Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 9 September, 2008

बिहारच्या पुरग्रस्तांसाठी भाजपतर्फे निधी संकलन

१४ पासून पैसे, कपडे गोळा करणार
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): बिहार राज्यावर महाप्रलंयकारी पुराचा कहर ओढवल्यामुळे लाखो लोक बेघर झाले असून त्यांना मदत करणे हे आपणा सर्व देशवासीयांचे आद्य कर्तव्य ठरते. भारतीय जनता पक्षातर्फे राष्ट्रीय पातळीवर "बिहार पूरग्रस्त सहाय्यता निधी' उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून गोव्यात येत्या १४ ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्वत्र फिरून पक्षाचे कार्यकर्ते पैसे, धनादेश, कपडे आदी मदत जमा करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी दिली.
आज पणजी येथे भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते. बिहार राज्यातील कोसी नदीला आलेल्या पुरामुळे सुमारे आठशे गाव कायमस्वरूपी उद्वस्त झाले आहेत. सुमारे पन्नास लाख लोक बेघर झाले असून त्यांचा संसारच पाण्यात वाहून गेला आहे. या लोकांचे पुनर्वसन करणे हे केंद्र सरकारसमोरील मोठे आव्हान असून लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही काळाची गरज असल्याचे श्री.नाईक म्हणाले. या संकटाची व्याप्ती पाहिल्यानंतर केंद्र सरकारनेही ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे.
भाजपच्या सर्व आमदार व पदाधिकाऱ्यांना एका दिवसाचा पगार देण्याची यापूर्वी विनंती केली आहेच परंतु या संकटाची दाहकता पाहिल्यानंतर सर्व आमदारांनी आपला एका महिन्याचा पगार या निधीसाठी दान करावा, असे आवाहन श्री.नाईक यांनी केले. खासदार या नात्याने सरकारकडून मिळणारे एका महिन्याचे मानधन या निधीसाठी देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनीही आपल्या एका महिन्याचे सर्व मानधन या निधीत जमा करणार असल्याचे जाहीर केले. १४ सप्टेंबरपासून राज्यव्यापी मदत निधी गोळा मोहीम सुरू केली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत पक्षाचे कार्यकर्ते गावोगावी फिरून पैसे,धनादेश व वापरण्यालायक असलेले कपडे गोळा करतील,असे सांगून लोकांनी सढळहस्ते मदत करावी,असे आवाहनही श्री.नाईक यांनी केले. राज्यातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांशी बोलणी करून त्यांच्याकडूनही जर या लोकांना काही मदत मिळवता येईल, याबाबतही प्रयत्न सुरू असल्याचे खासदार नाईक म्हणाले. देशावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी गोमंतकीयांनी आपल्या दानशूरपणाची ओळख दाखवलेली आहे, यावेळीही त्यात कसूर राहणार नाही,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.काही देणगीदारांना आयकर सूट हवी असेल तर त्याची सोयही केली जाणार असल्याचे स्पष्ट करून येत्या दोन दिवसांत बॅंक खाते उघडून ते जाहीर केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

No comments: