Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 13 September, 2008

राज्याचे खाण संचालक भिंगींची अखेर उचलबांगडी

पणजी, दि.१२ (प्रतिनिधी): विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी राज्यातील बेकायदा खाण व्यवसायाविरोधात केलेल्या आरोपांचा पहिला दणका आज सरकारच्या वर्मावर बसला. गेली सात वर्षे खाण संचालकपदावर असलेले जे. बी. भिंगी यांची या पदावरून उचलबांगडी करण्याचे आदेश आज कार्मिक खात्याने जारी केले. सांगे येथील तथाकथित खाण घोटाळ्यात संचालक भिंगी हे भागीदार असल्याचा संशय पर्रीकर यांनी व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर आज अचानक त्यांच्या बदलीचा आदेश जारी करण्यात आल्याने सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली. भिंगी यांना सामान्य प्रशासन विभागात पाठवण्यात आले असून त्यांच्या जागी संयुक्त सचिव अरविंद लोलयेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात पर्रीकर यांनी खाण खात्याच्या भोंगळ, भ्रष्ट व बेदरकार कारभाराचे वाभाडेच काढले होते. राज्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा खाण व्यवसाय सुरू असून काही खाण उद्योजकांकडून कायद्यांची सर्रास पायमल्ली सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली होती. सांगे येथील इम्रान खान यांच्या खाणीबाबतचा मुद्दा उपस्थित करून हा घोटाळा असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला होता. तसेच या घोटाळ्याला खाण संचालक भिंगी व खुद्द खाणमंत्री या नात्याने मुख्यमंत्री कामत हेही जबाबदार असल्याचा सनसनाटी आरोप पर्रीकर यांनी केला होता.
दरम्यान,गेली सात वर्षे हे खाते मुख्यमंत्री कामत यांच्याकडे आहे. ते खाणमंत्री असल्यापासून या खात्याचे संचालकपद भिंगी यांच्याकडेच होते. वेळोवेळी विविध पुरावे सादर करून खाण खात्याचा भ्रष्टाचार उघड्यावर पाडूनही कुणाही अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याची नाराजी पर्रीकर यांनी व्यक्त केली होती. भिंगी यांना या पदावरून ताबडतोब हटवावे,अशी मागणीही पर्रीकर यांनी केली होती त्या अनुषंगानेच त्यांना या पदावरून हटवण्यात आल्याचे सरकारी सूत्रांकडून कळते.
सांगे येथील खाणीबाबत पर्रीकर यांनी केलेल्या आरोपांचे गुळमुळीत खंडन मुख्यमंत्र्यांनी केले असले तरी त्याबाबत खुलासा करून मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपली जबाबदारी झटकण्याचे प्रयत्न केल्याचे प्रत्युत्तर पर्रीकर यांनी दिले होते. पर्रीकर हे सध्या भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बंगळूर येथे गेल्याने गोव्यात परतल्यावर या प्रकरणाचा पर्दाफाश करणार,असे त्यांनी सांगितले आहे. पर्रीकर गोव्यात येण्यापूर्वीच सरकारने भिंगी यांची उचलबांगडी करून खाणप्रश्नावरून तापलेले वातावरण शमवण्याचा प्रयत्न सरकारने केल्याचे दिसून येते. दरम्यान,सरकारी अधिकारी हे केवळ हुकमाचे ताबेदार असतात. त्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष कुठलाही घोटाळा किंवा गैरकारभार उघडकीस येतो तेव्हा या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्यांना "बळीचा बकरा' बनवण्याचे नाटक राजकीय नेते करतात. भिंगी यांचीही हीच अवस्था झाल्याची बोलकी प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.
दरम्यान, सरकारने आज अन्य दोघा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून मडगावचे उपविभागीय दंडाधिकारी दीपक देसाई यांची केपे उपविभागीय दंडाधिकारीपदी बदली केली. त्याजागी केप्याचे व्हिनासियो फुर्तादो यांची नेमणूक करण्यात आली आहे.

No comments: