्वनीमुळे सुरक्षा यंत्रणेची एकच धावपळ उडाली. सुरक्षा रक्षक, श्वानपथके व बॉंब निकामी करणाऱ्या पथकांनी सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ या ठिकाणची बसस्थानके ताब्यात घेऊन सर्वत्र शोधाशोध सुरू केली. अधीक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहिम स्थानकांवर सुरू असतानाच साध्या वेषातील पोलिस व केंद्रीय राखीव दलाचे जवानही सुरक्षेसाठी स्थानकांवर सज्ज ठेवण्यात आले होते.
संध्याकाळी ३.४५ वाजता सुरक्षा यंत्रणेने तपासास सुरूवात केली. धमकी देणाऱ्यांनी ६.१० ची वेळ दिली असली तरी कोणतीही जोखीम न पत्करता पोलिसांनी सायंकाळी साडेसात पर्यंत बसस्थानकांवर कडक पहारा ठेवला होता. शिवाय ठिकाण एक सांगून भलत्याच ठिकाणी स्फोट घडविण्याची शक्यताही सुरक्षा यंत्रणेने गृहीत धरून मार्केट व अन्य गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था मजबूत केली होती. तसेच अन्य ठिकाणच्या बसस्थानकांनाही सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली होती.
नियंत्रण कक्षाला मिळालेल्या या धमकीनंतर राज्याच्या सरहद्दीवरील नाक्यांवरही कमालीची सतर्कता बाळगण्यात आली होती. गोव्यात येणाऱ्या व गोव्याबाहेर जाणाऱ्या वाहनांची त्यातील व्यक्तींसहकडक तपासणी संध्याकाळी हाती घेण्यात आली. रेलस्थानकांवरही सुरक्षाव्यवस्था अधिक बळकटकरून तेथे कडक पहारा ठेवण्यात आला होता.

No comments: