Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 3 October, 2008

सरकारच्या बेपर्वाईमुळे बॅंक व्यवहार ठप्प

पणजी, दि.२ (प्रतिनिधी) : राज्य सरकारच्या बेपर्वाईमुळे काल १ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली व सर्व बॅंकांचे व्यवहार सतत तीन दिवस बंद राहिल्याने सर्वसामान्य नागरिकांसह उद्योजक,व्यापारी व पर्यटकांची प्रचंड गैरसोय झाल्याचे चित्र आज सर्वत्र पाहायला मिळाले. विशेषतः गोवा चेंबर ऑफ कॉमर्सने यासंदर्भात कडक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
गोवा चेंबर ऑफ कॉमर्सने सरकारच्या या चुकीच्या घोषणेवर कालच सडकून टीका केली होती. आज "एटीएम' सेवेच्या घोळाबाबतही संस्थेचे अध्यक्ष नितीन कुंकळ्ळीकर यांनी आश्चर्य व्यक्त केले. "एटीएम'ही अमर्याद सेवा असून सुट्ट्यांची माहिती असताना त्यात रोख रकमेची व्यवस्था करून ठेवणे ही बॅंकांची जबाबदारी आहे. रोख रक्कम संपली किंवा तांत्रिक बिघाड झाला अशी कारणे बॅंकांकडून देण्यात आली तर ग्राहकांचा विश्वास ढळेल असेही ते म्हणाले. सध्या सर्वत्र आर्थिक मंदीचे वारे वाहत असताना एखादी अफवा पसरली की लोक लगेच पैसे काढण्यासाठी धाव घेतात, अशावेळी जर "एटीएम'मध्येही रोख रक्कम मिळत नसेल तर परिस्थिती बिकट बनण्याचा धोका असतो. पैशांअभावी किंवा केवळ तांत्रिक बिघाडामुळे लोकांना जर पैसे काढणे शक्य होत नसेल किंवा त्यांची गैरसोय झाली तर त्यांनी संबंधित बॅंक अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारावा असे ते म्हणाले.
वास्तविक ईद उल फित्र २ ऑक्टोबर रोजी साजरी होत असताना राज्य सरकारकडून घाईगडबडीत १ ऑक्टोबर रोजीच सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली. ही सुट्टी "नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट' कायद्याखाली जाहीर झाल्याने ती बॅंकांनाही लागू झाली. ३० सप्टेंबर या दिवशी सर्व बॅंका सहामाही हिशेबामुळे बंद असतात. त्यातच "दुष्काळात तेरावा महिना' या उक्तीनुसार १ व २ अशी सतत दोन दिवस सुट्टी जाहीर झाल्याने बॅंकांचे व्यवहार ठप्प झाले. दरम्यान, शुक्रवारी एकच दिवस बॅंका खुल्या राहणार असल्याने त्या दिवशी ग्राहकांची जबर गर्दी उसळणार यात वादच नाही. त्यामुळे आज सर्वच बॅंकांच्या "एटीएम'समोर ग्राहकांची तुफानी गर्दी लोटली. दुपारपर्यंत अनेक "एटीएम' रिते झाल्याने तसेच नियमित वापराने काही "एटीएम'तांत्रिक बिघाडामुळे बंद झाल्याने आज ग्राहकांना हात हलवत परतावे लागले. पणजी येथील स्टेट बॅंकेचे "एटीएम'ही अशाच कारणांसाठी बंद झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, बहुतेक उद्योजक तथा व्यापारी हे आपला व्यवहार धनादेशाकरवी करतात. त्यांनी जमा केलेले धनादेश या सुट्ट्यांमुळे अडकले आहेत. अन्य राज्यातील किंवा अन्य बॅंकांतील काही धनादेश वठण्यास "क्लिंयरिंग'ला किमान तीन ते चार दिवस लागतात.अशावेळी या सुट्ट्यांमुळे हे धनादेश वठण्यास आठवडा लोटणार आहे. या पैशांच्या आधारे पैसे काढण्यासाठी दिलेले धनादेश वठणार नसल्याने ग्राहकांना दंडही भरावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या २४ व २५ रोजी देशव्यापी संपामुळे दोन दिवस बॅंका बंद होत्या. त्या सुरू होताच आता त्यात या सततच्या तीन दिवसांच्या सुट्ट्यांची भर पडल्याने हा घोळ निर्माण झाला आहे. महिन्याच्या सुरुवातीला अनेक खाजगी कंपन्यांचा पगार होतो.अशावेळी या सुट्ट्यांमुळे हे लोक पगारापासूनही वंचित राहिले आहेत. दरम्यान, उद्या बहुतेक सर्व बॅंकांत ग्राहकांची झुंबड उडणार असल्याने बॅंक कर्मचारी तथा कर्मचाऱ्यांतही चिंता निर्माण झाल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या सर्वत्र "एटीएम'सेवा उपलब्ध असल्याने अनेक पर्यटक आपल्याकडे रोख रक्कम ठेवण्याचे टाळतात व गरजेप्रमाणे पैशांसाठी "एटीएम'चा वापर करतात. अशावेळी या सुट्ट्यांमुळे "एटीएम'खाली झाल्याने अशा पर्यटकांची धांदलच उडाली.
दरम्यान,बॅंकांच्या या सुट्ट्यांची भीती राज्यातील बहुतेक पेट्रोल पंप व हॉटेल उद्योजकांना सोसावी लागली. हे उद्योजक आपल्याकडे जमा होणारी रक्कम लगेच बॅंकांत भरतात. त्यामुळे ही रक्कम अंगावर ठेवण्याची गरज नसते. बॅंकांच्या तीन दिवसांच्या या सुट्ट्यांमुळे ही रक्कम सुरक्षित ठेवण्याचे संकट त्यांच्यावर ओढवले अशी माहिती एका पेट्रोलपंप मालकाने दिली. पेट्रोलसाठी द्यावे लागणारे धनादेश किंवा ड्राफ्ट देणेही शक्य झाले नसल्याने दोन दिवस उधारीने (क्रेडिट पद्धतीने) व्यवहार करणे भाग पडले,असेही त्यांनी सांगितले.

No comments: