Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 2 October, 2008

डॉ. विलींनी आत्मपरीक्षण करून मगच दुसऱ्यांवर चिखलफेक करावी, पर्रीकरांनी लगावला सणसणीत टोला

पणजी, दि. १ (प्रतिनिधी) : साळगावचे आमदार दिलीप परुळेकर यांच्यावर आरोप करण्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी आधी स्वतःच्या अंतरंगात डोकवावे व नंतरच दुसऱ्यांवर चिखलफेक करावी, असा टोला विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज लगावला. आज पणजी येथील भाजप मुख्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे उपनेते आमदार फ्रान्सिस डिसोझा व दिलीप परूळेकर हजर होते.
आमदार परूळेकर यांनी निवडणूक लढवताना आपल्या शैक्षणिक व स्थावर मालमत्तेबाबत खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप डॉ.विली यांनी करून भाजपने आपल्या आमदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या आरोपांबाबत आमदार परूळेकर योग्य तो खुलासा निवडणूक अधिकाऱ्यांकडे करणार आहेत. तथापि, दुसऱ्यांना प्रामाणिकपणाचे धडे देणाऱ्या डॉ.विली यांनी आपला चेहरादेखील आरशात पाहावा. नवोदित आमदारांना प्रामाणिकपणाची शिकवण देण्याचे सोडून त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात जी खोटी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली आहे ती केवळ धक्कादायकच नाही तर सत्तेचा दुरुपयोग करून सरकारी यंत्रणेचा कशा पद्धतीने गैरवापर होऊ शकतो त्याचेउत्तम उदाहरण असल्याचे पर्रीकर म्हणाले.
पहिल्या प्रथम मे २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यातून निवडणूक लढवताना डॉ. विली यांनी आपले वय ७६ वर्षे असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर मे २००७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रांत त्यांनी आपले वय ८० वर्षे असल्याचे नमूद केले आहे. तीन वर्षांत डॉ.विली यांना ४ वर्षे पूर्ण होण्याचा हा चमत्कार कसा घडला,असा सवाल पर्रीकर यांनी केला. २००७ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीवेळी मालमत्तेच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी पणजी येथील आपल्या कार्यालयाचा उल्लेख केला आहे. मात्र हे कार्यालय २००४ पासून कार्यरत असताना २००४ साली लोकसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात या कार्यालयाचा पत्ताच नसल्याचे उघड झाले आहे,असेही पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
शिवायडॉ.विली यांनी बेकायदा आपल्या नावावर केलेल्या तीन जमिनींची माहिती दोन्ही प्रतिज्ञापत्रात दिली नसल्याचा गौप्यस्फोटही पर्रीकर यांनी केला. त्यात माहिती हक्क कायद्याच्या आधारे मिळवलेल्या माहितीनुसार सर्व्हे क्रमांक १६७/१, २२८/१, २२९/१०, २२९/१२ हे भूखंड त्यांच्या मालकीचे आहेत, परंतु यातील केवळ सर्व्हे क्रमांक २२८/१ जिथे त्यांचे पारंपरिक घर आहे केवळ तेच प्रतिज्ञापत्रात दाखवण्यात आल्याची माहिती पर्रीकर यांनी दिली. दरम्यान,याच काळात आणखी एक घोटाळा डॉ. विली यांनी केल्याचा आरोप करून या जागा केवळ प्रतिज्ञापत्राच्या साहाय्याने आपल्या नावावर करण्याची कृतीही त्यांनी सत्तेच्या बळावर केल्याचा टोला पर्रीकरांनी लगावला. जमीन हस्तांतरासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे. प्रतिज्ञापत्राद्वारे ती हस्तांतरीत करणे बेकायदा आहे. यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी पर्रीकरांनी केली आहे. या फाईल्सही कार्यालयातून गायब असल्याचे पर्रीकर यांनी पत्रकारांच्या निदर्शनाला आणून दिले.
डॉ.विली यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांत ते आयकर भरत नसल्याची माहिती दिल्याचेही यावेळी उघड करण्यात आले. याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली जाईल.प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे उघड झालेच आहे; परंतु त्यांनी केलेल्या गैरप्रकाराबाबत फौजदारी गुन्हा दाखल करावा,अशी मागणीही केली जाणार असल्याचे पर्रीकर म्हणाले.
------------------------------------------------------
मुख्यमंत्र्यांचा थेट हस्तक्षेप
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कामात मुख्यमंत्री दिगंबर कामत थेट हस्तक्षेप करीत असल्याचा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला. ज्योकिम डायस यांनी केलेल्या तक्रारीसंबंधी बार्देशचे तत्कालीन निवडणूक अधिकारी दामोदर मोरजकर यांनी साळगावचे आमदार दिलीप परूळेकर यांना प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल "कारणे दाखवा' नोटीस जारी केली आहे. या नोटिशीबाबत परूळेकर यांच्याकडून योग्य तो खुलासा लवकरच केला येईल. दरम्यान, या नोटिशीमुळे खवळलेल्या डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी मुख्य सचिव व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याबरोबर आल्तिनो येथे खास बैठक घेतली व या बैठकीत संबंधित निवडणूक अधिकाऱ्याला फैलावर घेतले. या अधिकाऱ्याला सक्तीची रजा घेण्यास भाग पाडून त्यांच्या जागी आग्नेलो जे.जे.फर्नांडिस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही कारणे दाखवा नोटीस रद्द ठरवून परूळेकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे घाटत असल्याचा आरोपही पर्रीकर यांनी केला. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांच्या कामात थेट हस्तक्षेप करण्याच्या या प्रकाराची गंभीर दखल मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेऊन ही प्रक्रिया स्थगित ठेवल्याचे ते म्हणाले.

No comments: