Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 11 September, 2008

...तर शिरगावात पाण्याचे लोंढे खाणप्रकरणी खंडपीठाकडून गंभीर दखल

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): शिरगाव येथील खाणींत पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठले असून तेथील खाणींच्या ढिगाऱ्यांना चिरा गेल्या आहेत. परिस्थिती धोकादायक बनलेल्यामुळे हे ढिगारे फुटल्यास खाणींतील पाणी गावात शिरणार असल्याची माहिती सरकारने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली. त्यामुळे तेथे येत्या शनिवारी पाहणी करून सोमवारी संपूर्ण अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला सादर करण्याचा आदेश खाण सुरक्षा उपसंचालकांना देण्यात आला.
या खाणींवरील पाणी रात्री गावात सोडले जात असल्याची पुरवणी याचिका मूळ याचिकादारातर्फे आज दाखल करण्यात आल्यानंतर सरकारने आज वरील माहिती न्यायालयास दिली.
या खाणीवर साठवलेल्या पाण्याची कशी विल्हेवाट लावणार, तसेच हे पाणी गावात शिरू नये यासाठी कोणते उपाय केले जाणार तेही सुचवण्याचे आदेश खाण सुरक्षा खात्याला देण्यात आला आहे. यापूर्वी गोव्यात खाणीवरील पाणी गावात शिरून मोठी समस्या निर्माण झाली होती, अशी माहितीही सरकारने न्यायालयाला दिली.
यापूर्वी खाण व्यवसायामुळे शेतजमिनीला फटका बसलेला असल्याने शिरगाव येथील जमिनीची पाहणी आणि अभ्यास करण्यासाठी तसेच उपाययोजना सुचवण्याचे काम नागपुरच्या "निरी' या संस्थेकडे काम सोपवण्यात आले आहे. तसेच खाणीतून बाहेर सोडल्या जाणाऱ्या पाण्याची पातळी तपासण्यासाठी सरकारने तेथे अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, असा आदेश १६ जून ०८ रोजी खंडपीठाने दिला होता. मात्र, अद्याप तेथे अधिकाऱ्याची नेमणूक केलेली नाही, असा दावा याचिकादाराने आज न्यायालयात केला; तर आम्ही पाण्याच्या पातळीची संपूर्ण माहिती ठेवली असल्याचा दावा सरकार पक्षाने केला.
"निरी'ने या संस्थेला या ठिकाणचा अभ्यास करून सहा महिन्यांत अहवाल सादर करण्याची अट न्यायालयाने घातली आहे. या कामासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च येणार असून ही रक्कम तेथील तिन्ही खाण कंपन्यांनी निरीला देण्याचे मान्य केले आहे.
शिरगावात खाण व्यवसायामुळे शेत जमिनींचे अतोनात नुकसान झाले असून नैसर्गिक जलस्रोतही नष्ट झाल्याची खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे तेथील जमिनींचे सर्वेक्षण करून उपाययोजना करण्यासाठी न्यायालयाने यापूर्वी आदेश दिला आहे.

No comments: