Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 10 September, 2008

ब्रह्मांडाचे रहस्य शोधणारा महाप्रयोग सुरू

२७ किलोमीटर लांब बोगद्यात एलएचसी सक्रीय
जगबुडीचा धोका नसल्याचा शास्त्रज्ञांचा दिलासा

बर्न, दि. १० : मानवाच्या दृष्टीने या ब्रह्मांडाचे अस्तित्व कायमच एक गूढ राहिले आहे. प्रयोगशील मानवाने गेल्या अनेक वर्षांपासून या रहस्याचा शोध घेण्याचा निर्धार केला. पण, आजवर ते साध्य होत नव्हते. गेल्या अनेक वर्षांच्या साधनेनंतर आता जगभरातील सुमारे ८ हजार शास्त्रज्ञांनी ब्रह्यांडाचा शोध घेण्यासाठी एक नवा मार्ग शोधला असून त्या दृष्टीने हा महाप्रयोग आज सुरू झाला. स्वित्झर्लंड आणि फ्रान्सच्या सीमेवर जमिनीखाली १०० मीटरवर लेक जिनेव्हा आणि जुरा डोंगररांगांच्या मध्ये २७ किलोमीटर लांबीच्या महाकाय बोगद्यात लार्ज हायड्रॉन कोलायडर अर्थात एलएचसी हे उपकरण आज कार्यान्वित करण्यात आले. यामुळे ब्रह्मांडाचे रहस्य शोधण्याच्या शास्त्रीय प्रवासाला जगातील कोट्यवधी लोकांच्या साक्षीने सुरुवात झाली.
भारतासह जगभरातील सुमारे ८ हजारांहून अधिक शास्त्रज्ञ गेल्या २० वर्षांपासून हा महाप्रयोग सुरू होण्याची वाट पाहत होते. आजपर्यंत विज्ञान जगतात विश्वनिर्मितीचे अनेक सिद्धांत मांडण्यात आले. यापैकी १९२७ मध्ये बेल्जियन भौतिकशास्त्रज्ञ आणि रोमन कॅथॉलिक धर्मगुरू जॉर्जस लेमैत्री यांनी "बिग बॅंग थेअरी' अर्थात महास्फोट सिद्धांत मांडला. जॉर्ज गॅमोव्ह यांनी या सिद्धांताला पुढे अधिक विकसित रूप दिले. या सिद्धांताकडे अनेक संशोधकांचे लक्ष वेधले गेले. हा सिद्धांत तपासून पाहण्यासाठी आल्प्स पर्वतरांगांच्या पायथ्याशी जमिनीखाली जगातील सर्वात शक्तिशाली पार्टिकल एक्सीलरेटर उभारण्यात आला आहे. पार्टिकल एक्सीलरेटर म्हणजेच मूलकणांना गती देणारे यंत्र. या यंत्रासाठी युरोपीय ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लीयर रिसर्चने नऊ अब्ज डॉलर्स खर्ची घातले आहेत. शिवाय हजारो शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांचे श्रम या प्रयोगाच्या यशस्वितेसाठी कार्यरत आहेत. आज या पार्टिकल एक्सीलरेटने गती घेतली तेव्हा महाप्रयोगाला सुरुवात झाली.
भारतीय वेळेनुसार दुपारी साडे बारा वाजता हा प्रयोग सुरू झाला. त्यावेळी कोट्यवधी लोकांनी कोलाईड यंत्र सुरू होताना पाहिले. काही विशेष झाले का, असेही परस्परांना विचारणे सुरू होते. पण, मोठ्या शास्त्रज्ञांनी कोणत्याही विपरीत परिणामांची शक्यता फेटाळल्याने लोक बरेच निश्ंिचत होते.
धोका नसल्याचा शास्त्रज्ञांचा निर्वाळा
या महाप्रयोगासाठी भूगर्भात खोलवर लार्ज हायड्रॉन कोलायडर यंत्र बसविण्यात आले. २७ किलोमीटर लांबीचा बोगदाही तयार करण्यात आला. या बोगद्याचे तोंड उघडण्यात आल्याबरोबर नाभिकीय कण प्रकाश वेगाने बाहेर पडतील. हे कण प्रोटॉनवर आदळविले जातील. यामुळे भूकंपापेक्षाही कितीतरी पटीने जास्त मोठे हादरे बसण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. पण, मुळात या प्रयोगामुळे असे कोणतेही हादरे बसणार नसून त्यातून जगबुडी होण्याची अजिबात भीती नाही, असे शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. जर अशा प्रयोगाने पृथ्वी बुडण्याची भीती असती तर शास्त्रज्ञांनी इतके परिश्रम करून हा प्रयोग हाती घेतलाच नसता, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

No comments: