Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 13 September, 2008

बनावट नोटांचे गोवा प्रमुख केंद्र

भाजप विधिमंडळ प्रवक्ते दामोदर नाईक यांचा दावा
पणजी,दि.१२(प्रतिनिधी): गोवा हे बनावट नोटा चलनात आणण्याचे प्रमुख केंद्र बनत असल्याचा दावा भाजप विधिमंडळ गटाचे प्रवक्ते दामोदर नाईक यांनी केला आहे. वास्कोत तीन लाखांच्या बनावट नोटा सापडल्या व त्याचबरोबर दिवसागणिक व्यवहारांतही मोठ्या प्रमाणावर अशा नोटा सापडत असल्याने राज्यात या नोटांचा मोठा विस्तार झाल्याची भीती नाईक यांनी व्यक्त केली.
आज पणजी येथील भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी मुरगावचे आमदार मिलिंद नाईक व प्रदेश सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते.
राज्यातील वाढत्या चोऱ्या हा चिंतेचा विषय बनला आहे. दक्षिण गोव्यातील स्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. तेथील जिल्हाधिकारीपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी व पोलिस अधीक्षकपदी भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. विद्यमान अधीक्षक व जिल्हाधिकारी ही स्थिती आटोक्यात आणण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत,असा ठपकाही नाईक यांनी यावेळी ठेवला.
प्रत्येक वेळी चोऱ्या झाल्या की कोकण रेल्वेच्या नावाने बोटे मोडण्याची सवय या अधिकाऱ्यांनी आता सोडून द्यावी. पोलिस खात्याची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील चोऱ्यांचा आकडा ५६० वर पोहचला आहे.मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे वास्तव्य असलेल्या मडगावातच गेल्या दहा महिन्यांत १४० चोऱ्या झाल्या. अनेक ठिकाणी पोलिस या चोऱ्यांची नोंद करून घेत नसल्याच्या तक्रारी आहेत. चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांचा धाकच नाहीसा झाला की काय,असा प्रश्न पडतो. दरम्यान, काही प्रकरणांत ज्या पद्धतीने पोलिस चोरांना पकडल्याचा आव आणतात व संशयितांना ताब्यात घेतात ती प्रकरणे जेव्हा न्यायालयात टिकत नाहीत त्यामुळे पोलिस केवळ चौकशीच्या नावाने धूळफेक करीत असल्याचे स्पष्ट होते. चोऱ्यांच्या अनेक प्रकरणांत पोलिसांची भूमिकाही संशयास्पद असल्याने लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
सरकारी संकेतस्थळावर हल्ला होणे,पॅरोलवर सोडलेले गुन्हेगार बेपत्ता होणे,तलवारींचा साठा सापडणे,बनावट नोटांचा सुळसुळाट आदी प्रकरणी सरकार उघडे पडले असून कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे श्री.नाईक यांनी निदर्शनास आणून दिले.

No comments: