Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 7 September, 2008

सांत-ईस्तेवचा असाही गणेशोत्सव

हिंदू व ख्रिस्ती बांधव एकत्र
पणजी,दि ६(प्रतिनिधी): कला युवक संघ टोंकवाडा सांत - ईस्तेव येथील हिंदू व ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येऊन पहिल्यांदाच गावात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात करून केवळ गोव्यातच नव्हे तर संपूर्ण जगभरात एक वेगळा संदेश पोचविण्याचे कार्य केलेले आहे. तिसवाडी तालुक्यातील या बेटावरील दोन्ही धर्म बांधवांनी एकत्र येऊन जाती धर्माच्या तथाकथित बंधनांना बाजूला ठेवून सलोखा कसा राखला जाऊ शकतो याचे प्रत्यक्ष उदाहरण जगासमोर ठेवले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक चर्चच्या फादरनीं यात महत्त्वाची भूमिका बजावल्याने सध्या ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कला युवक संघातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याची कल्पना पदाधिकाऱ्यांनी पुढे आणली आणि त्यांनी या बेटावर राहणाऱ्या दोन्ही धर्मातील लोकांनी हा सण साजरा करण्याचे ठरविले. येथील चर्चचे फादर ओलावो सोझा यांना त्याची कल्पना दिल्यानंतर त्यांनी ती लगेच उचलून धरली. एवढेच नव्हे तर चर्चच्या प्रार्थनेवेळी त्यांनी ती गावातील ख्रिश्चन बांधवापर्यंत पोचवून सहकार्याचे आवाहन केले. सुमारे दोन महिन्यांपासून त्या ठिकाणी या गणेश पूजनाची तयारी सुरू करण्यात आली होती. यानंतर सुमारे २ लाख रुपये खर्चून या ठिकाणी खास कल्पवृक्षापासून तयार केलेला ६ फुटी श्रीगणेशाचा मंगल कलशावर विराजमान झालेला देखावा सुद्धा तयार करण्यात आला. या देखाव्याच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून फादर ओलावो सोझा हेच उपस्थित होते. यावेळी बोलताना फादर सोझा यांनी, सध्या जाती व धर्माच्या नावावरून जो कलह निर्माण झालेला आहे त्याकडे पाहता कला युवक संघाने सुरू केलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव सलोख्याचे प्रतीक व एक चांगला उपक्रम असल्याचे सांगितले.
यावेळी फादर बिस्मार्क डायस यांनी विघ्नहर्त्यासंबंधी माहिती दिली. कला युवक संघाचे प्रवक्ते व निमंत्रक तसेच या आगळ्या वेगळ्या गणेशोत्सवाची कल्पना मांडणारे रामानंद चोडणकर यांनी आज "माणुसकी' ही सर्वांत मोठी असून ती जपण्याचे आवाहन आपल्या भाषणातून केले व सर्वांनी सलोख्याने नांदण्याची गरज असल्याचे सांगितले.
देखाव्याचे उद्घाटन मूर्ती कलाकार यशवंत शेट यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष राघू गजानन नाईक,गुरूदास गोवेकर, रामराय नाईक, नारायण नार्वेकर, पांडुरंग शेट, नीळकंठ चोडणकर, जांबुवंत सावंत व तुकाराम चोडणकर उपस्थित होते.
हा देखावा २३ सप्टेंबर पर्यंत लोकांसाठी खुला असेल. देखावा तयार करण्यासाठी तुकाराम चोडणकर या प्रमुख कलाकारास सुरेश हळर्णकर, राघू नाईक, देवानंद चोडणकर, विशाल तारी, दिगंबर चोडणकर,श्याम सावंत व दत्ता तारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

No comments: