Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 7 September, 2008

दोन्ही युवकांची कसून चौकशी

बनावट नोटा प्रकरण
वास्को, दि. ६ (प्रतिनिधी): बनावट नोटांचे वितरण करण्यासाठी गोव्यात आलेल्या पश्चिम बंगाल येथील दोन तरुणांना काल वास्को पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी सुरू झाली आहे. देशात बनावट नोटांचे वितरण करून येथील अर्थव्यवस्था कोलमडून टाकण्याचे षड्यंत्र काही दहशतवादी संघटनांतर्फे सुरू असल्याचे स्पष्ट संकेत यापूर्वी गुप्तहेर यंत्रणेने दिल्याने या दोन्ही तरुणांचा सर्वांगाने तपास करणार आहे, असे दक्षिण गोवा अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी सांगितले आहे. वास्को पोलिसांनी या दोन्ही तरुणांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांना सहा दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
वास्को पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या तरुणांची नावे महम्मद शेख व ताहीद शेख अशी आहेत. हे दोघेही मालदा पश्चिम बंगाल येथील असून त्यांच्याकडून ५०० रुपयांचा एकूण ६०० बनावट नोटा मिळून तीन लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती अधीक्षक श्री. प्रभुदेसाई यांनी दिली. दरम्यान, वास्को पोलिसांनी या दोघाही तरुणांना चिखली येथे एका खाजगी बसमधून ताब्यात घेतले होते. या खाजगी बसमध्ये बंगालहून कालच गोव्यात दाखल झालेले एकूण ३० कामगार होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. या दोघांना ताब्यात घेताना या बसमधील इतर प्रवाशांची चौकशी करण्याचे भान पोलिसांना राहिले नसल्याने जर या कामासाठी ही टोळीच गोव्यात दाखल झाली असेल तर हे कामगार आता सर्वत्र पसरण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, हे दोघे तरुण काल वास्को येथील "टेलीस औषधालया'त खरेदीसाठी आले असता त्यांनी दिलेली ५०० रुपयांच्या नोटेचा संशय या दुकानातील कामगारांना आला. त्यांनी वेळीच ही खबर वास्को पोलिसांना दिली. परंतु, तोपर्यंत या दोघाही तरुणांनी तेथून पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ त्यांचा पाठलाग करून त्यांना चिखली येथे एका खाजगी बसगाडीतून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मिळालेल्या बॅगेत एकूण तीन लाख रुपयांचा बनावट नोटांचा साठा जप्त करण्यात आला. आज दोन्ही संशयितांना प्रथम श्रेणी न्यायालयात उभे केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. गोव्यात एकीकडे बनावट नोटांची प्रकरणी वाढली असता व या प्रकरणांच्या चौकशीचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे असता पोलिसांच्या ताब्यात मिळालेल्या या दोन तरुणांच्या साहाय्याने हे संपूर्ण जाळे उघडे करण्याचे जोरदार प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहेत. विविध पोलिस पथकांकडून स्वतंत्र चौकशी सुरू असून सर्व शक्याशक्यता पडताळण्यात येत असल्याचेही अधीक्षक श्री. प्रभुदेसाई यांनी सांगितले. खास गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक आत्माराम देशपांडे, अधीक्षक प्रभुदेसाई व वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक हरिष मडकईकर यांनी इन कॅमेरा या दोघाही संशयितांची जबानी नोंद केल्याची माहितीही मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही संशयित गोव्यात येण्यासाठी पुणे रेल्वेस्थानकावरून "गोवा एक्सप्रेस'गाडीत चढल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अन्य काही जणांना चौकशीसाठी पाचारण करण्याचे ठरवले असून याबाबत स्पष्टीकरण देण्यास नकार देण्यात आला. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे सांगून येत्या काही दिवसांत याबाबतचे धागेदोरे सापडण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments: