Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 13 September, 2008

१४ वारसास्थळे गायब होण्याचा प्रकार

हा तर खाण उद्योगाच्या तुंबड्या भरण्याचा कट
पणजी, दि.१२(प्रतिनिधी): राज्यातील महत्त्वाची चौदा वारसा स्थळे नगर नियोजन खात्याने काढलेल्या अधिसूचनेतून गायब झाल्याचे प्रकरण खरोखरच गंभीर असून ही चूक नजरचुकीने झाल्याचा दावा सरकार करत असले तरी हा खाण उद्योगाला रान मोकळे करून देण्याचाच एक कट असावा,असा संशय भाजप विधिमंडळ गटाचे प्रवक्ते आमदार दामोदर नाईक यांनी व्यक्त केला.
पणजी येथे भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुरगावचे आमदार मिलिंद नाईक प्रदेश सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते.'गोवा हेरिटेज ऍक्शन ग्रुप" यासंबंधी घेतलेल्या आक्षेपाचे भाजपने समर्थन केले आहे. राज्यातील संरक्षित वारसा स्थळे व पुरातन वास्तूंची यादी जाहीर करण्याची अधिसूचना अलीकडेच नगर व नियोजन खात्याने काढली आहे. या यादीत एकूण १४ स्थळे गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही चूक केवळ नजरचुकीने झाल्याचे सांगून येथील अधिकारी आपली कातडी बचावण्याचा प्रयत्न करत असले तरी यामागे नक्कीच काहीतरी काळेबेरे असण्याची दाट शक्यता आमदार दामोदर नाईक यांनी वर्तविली.
मुळात या चौदा स्थळांपैकी नऊ स्थळे ही खाणप्रभावीत क्षेत्रात येत असल्याने या लोकांचे हित जपण्यासाठीच हे षडयंत्र तर रचले गेले नाही ना,अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
बुद्धमूर्ती - कोलवाळ,श्री मंगेश मंदिर - कुठ्ठाळी,खोर्जुवे किल्ला, ब्रिटिश सिमेट्री,- दोनापावला,कैवल्य मठ - कायसूव, शिगावची गुहा,नारायणदेव मंदिर - विचुंद्रे,प्रस्तर रेखाचित्रे - पणसामळ, प्रस्तर रेखाचित्र - काजूर,सिद्धेश्वर गुहा - सुर्लातार,आदिलशाही मशीद, वारखंडची गुहा, दामोदर मंदिरानजीकचा तलाव - फातोर्डा,जुवे किल्ला आदी स्थळांचा समावेश या अधिसूचनेत केला नसल्याचा दावा "हेरिटेज ऍक्शन ग्रुप'ने केला आहे.

No comments: