Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 13 September, 2008

शाळेची कौले उडाल्याने शिक्षिकेसह चौघे जखमी

पाळी चिंचवाडा भागाला वादळाचा तडाखा
पाळी, दि. १२ (वार्ताहर): पाळी पंचायत क्षेत्रातील चिंचवाडा येथे आज दुपारी पावणेबारा वाजता अचानक झालेल्या चक्रीवादळाने सरकारी प्राथमिक शाळेची कौले उडून वर्गशिक्षिका संगीता मराठे यांच्यासह अनेक विद्यार्थी जखमी झाले.
दुपारी पावणे बारा ते बाराच्या दरम्यान धो धो पडणाऱ्या पावसाबरोबर अचानक तुफान वेगाने वारा वाहू लागला. क्षणार्धात या वाऱ्याने वादळाचे रूप घेतले व सर्वप्रथम चिंचवाड्यावरील उंचवट्यावर असलेल्या स. प्रा. शाळेला दणका दिला. यामुळे शाळेच्या एका वर्गाची कौले उंच उडून कोसळल्याने शिक्षिका संगीता मराठे यांच्या डोक्याला मोठी जखम झाली. त्याच प्रमाणे वर्गातील विद्यार्थ्यांवरही छपराची कौले पडल्याने अनेक विद्यार्थी जखमी झाले.
संगीता मराठे यांना व नारायण जाधव, दीपक कांबळी अलीन सय्यद या विद्यार्थ्यांना ताबडतोब साखळीच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथील डॉ. योगेश गोवेकर यांनी जखमींवर त्वरित उपचार केले. संगीता मराठे व विद्यार्थी नारायण जाधव यांना पुढील उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे पाठविण्यात आले आहे.
या घटनेत सय्यद मूसा, जावेद सय्यद, शविना सिंदगी,अनिकेत हसनकर या मुलांना किरकोळ जखमा झाल्या.
दरम्यान या शाळेसमोरील श्रीमती सुनंदा शंकर नाईक यांच्या घरावरील सिंमेटचे पत्रे उडून जाऊन शेजारील पुष्पावती वळवईकर, उषा घनःश्याम बोरकर यांच्या घरावर जाऊन पडले. त्याचप्रमाणे वादळाने या घरांवरील कौले उडून गेल्याने घरातील टी. व्ही. व संसारोपयोगी वस्तू नष्ट झाल्या. सुनंदा नाईक यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहणारी सौ. सुधा सदानंद मडीवाळ यांच्या टी.व्ही.वर सिमेंटचा पत्रा पडल्याने टी. व्ही. संच निकामी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच डिचोलीचे मामलेदार प्रमोद भट यांनी त्वरित चिंचवाडा येथे जाऊन पाहणी केली. त्यांच्याबरोबर पाळीच्या सरपंच सौ. गीता परब, उपसरपंच सौ.करीश्मा कामत, दीपक कामत, दीपक नाईक, तलाठी वेर्लेकर, विविधा परिवाराचे प्रताप गावस, उद्योजक महेश ऊर्फ शांबा गावस, पाळी जिल्हा पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, शिवा गावडे उपस्थित होते. या वादळातील नुकसानी सुमारे ३० हजार रुपये असल्याची माहिती मामलेदारांनी दिली. सुनंदा यांच्या घराचे ३० सिंमेटचे पत्रे फुटले आहेत. शाळेची सुमारे एक हजार कौले उडाली आहेत. पुष्पावती वळवईकर यांच्या घराची १०० ते १५० कौले, तर उषा बोरकर यांच्या घराची ४० ते ५० कौले उडाल्याचे सांगण्यात आले.
चौगुले कंपनीची मदत ःघटनेची माहिती मिळताच कंपनीचे कार्यालय व्यवस्थापक श्री. आफळे व खाण व्यवस्थापक संदीप मोरजकर यांनी धाव घेतली व आजच्या आज शाळेची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले.त्याचप्रमाणे येथील नागरिकांना झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यास मान्यता दर्शविली.
या वादळात सागवानाचे एक झाड जमीनदोस्त झाले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रमोद सावंत यांनीही अपघातग्रस्त घरांना भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या.

No comments: